डोळ्यासमोर पाकीट मारण्याचे स्किल डेव्हलप करणे बाकी...

By अतुल कुलकर्णी | Published: May 5, 2024 09:23 AM2024-05-05T09:23:49+5:302024-05-05T09:24:58+5:30

ठाण्यात शिंदेसेनेच्या रॅलीत दोन गटांत धक्काबुक्की झाली. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर परिस्थिती निवळली.

Still need to develop the skill of pick pocketing in front of the eyes... in Politics thane eknath Shinde ralley clash | डोळ्यासमोर पाकीट मारण्याचे स्किल डेव्हलप करणे बाकी...

डोळ्यासमोर पाकीट मारण्याचे स्किल डेव्हलप करणे बाकी...

- अतुल कुलकर्णी
संपादक, मुंबई
कोण कुठले अब्राहम लिंकन, त्यांनी त्यांच्या शिक्षकाला पत्र लिहिले होते... आपल्या मुलाला गुरुजींनी काय शिकवावे, याबद्दल काही अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या होत्या, पण लिंकन यांना काही कळत नसावे. समाजात केवळ सदाचार हाच एकमेव गुण कामाला येतो, असा त्यांचा भोळा समज असेल... लिंकन यांच्या पत्राचा वसंत बापट यांनी अनुवाद केला होता. तो देखील तसा फार ग्रेट नव्हताच... लेखकाने ५० वर्षे तरी चिरकाल टिकेल, असे साहित्य लिहायला हवे. मात्र लिंकन आणि बापट दोघांनाही ते जमले नसावे... त्यामुळे त्या दोघांची क्षमा मागून चिरकाल टिकणारे लेखन कसे असावे हे सांगण्याचा हा प्रयत्न...

खांद्याला खांदा लावून लढण्याचे दिवस कधीच गेले... आता भावा-भावाने, काका- पुतण्याने, दादा-मामाने, नवरा-बायकोने, नणंद-भावजईने एकमेकांचे पत्ते कापत पुढे जायला शिकले पाहिजे... या जगात टिकून राहण्यासाठी हेच शिक्षण कामाला येते... लिंकन आणि बापट मास्तरांना हे कसे काय समजलेच नसेल..?
माणसं घोटाळेबाजच असतात... ती कधीच तत्त्वनिष्ठ नसतात... हे लोकांनी कधीच शिकून घेतले आहे..! प्रत्येक घोटाळ्यामागे एक तरी नेता असतो आणि साधूसारखा वाटणारा, खोटं बोलणारा गुंड देखील... हेही शिकून घेतले आहे आजच्या पिढीने... राजकारणी केवळ स्वार्थीच असतात आणि सगळे आयुष्य ‘स्व’साठी जगणाऱ्या नेत्यांचीच आज चलती आहे... वेळ आली की सूड घेणारे मित्र फक्त राजकारणातच असतात... ज्याला घोटाळे करता येतात, तोच या व्यवसायात टिकतो... हेही त्यांना माहिती आहे. गॉडफादर कादंबरीत ‘बिहाइंड एव्हरी फॉर्च्युन देअर इज अ क्राईम’ हे मारिओ पुझो यांना लिहिता आले; पण हे लिंकन आणि बापट मास्तरांना का लक्षात आले नसेल...?

निवडणुका आल्या की वाटेल तशी आश्वासने द्यायची... जात, धर्म, पंथ यात भांडणं लावून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची, या गोष्टी आजच्या पिढीने कधीच आत्मसात केल्या... त्याला आता याच्याही पुढे जाऊन तुमच्या डोळ्यादेखत, तुमच्या डोळ्याला डोळा भिडवून ठाम खोटे बोलणे तेवढे शिकायचे बाकी आहे... तुमच्यासमोर तुमच्या खिशातले पाकीट मारण्याचे स्किल फक्त डेव्हलप करायचे बाकी आहे... हा गुण तुम्ही शिकवायचे विसरलात का लिंकन आणि बापट मास्तर..?

महाभारतातला श्रीकृष्ण, अर्जुनाला गीता सांगतो. स्वकीयांविरुद्ध लढणे का गरजेचे आहे हेही शिकवतो. मात्र आताचा काळ बदलला आहे. आता समोर कोण आहे हे न बघता भिडायची सवय लागलेल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना वेगळ्या शिक्षणाची गरज आहे. आपल्या विरोधातील समोर दिसला की त्याला एकत्र रोखीने विकत घेता आले पाहिजे, नाहीतर आजच्या काळातल्या बिडी, सीडी देऊ का विचारले पाहिजे... हे विचारण्याची क्षमता त्याच्यात निर्माण केली पाहिजे... नाहीतर त्याला ठोकून तरी काढता आले पाहिजे. विचारपूस वगैरे हा फार फालतू प्रकार आहे... डोके फोडणे, खिशातला घोडा नाचवत पोलिस स्टेशनमध्ये गोळ्या झाडणे, समोरच्या नेत्याला बदनाम करून आपण कसे साळसूद आहोत, हे दाखवण्याचे स्किल तुम्ही डेव्हलप करायला पाहिजे होते; पण या गोष्टी लिंकन आणि बापट मास्तर तुम्ही कसे काय विसरलात..?

खांद्याला खांदा लावून एकत्रपणे लढणाऱ्यांचे, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्यांचे, दुसऱ्याच्या आनंदात स्वतः समाधानी होण्याचे दिवस कधीच काळाच्या पडद्याआड गेलेत मास्तर... आज एक दुसऱ्याला दुःख आणि वेदना देणाऱ्यांची... ‘भ’ची बाराखडी मुखपाठ असणाऱ्यांची... आई-बापाच्या नावासह एकमेकांचा उद्धार करणाऱ्यांची... एकमेकांच्या अंगावर धावून जाणाऱ्यांची, डोके फोडण्याची भाषा करण्यापेक्षा कृती करणाऱ्यांची सगळ्यात जास्त गरज असताना, तुम्ही या कोणत्याही गोष्टी आधीच का शिकवल्या नाहीत लिंकन आणि बापट मास्तर...

शिकवल्या असत्या तर आज आमची ही नवी पिढी स्पर्धेत कुठेही मागे राहिली नसती. पण आता तुम्हाला बोलून तरी काय उपयोग..? तुम्ही राहिला नाहीत... बापटही राहिले नाहीत... साने गुरुजींचा जमानाही गेला... आता फक्त नाणे गुरुजींचा जमाना आहे... घेऊ आम्ही जमेल तसे शिकून... धन्यवाद. 
- तुमचाच, बाबूराव.

Web Title: Still need to develop the skill of pick pocketing in front of the eyes... in Politics thane eknath Shinde ralley clash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.