Join us

आवळा पिकातून करा बंपर कमाई; जाणून घ्या प्रक्रियेच्या उद्योगातील संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 2:47 PM

आवळ्यावर प्रक्रिया करून आवळा मुरंबा, आवळा लोणचे, आवळा च्यवनप्राश, आवळा स्कॅश, आवळा सुपारी, आवळा कॅन्डी, आवळा जॅम आदी चवदार पदार्थांची निर्मिती करता येते. त्यामुळे त्यावर प्रक्रिया करणारे लघू व मध्यम उद्योगाची श्रृंखला ग्रामीण भागात उभी करून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळू शकतो.

आवळ्यावर प्रक्रिया करून आवळा मुरंबा, आवळा लोणचे, आवळा च्यवनप्राश, आवळा स्कॅश, आवळा सुपारी, आवळा कॅन्डी, आवळा जॅम आदी चवदार पदार्थांची निर्मिती करता येते. त्यामुळे त्यावर प्रक्रिया करणारे लघू व मध्यम उद्योगाची श्रृंखला ग्रामीण भागात उभी करून शेतकऱ्यांना व महिला बचत गटांना चांगला मोबदला मिळू शकतो.

आवळ्यापासून आरोग्यवर्धक पदार्थआवळा कॅन्डीआवळा कॅन्डी तयार करताना मोठ्या आकाराची पक्व फळे निवडून प्रथम पाण्यात चुना टाकून धुऊन घ्यावीत. त्यानंतर उकळत्या पाण्यात एक्का चाळणीत आवळा ठेवून वाफवून बी काढून घ्यावेत. या प्रक्रियेला ब्लंचींग असे म्हणतात. आवळा मोजून त्यानंतर त्यात १:०.७ असे साखरेचे प्रमाण घेऊन झाकण बंद पातेल्यात ठेवून २४ तासांकरिता ठेवावे व दररोज त्यामध्ये साखर टाकून त्याचा ७२ अंश ब्रिक्स वाढवावा व त्यानंतर कॅन्डी काढून सोलर ड्रायर किंवा सावलीत वाळवावी. कॅन्डी पॉलिथिन बॅगमध्ये भरून विक्रीसाठी पाठवावी. गाळून खाली उरलेला पाक सरबत करताना वापरावा.

आवळा लोणचेमुरंबा करण्याकरिता वापरता येत नाहीत अशा लहान आवळा फळांचा वापर लोणचे तयार करण्याकरिता होऊ शकतो. आवळा फळे ही अत्यंत तुरट व आंबट असतात. त्याकरिता लोणचे तयार करण्याअगोदर आवळा फळे ०.५ टक्के अॅसेटिक अॅसिड व १ टक्का हळद असलेल्या १० टक्के मिठाच्या द्रावणात एक महिन्यापर्यंत ठेवावीत व नंतरच ती फळे लोणचे तयार करण्याकरिता वापरावीत. आवळ्याचे लोणचे बनविण्यासाठी आवळ्याचे तुकडे १ किलो, मीठ-१५० ग्रॅम, हळद- १०० ग्रॅम, लाल मिरची पावडर-१० ग्रॅम, मेथ्या-३० ग्रॅम व गोडेतेल-३०० मि.ली. इ. घटक पदार्थ वापरावेत.

वरीलप्रमाणे मिठाच्या द्रावणात बुडवून ठेवलेली आवळा फळे घेऊन त्यांना उकळत्या पाण्यात ५ मिनिटे बुडवून नंतर थंड करावी. फळांचे तुकडे करून बिया काढून टाकाव्यात. फळांचे तुकडे व मीठ सोडून बाकी सर्व पदार्थ तेलात परतून घ्यावेत. फळांचे तुकडे व मसाला एकत्र मिसळून पुन्हा दोन मिनिटे परतून घ्यावे व नंतर मीठ मिसळावे. हे तयार झालेले लोणचे काचेच्या स्वच्छ निर्जंतुक केलेले बरणीत भरून बंद केलेली बरणी उन्हात ५ दिवस ठेवावी लोणचे मुरल्यानंतर बरणी थंड व कोरड्या जागी ठेवावी.

आवळा सुपारीआवळा सुपारी ही मीठ लावून तयार करतात. याकरिता पूर्ण वाढलेली पक्व फळे निवडावीत, ही फळे स्वच्छ पाण्यात धुऊन ती ३ ते ४ मिनिटे उकळत्या पाण्यात टाकून थंड करावीत. या फळांचे तुकडे करावेत किंवा किसणीच्या सहाय्याने कीस काढावा. या किसात ४० ग्रॅम मीठ प्रतिकिलो या प्रमाणात घेऊन मिसळावे व सूर्यप्रकाशात किंवा वाळवणी यंत्रात ६० अंश सें.ग्रे. तापमानाला सुपारी वाळवावी. ही वाळवलेली सुपारी वजन करून प्लॅस्टिक पिशव्यांत भरून विक्रीला पाठवावी. आहारमुल्ये व मुखशुद्धीसाठी ही सुपारी चांगली आहे.

आवळा स्क्रॅशआवळा रसाचे स्कॅश बनविण्यासाठी रसाचे प्रमाण ४५ टक्के टी.एस.एस. ५० टक्के व आम्लता १ टक्का ठेवतात. हे पेय दीर्घकाळ टिकविण्यासाठी त्यामध्ये रासायनिक द्रव्ये वापरतात. आवळा स्कॅश बनविण्यासाठी एक ग्लास रस व ३ ग्लास पाणी या प्रमाणात वापर करावा. याशिवाय आवळा लाडू, आवळा सुपारी, आवळा पावडर यासारखे इतरही पदार्थ तयार करता येतात.

आवळा जॅमआवळे चुन्याच्या निवळीत धुऊन घ्यावेत. किसणीने आवळा व अद्रक किसून घ्यावेत. १ किलो आवळा २ किलो साखर व २५ ग्रॅम अद्रक मिसळून मंद आचेवर हलवत रहावे. कढईत मिश्रण कडा सोडे पर्यंत आचेवर ठेवून हलवत रहावे. थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवावे.

आवळ्यातील औषधी गुणधर्म• फळामुळे शरीर शुद्ध (Detox) होऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. आवळ्यातील पोषकतत्त्वांमुळे शरीरातील विषारी पदार्थ सहजरीत्या बाहेर फेकले जातात. ज्या लोकांना अॅसिडिटी, गॅस किंवा अपचनाच्या समस्या असतील त्यांनी आवळ्याच्या चूर्णाचं सेवन करावे. यामुळे पोटातील जळजळ शांत होते. आवळ्यातील पोषक घटकांमुळे पोटाला थंडावा मिळतो आणि मेंदू देखील शांत होतो. आवळामुळे पचन प्रक्रिया सुरळीत पार पडते. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहेत. जे आपले पोट स्वच्छ करण्याचे कार्य करतात. नियमित आवळ्याचे सेवनाने रक्ताभिसरणाची क्रिया सुरळीत सुरू राहते. कोलेस्टेरॉलचे प्रमाण देखील कमी होते. नियमित स्वरूपात आवळ्याच्या रसाचे सेवन करा म्हणजे इम्युनिटी वाढण्यास मदत होईल.• आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात 'क' जीवनसत्त्व असल्यामुळे शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींना (White Blood Cells) बूस्ट करण्याचे कार्य करते. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती पांढऱ्या रक्त पेशींवरच अवलंबून असते. यामुळे शरीरामध्ये या पेशी पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे.• आवळा हे फळ 'क' जीवनसत्त्वाचा उत्तम स्रोत आहे. या पोषण तत्त्वामुळे डोळे तसंच त्वचेचं सौंदर्य खुलण्यास मदत मिळते. यातील जीवनसत्त्वांमुळे त्वचेतील पेशी जलदगतीनं दुरुस्त होतात.• 'क' जीवनसत्त्व आपल्या डोळ्यातील रक्तवाहिन्यांमध्ये अनावश्यक चरबी जमा होण्यापासूनही रोखण्याचे कार्य करते. यामुळे दृष्टीवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.• सुंदर आणि चमकदार केसांसाठी तुम्ही आवळा (Health Benefits Of Gooseberry) खाऊ शकता किंवा आवळा पावडरचा हेअर मास्क म्हणून देखील वापर करू शकता. या दोन्ही पद्धतींमुळे तुमचे केस मजबूत होण्यास मदत मिळते. योग्य प्रमाणात आवळ्याचे सेवन केल्यास केसांच्या समस्या कमी होऊ शकतात.• आवळ्यातील गुणधर्मामुळे केस काळे राहतात तसेच कोंड्याची समस्याही कमी होते. फ्रीजमध्ये ठेवलेल्या आवळ्याचे सेवन करणे टाळावे. यामुळे आरोग्यास अपाय होण्याची शक्यता असते.• मधुमेहाचा (Diabetes) त्रास असणाऱ्यांनी आवळ्याचे सेवन केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आवळ्यामधील अँटी ऑक्सिडेंट्समुळे रक्तातील शर्करा नियंत्रणात राहण्यात मदत मिळते.• आवळा ज्यूस किंवा आवळा चूर्णाचे हळदीसोबत सेवन केल्यास भरपूर लाभ मिळतील. पण कोणतेही उपाय करून पाहण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका.

टॅग्स :शेतकरीकाढणी पश्चात तंत्रज्ञानमहिलाऔषधं