लोकसभेच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांचा प्रभाव; साताऱ्यातील वाई, कऱ्हाड अन् पाटण मतदारसंघ शेवटपर्यंत चर्चेत

By दीपक शिंदे | Published: May 11, 2024 06:02 PM2024-05-11T18:02:43+5:302024-05-11T18:03:31+5:30

सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक एकूण १६ उमेदवारांनी लढविली

Wai, Karad and Patan constituencies in Satara are being discussed till the end in the Lok Sabha elections | लोकसभेच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांचा प्रभाव; साताऱ्यातील वाई, कऱ्हाड अन् पाटण मतदारसंघ शेवटपर्यंत चर्चेत

लोकसभेच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांचा प्रभाव; साताऱ्यातील वाई, कऱ्हाड अन् पाटण मतदारसंघ शेवटपर्यंत चर्चेत

दीपक शिंदे

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण १६ जणांनी निवडणूक लढविली. मात्र, तुल्यबळ लढत ही महायुती आणि महाआघाडीच्या उमेदवारांमध्येच झाली. सुरुवातीलाच आरोप - प्रत्यारोपावर गेलेल्या निवडणुकीने हळूहळू सूर पकडला आणि साताऱ्याच्या विकासाचे काही प्रश्न मांडले जाऊ लागले. यशवंत विचाराला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांनी उत्तरे देण्यात आली. तर नव्याने उद्योगांचा विकास, कारखानदारी, शैक्षणिक सुविधा, आयटी पार्क अशा मुद्द्यांचीही चर्चा झाली. पण, या सर्वात पाटण आणि वाईतील नेत्यांच्या भूमिका महायुती आणि महाआघाडीसाठी महत्त्वाच्या ठरल्या. निवडणूक लोकसभेची असली तरी या नेत्यांना विश्वासात घेतल्याशिवाय दोन्ही आघाड्यांना काहीच करता आलेले नाही. त्यांनी बजावलेल्या भूमिकांवरच सातारा लोकसभेचा निकाल अवलंबून असणार यात शंका नाही.

सातारा लोकसभेसाठी उमेदवार ठरवितानाच महायुती आणि महाविकास आघाडीने उशीर केला. त्यामुळे अगदी अर्ज भरण्याचा कालावधी सुरू होण्याच्या तोंडावर उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारांना प्रचारासाठी कमी कालावधी मिळाला असला तरी उमेदवारांनी सातारा जिल्हा पिंजून काढला आहे. महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर करतानाच यशवंत विचारांना हात घातला. कऱ्हाड आणि पाटणचा मतदार त्यांनी पहिल्यांदाच आपल्या सोबत घेण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांचा हा पहिलाच डाव विरोधकांच्या लगेच लक्षात आला. त्यांनी यशवंत विचारांचा उमेदवार पवारांना सापडला नाही, असा टोला लगावत दिलेल्या उमेदवारावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. हे प्रकरण अगदी अटकेच्या शक्यतेपर्यंत गेले. दुसरा मुद्दा हा यशवंतराव चव्हाण यांना केवळ निवडणुकीपुरते मर्यादित ठेवण्यापेक्षा त्यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली. पण, कऱ्हाडच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्याला स्पर्श न केल्यामुळे कऱ्हाडकरांच्या मनात थोडी सल राहिलीच.

या मुद्द्यांवरून पुढे जाताना निवडणूक वैयक्तिक आरोपांवर फारशी गेली नाही. एकमेकांवर थेट आरोप झाले असते तर निवडणुकीने वेगळाच रंग पकडला असता. त्यामुळे महायुतीकडून महाआघाडीच्या उमेदवारावर आरोप करण्यासाठी निवडणुकीत थेट संबंध नसलेल्या दोन मोहऱ्यांचा वापर करण्यात आला. त्यांनी आपापल्या परीने या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांचा रंग भरला, पण शेवटपर्यंत तो टिकला नाही. निवडणुकीसाठीची यंत्रणा आणि नेत्यांच्या प्रचार सभा यावर निवडणूक पुढे सरकली.

कऱ्हाडमधील नरेंद्र मोदी यांच्या सभेने चांगलेच वातावरण तयार झाले होते. सभा उशिरा सुरू होऊनदेखील एवढ्या उन्हात लोक थांबून होते. यावरच या सभेचे यश अधोरेखित झाले होते. सभेतून स्थानिक मुद्द्यांवर फारसे काही मिळाले नसले तरी या सभेत महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचे भाषण मात्र चांगले झाल्याची चर्चा झाली. नरेंद्र मोदींच्या सभेतील भाषणाला शरद पवार यांनी उत्तर दिले. ते म्हणजे नरेंद्र मोदी यांनी कऱ्हाडमध्ये जाऊन यशवंतरावांचा उल्लेखही केला नाही असे. त्यानंतर उमेदवार आपापल्या कामाला लागले. जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात सभा, कोपरासभा, गाठीभेटी होत राहिल्या.

शेवटच्या टप्प्याकडे निवडणूक आलेली असताना वाई आणि पाटणमधील नाराजी महायुतीसाठी अडचणीची आणि महाआघाडीसाठी फायद्याची होऊ शकते याची चर्चा रंगू लागली. या ठिकाणच्या लोकांमध्ये महायुतीच्या उमेदवाराबाबत काही समज-गैरसमज होते किंवा केले गेले होते. ते दूर करणे आवश्यक असल्याने हा प्रयत्न पहिल्यांदा पाटणमध्ये करण्यात आला. त्या ठिकाणी शंभूराज देसाई यांना सोबत घेऊन उदयनराजेंना मत म्हणजे मला मत असा प्रचार शंभूराज देसाई यांना करावा लागला. त्यामुळे त्या ठिकाणच्या वातावरणात बदल झाल्याचे सांगितले जाऊ लागले. तशीच परिस्थिती वाईमध्ये होती. या ठिकाणी अजित पवार यांची सभा जोरदार झाली. त्यांनी सभेमध्ये कार्यकर्त्यांना अगदी कारखानदारी व्यवस्थित चालविण्यापासून ते खासदारकी देतो, असे आश्वासन देईपर्यंत सर्व काही झाले. आमदार मकरंद पाटील यांनीही कार्यकर्त्यांना बरेच समजावले. माझ्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेऊ नका, असा प्रेमाचा दमही भरला. पण, कार्यकर्त्यांनी किती मनावर घेतले हे आता निकालातूनच दिसणार आहे.                   

महायुतीच्या उमेदवारासाठी एवढे सगळे प्रयत्न होत असताना महाआघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनीही जिल्ह्यात प्रचाराचा धडाका लावलेला दिसला. उदयनराजेंनी ज्या जुळण्या शेवटच्या टप्प्यात केल्या त्या शशिकांत शिंदे यांनी पहिल्या टप्प्यात केल्या. कऱ्हाडमधील जाधव कुटुंबीयांना सोबत घेतले. उदयसिंह पाटील यांची नाराजी दूर केली. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत जमणार नाही असे म्हणणारे हे लोक सोबत आल्याने सुरुवातीपासून प्रचारात त्यांची मदत झाली. जसे अजित पवारांनी वाईत आश्वासन दिले तसेच आश्वासन कऱ्हाडातही राष्ट्रवादीकडून देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता कोण विधानपरिषदेचा आमदार आणि कोण राज्यसभेचा खासदार होतो हे लवकरच ठरणार आहे.

तालीम संघावर झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सभेने तर महायुतीच्या प्रचाराचा माहोलच बदलून टाकला. उदयनराजे भोसले हे तुतारीची पिपाणी करतील अशा भाषणाने प्रचाराची जोरदार राळ उडाली. त्याचवेळी शरद पवारांची जिल्हा परिषद मैदानावरील सभेच्या गर्दीचीही चर्चा रंगली.

एकूणच सातारा लोकसभेची निवडणूक ही मुद्दे, गुद्दे, आरोप- प्रत्यारोप यावरून मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मनधरणीपर्यंत येऊन ठेपली. ज्यांनी कार्यकर्त्यांची मने वळविण्यात यश मिळविले तेच आपल्या गटाच्या उमेदवाराला यश मिळवून देऊ शकतात. त्यामुळे विजय पराजय हा उमेदवाराचा राहिलेला नसून स्थानिक नेत्यांनी ही निवडणूक आपल्या हातात ठेवली आणि ती फिरविण्याचा प्रयत्न केला हे यातील महत्त्वाचे सूत्र आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांच्या हातातील निवडणुकीचा फायदा कोणाला होतो हे ४ जूनला पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

साताऱ्याची वैशिष्ट्यपूर्ण निवडणूक

सातारा लोकसभेची निवडणूक उत्साहात आणि निर्विघ्न पार पडली. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून कसे काम करावे याचे उत्तम उदाहरण या निवडणुकीत पाहायला मिळाले. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे आचारसंहिता भंग अजिबात झाला नाही. पैशांची ने-आण करताना कोणीच सापडले नाही. दारू आणि इतर साहित्याची वाहतूक अजिबात झाली नाही. प्रशासनाने एवढे चेकनाके उभे केले पण जिल्ह्यातील नागरिकांनीच काहीच चुकीचे करायचे नाही असे ठरविल्यामुळे चेक नाक्यांना फार काम पडले नाही. असो अंतिम सत्य निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पिंपोडे बुद्रुक परिसरात काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले पण ते राजकीय प्रेरीत असल्याचा आरोप होतोय.

साताऱ्याच्या विकासासाठी १६ जणांचा पुढाकार

सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक एकूण १६ उमेदवारांनी लढविली. साताऱ्याच्या विकासासाठी एवढे लोक प्रयत्नशील असल्याचे निवडणुकीतून पहिल्यांदाच पाहायला मिळाले. ३३ जणांनी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यातून काहीजणांनी डमी फॉर्म भरले तर काही जणांनी विचारांती माघार घेतली. तरीदेखील १६ उमेदवार निवडणुकीत राहिले ही चांगलीच गोष्ट आहे. मात्र, हा सोळा जणांमुळे १७ व्या नोटाच्या मतदानासाठी प्रशासनाला आणखी एक मशीन जोडावे लागले.

निवडणुकीचा टक्का वाढला, प्रयत्नांना मिळाले यश

सातारा लोकसभेसाठी ६३.१६ टक्के मतदान झाले. मतदानाचा हा टक्का वाढविण्यात प्रशासनाने फारच महत्त्वाची भूमिका बजावली. सुमारे सहा महिन्यांपासून जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत निवडणुकीची तयारी केली होती. अनेक वेगळी मतदान केंद्रे उभारून लोकांचा उत्साह वाढविण्याचाही प्रयत्न केला होता. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्यात नक्कीच मदत झाली. पोलिस आणि प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पाडलेली ही एक महत्त्वाची निवडणूक असे म्हणता येईल.

Web Title: Wai, Karad and Patan constituencies in Satara are being discussed till the end in the Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.