शिवसेनेचा विरोध मावळला, नारायण राणेंनी घेतलं स्मृतीस्थळाचं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 01:09 PM2021-08-19T13:09:13+5:302021-08-19T13:27:42+5:30

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज मुंबईतून सुरुवात झाली आहे. नारायण राणे मुंबई विमानतळावर येताच मोठी गर्दी त्यांना घ्यायला जमा झाली होती.

त्यानंतर, या जनआशीर्वाद यात्रेतही मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमा झाले आहेत. राणेंनी मातोश्रीच्या बाजूलाच असलेल्या येथून यात्रेतील आपलं पहिलं स्वागतपर भाषण केलं. त्यावेळी, आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेनेवरही प्रहार केला.

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नारायण राणेंवर टीका केली होती. नारायण राणेंना बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही.

शिवसैनिक त्यांना स्मृती स्थळावर येऊ देणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. राणेंनी आगाऊपणा केल्यास त्यांना स्मृतीस्थळापासून हाकलून दिल्याशिवाय आम्ही शिवसैनिक गप्प बसणार नाही, असा इशाराच राऊत यांनी दिला होता.

तुमचा शिवसेनाप्रमुखांशी काय संबंध आहे? ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला वाचवलं, एवढं मोठं केलं, त्या बाळासाहेबांना तुम्ही दु:खी केलं. मग, आता स्मृतीस्थळाचा दर्शन घेताना तुम्हाला लाज वाटत नाही का, असेही विनायक राऊत यांनी म्हटलं होतं.

राऊत यांचा हा विरोध केवळ शाब्दीक बुडबुडा असल्याचे दिसून आले. नारायण राणेंनी शिवाजी पार्कवर अभिवादनह केले. त्यामुळे, शिवसेनेचा विरोध मावळल्याचे दिसून आले.

मुंबईच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देण्यासाठी अनेकजण येत असतात. त्या अनेक लोकांप्रमाणे राणेसुद्धा येत आहेत.

राणेंना याचा काही उपयोग होणार नाही. याशिवाय, पक्षाकडून कोणताही आदेश नसल्याने नारायण राणेंना अडवणार नाही, असे शिवसेना नेते आमदार सदा सरवणकर यांनी स्पष्ट केले आहे.

राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रा आणि स्मृतीस्थळावरील भेटीकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण शिवसेनेने स्वीकारल्याचे दिसते. खासदार विनायक राऊत यांनी इशारा दिला होता. मात्र, सरवणकर यांनी विरोध करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

दादर, माहिम भागातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना प्रभादेवी येथील महापौरांच्या कार्यक्रमाकडे बोलवून घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राणेंच्या यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याकडे लक्ष आहे.