ड्रायव्हरने मालकाकडून ६० लाखांची खंडणी उकळली! तिघांना समतानगर पोलिसांकडून अटक

By गौरी टेंबकर | Published: May 14, 2024 10:54 AM2024-05-14T10:54:11+5:302024-05-14T10:54:31+5:30

इतके पैसे नसल्याचे त्यांनी सांगत मालकाने २० लाख रुपये देऊ शकतो असे आरोपींना सांगितले. त्यावरून त्या दोघांनी अगरवाल यांना बेदम मारहाण केली.

The driver extorted a ransom of 60 lakhs from the owner! Three arrested by Samatanagar police | ड्रायव्हरने मालकाकडून ६० लाखांची खंडणी उकळली! तिघांना समतानगर पोलिसांकडून अटक

ड्रायव्हरने मालकाकडून ६० लाखांची खंडणी उकळली! तिघांना समतानगर पोलिसांकडून अटक

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई: झटपट श्रीमंत होण्याच्या नादात एका चालकाने बनाव करत साथीदारांच्या मदतीने मालकाकडून ६० लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार कांदिवलीमधील समतानगर पोलिसांच्या हद्दीत घडला. मात्र पोलिसांनी याप्रकरणी तपास करत चालक सागर पवार, किरण भोसले आणि मंगेश कारंडे यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून मुद्देमाल वसूल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. 

तक्रारदार विष्णुकुमार अगरवाल (४५) हे ८ मे रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास त्यांच्या अंधेरीतील कार्यालयावरून बोरिवली पूर्वच्या सिद्धार्थ नगरमध्ये असलेल्या घराच्या दिशेने निघाले होते. ते नऊच्या सुमारास कांदिवली पूर्वच्या ९० फिट रोडकडे पोहोचले. जिथे त्यांच्या सोबत कारमध्ये असलेले एक मित्र दिनेश हे उतरले. त्याचा वेळी लाल सिग्नल लागल्याने गाडी तिथेच थांबली होती आणि चालक सागरने कार लॉक करण्याच्या आधीच दोन अनोळखी इसम आत शिरले व अगरवाल यांच्या दोन्ही बाजूला जाऊन बसले. त्यांनी सागरच्या डोक्यात मागून चापट मारत कार सरळ पुढे दहीसरच्या दिशेने घे असे धमकावले. दहिसरला गेल्यावर चाकू दाखवत आरोपींनी अगरवाल यांच्याकडून ५ कोटी रुपयांची मागणी केली. मात्र इतके पैसे माझ्याकडे नसल्याचे त्यांनी सांगत मी २० लाख रुपये देऊ शकतो असे आरोपींना सांगितले. त्यावरून त्या दोघांनी अगरवाल यांना बेदम मारहाण केली आणि अखेर ६० लाख रुपये देण्याचे त्यांनी कबूल केले. त्यानंतर आरोपींनी गाडी त्यांच्या कांदिवली येथील घराच्या दिशेने न्यायला लावत सागरलावर पाठवत अगरवाल यांच्या पत्नीकडून ६० लाख रुपये आणयला लावले. ते पैसे डिक्कीत ठेवायला सांगत गाडी काळोख्या गल्लीकडे थांबवायला लावली. त्यांनी सागरला आधी उतरायला सांगत नंतर ते दोघे पैसे घेऊन पसार झाले.

त्याची तक्रार समतानगर पोलिसांना मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गंगापूरकर तसेच पथकाने तपास सुरू केला. ज्यात सागर यानेच त्याचे दोन साथीदार किरण व मंगेश यांच्या मदतीने हा प्रकार केल्याचे उघड झाले. तक्रारदाराकडे असलेल्या पैशांबाबतची कल्पना सागरला होती त्यामुळे त्यानेच रेकी करत हा गुन्हा केल्याचे तपास अधिकारी गंगापूरकर यांनी लोकमतला सांगितले. झटपट पैसा मिळवत श्रीमंत होण्याच्या उद्देशाने हा गुन्हा करण्यात आला मात्र समतानगर पोलिसांनी जोगेश्वरी, अंधेरी आणि वसई परिसरातून आरोपींचा गाशा गुंडाळला.

Web Title: The driver extorted a ransom of 60 lakhs from the owner! Three arrested by Samatanagar police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.