- लोमेश बुरांडे
गडचिरोली : उच्च शिक्षण घेऊन केवळ नोकरीच्या मागे न लागता, अनोखा प्रकल्प उभारून, यातून स्वयंरोजगार उभारून इतरांनाही काम उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी मनी खूणगाठ बांधली. यानुसार 'प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने'तून भेंडाळा येथे मत्स्यखाद्यनिर्मिती प्रकल्प उभारला. ह्यातून त्यांनी स्वतः सह १५ जणांना रोजगार उपलब्ध करून दिला.
ही प्रेरणादायी गोष्ट आहे, चामोर्शी येथील अजिंक्य अतुल गण्यारपवार यांची. अजिंक्य गण्यारपवार यांनी पुणे येथून फूड इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. सध्या ते 'एमबीए' करीत आहेत. शिक्षण घेत असतानाच एक अनोखा प्रकल्प किंवा उद्योग उभारावा, असा त्यांनी दृढ निश्चय केला. मार्केटचा अभ्यास करून त्यांनी मत्स्यखाद्यनिर्मिती प्रकल्प उभारणी सुरू केली.
हा प्रकल्प ऑगस्ट २०२५ मध्ये पूर्ण झाला व प्रत्यक्ष उत्पादनास सुरुवातही झाली. विशेष म्हणजे, या प्रकल्पाची प्रेरणा त्यांना २०२०-२१ मध्ये कोविड काळातच आली. या कालावधीत त्यांनी मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायासाठी त्यांना कोणत्या गोष्टी व वस्तूंची आवश्यकता असते, याचा अनुभव आला होता. यातूनच त्यांना मत्स्यखाद्य निर्मिती प्रकल्प सुरू करण्याची संकल्पना सुचली. त्यानंतर प्रत्यक्ष प्रकल्प उभारून स्वयंरोजगारासह इतरांना रोजगार त्यांनी उपलब्ध केला.
असा आहे प्रकल्पभेंडाळा येथील मत्स्यखाद्यनिर्मिती प्रकल्पासाठी पाच कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे. शासकीय योजनेत हा प्रकल्प तीन कोटी रुपयांपर्यंत असून सदर प्रकल्पासाठी शासनाकडून १.२० कोटी रुपये अनुदान दिले जाते. विविध प्रकारच्या माशांचे व झिंग्यांचे खाद्य येथे निर्माण केले जात आहे. यासाठी स्थानिक भागातून तसेच गुजरात, राजस्थान, आंध्रप्रदेशातून कच्चा माल मागविला जातो. पॅकिंग, ब्रेडिंग तसेच टीमद्वारा मार्केटिंगसुद्धा सुरू करण्यात आलेले आहे.
कोची येथे मत्स्यखाद्याच्या नमुन्यांचे टेस्टिंग झाल्यानंतर प्रत्यक्ष विक्री सुरू होईल. कमीत कमी खाद्यात माशांचे जास्तीत जास्त पोषण व त्यांची वाढ कशी होईल यावर भर दिला जाईल. त्यानुसार आवश्यक उच्च दर्जाच्या पोषक घटकांचा समावेश आम्ही खाद्यात करणार आहोत.- अजिंक्य अतुल गण्यारपवार