फकिरा देशमुख
भोकरदन तालुक्यात लंपी स्किन डिसीजवर नियंत्रण मिळवण्यासाठी तब्बल ९० टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असले तरी, १२ जनावरे दगावल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
मात्र, प्रशासन केवळ दोनच मृत्यू मान्य करत आहे, त्यामुळे शेतकरी व प्रशासनात वाद निर्माण झाला आहे.
भोकरदन तालुक्यात लंपी स्किन डिसीज या जनावरांच्या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे एकूण ६३ हजार ३७२ गाईवर्गीय जनावरांपैकी तब्बल ९० टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
तरी देखील तालुक्यात लंपीमुळे १२ जनावरे दगावल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, प्रशासनाने फक्त दोन जनावरे मृत झाल्याचा दावा केला आहे.
लसीकरणात विक्रमी प्रतिसाद
पशुसंवर्धन विभागाने यावर्षी तालुक्यासाठी ६० हजार ५०० लसी उपलब्ध करून दिल्या होत्या. बहुतेक लसींचे वितरण योग्य पद्धतीने झाले असून, गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या प्रादुर्भावाच्या अनुभवामुळे यंदा शेतकऱ्यांनी लसीकरणाबाबत विशेष जागरूकता दाखवली आहे.
पशुधन विकास अधिकारी उत्कर्ष वानखेडे म्हणाले, लंपीवर ८० टक्के काळजी व २० टक्के औषधोपचार प्रभावी ठरतो. यंदा लसीकरणाची टक्केवारी लक्षणीय वाढली असून, तालुक्यात केवळ दोन जनावरे मृत झाल्याची नोंद आहे.
जनजागृतीसाठी फिरती रुग्णवाहिका
ग्रामीण भागातील गावागावात फिरत्या रुग्णवाहिकेद्वारे शेतकऱ्यांना लंपी आजाराची माहिती दिली जात आहे. प्रसारमाध्यमे, वृत्तवाहिन्या आणि सार्वजनिक आवाहनांद्वारे सतत जनजागृती केली जात असल्याने गावागावात जनावरांच्या आरोग्याबाबतची जागरूकता वाढली आहे.
शेतकऱ्यांची नाराजी
देहेड येथील शेतकरी विठोबा बावस्कर यांनी प्रशासनाच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. माझे एक जनावर लंपीमुळे दगावले. आमच्या गावात १० पेक्षा अधिक जनावरे मृत झाली आहेत. मात्र, आजवर कोणताही पंचनामा झालेला नाही. शेवटी आम्हीच जेसीबीने खड्डे खोदून जनावरांचे अंत्यसंस्कार केले. प्रशासनाचे दुर्लक्ष मोठा प्रश्न निर्माण करत आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* जनावरांची स्वच्छता व चारा-पाणी स्वच्छ ठेवावे.
* वेळेवर लसीकरण करून घ्यावे.
* लंपीची लक्षणे (त्वचेवर गाठी, ताप, भूक न लागणे)
* आजारी जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावीत.
* ही लक्षणे दिसताच त्वरित पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.