Join us

अठरा वर्षे सेवा केलेल्या बैलावरील प्रेम; केला राजा बैलाचा दशक्रिया विधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 9:50 AM

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिरदाळे येथील चौधरी परिवाराकडून राजा बैलाची दशक्रिया घालून बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिरदाळे येथील चौधरी परिवाराकडून राजा बैलाची दशक्रिया घालून बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

आंबेगाव तालुक्यातील शेवटचे टोक आणि कोरडवाहू गाव म्हणून शिरदाळे गावची ओळख; परंतु या कोरडवाहू शेतीमध्ये जर नियोजनबद्ध शेती केली तर चांगले उत्पन्न मिळू शकते, हे दाखवून देणारी काही मोजकी कुटुंबे आहेत.

त्यातील एक कुटुंब म्हणजे चौधरी कुटुंब. या कुटुंबातील दोन महिलांना गावचे सरपंच म्हणून नेतृत्व करण्याची संधीदेखील गावाने दिली आहे. विजया बाबाजी चौधरी, सुनीता राजेंद्र चौधरी यांनी गावचे सरपंच म्हणून उत्तम काम केले आहे.

याच कुटुंबात दहा दिवसांपूर्वी एक दुःखद घटना घडली आणि ती म्हणजे या कुटुंबाची तब्बल अठरा वर्षे सेवा केलेल्या 'राजा' या बैलाचे निधन झाले. ज्या बैलाने आपली अठरा वर्षे सेवा केली, त्याच्याप्रती काहीतरी स्मृती जपायच्या म्हणून चौधरी कुटुंबाने या बैलाच्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सकाळी ह.भ.प. किसन महाराज तांबे व ह.भ.प. तान्हाजी महाराज तांबे यांच्या हस्ते राजा बैलाचे प्रतिमापूजन करण्यात आले; तर त्यानंतर हनुमान भजनी मंडळ, शिरदाळे यांचे सुश्राव्य असे भजन झाले. यावेळी माजी उपसरपंच मयूर सरडे, ह.भ.प. तान्हाजी महाराज तांबे यांनी या राजा बैलाला शब्दरूपी श्रद्धांजली वाहिली.

या कुटुंबाचे घटक या नात्याने राजू चौधरी यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले. यावेळी सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी याच परिवारातील शांताराम चौधरी, बाबाजी चौधरी, राजू चौधरी, शंकर चौधरी, त्यांचे सर्व नातेवाईक आणि घरातील इतर सदस्य उपस्थित होते.

अधिक वाचा: उन्हाळ्यात गाई म्हशींच्या जेवणाची थाळी नेमके कशी असावी? तज्ञांचं मार्गदर्शन वाचा

टॅग्स :शेतकरीशेतीपीकपेरणी