Join us

पशुधनाच्या आरोग्याची घ्या दखल; नका करू पशु आहारात चालढकल

By रविंद्र जाधव | Updated: April 3, 2024 16:37 IST

एकीकडे चारा टंचाईमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर तर त्यासोबत होतेय पशुधनात विविध विकारांचे आगमन.

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अलीकडे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दुग्धव्यवसाय केला जातो. या वर्षी अनेक भागात खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात दुष्काळी स्थिती असल्याने सध्या सर्वत्र जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यात उपासमारी, दूषित पाणी आणि खराब प्रतीच्या चार्‍यामुळे अनेक जनावरांच्या शरीरातील कॅल्शिअम प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. तसेच जनावरांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कॅल्शिअम कमी झाल्याने अनेक पशुपालकांकडील जनावरांच्या हालचाली मंदावल्या आहे.

कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे जनावरे एका ठिकाणी बसल्यानंतर पुन्हा स्वतःच्या पायांवर उभे राहू शकत नाही. जनावरे एकाच ठिकाणी तासंतास बसलेले दिसून येतात. तर काहीअंशी जनावरे दगावण्याची शक्यता देखील असते. यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

दुष्काळी स्थितीमुळे जनावरांना वेळेत चारा मिळत नाही. परिणामी उपासमारीमुळे जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होते. यामुळे जनावरे दगावण्याची देखील शक्यता निर्माण होऊ शकते - पशुवैद्यक डॉ. संदीप शेळके 

जनावरांच्या शरीरातील कॅल्शियम संतुलन कसे राखाल

दुग्धजन्य प्राण्यांमध्ये कॅल्शियमची पातळी राखणे त्यांच्या आरोग्यासाठी आणि दूध उत्पादनासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी पुढीलप्रमाणे नियोजन राखावे.

• दुष्काळात चारा उपलब्धी कमी असते अशा वेळेस उपलब्ध चारा टीएमआर पद्धतीने एकत्र करून यात खनिज मिश्रणे मिसळून त्याची वैरण द्यावी. 

• जनावरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर आवश्यक पोषक तत्त्वे असलेली खनिज पूरक द्रव्य द्यावीत. 

• कॅल्शियम आणि एकूण आरोग्यामध्ये पाणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे मनुष्याप्रमाणेच गुरांना देखील नेहमी स्वच्छ आणि ताजे पाणी पिण्यास द्यावे.

• पशुवैद्यकाच्या मदतीने वेळोवेळी रक्त चाचण्यांद्वारे प्राण्यांच्या रक्तातील कॅल्शियम पातळीचे निरीक्षण करावे. यामुळे कोणतीही कमतरता किंवा असमतोल लवकर ओळखण्यात मदत होते.

• दुग्धजन्य प्राण्यांच्या आरोग्यासाठी नियमित पशुवैद्यकीय तपासणी आवश्यक आहे. कॅल्शियम पातळी राखण्यासाठी एक पशुवैद्य पोषण, पूरक आहार आणि आरोग्य व्यवस्थापन पद्धती यावर मार्गदर्शन करू शकतो.

या प्रमाणे पद्धती अंमलात आणून, पशुपालक जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन योग्य प्रमाणे राखू शकतात. 

हे ही वाचा : दूध काढतांना हे ठेवा ध्यानी; व्यवसायातून मिळेल हमखास मनी