Sameer Wankhede : समीर वानखेडेंचा सत्कार करणाऱ्या संघटनेला भिडे गुरुंजींचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 06:34 PM2021-11-03T18:34:06+5:302021-11-03T18:48:48+5:30

गुरूजींच्या मनातून माझे निलंबन कोणीही करू शकणार नाही. मला संपवण्याचा कोणाचा घास नाही, असे म्हणत नितीन चौगुले यांनी "श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान' या नव्या संघटनेच्या स्थापनेची घोषणा केली होती.

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी (Mumbai Drugs Case) आर्यन खान (Aryan Khan) याला अटक झाल्यानंतर आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या खळबळजनक आरोपांमुळे सध्या एनसीबीचे मुंबई विभागीय अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) चांगेलच चर्चेत आहेत.

नवाब मलिकांकडून वानखेडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झडत असताना दुसऱ्या बाजूला आता वानखेडे यांच्या समर्थनार्थ देखील काही संघटना पुढे येऊ लागल्या आहेत.

मुंबईतील एनसीबी कार्यालयाबाहेर आज शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान नावाच्या संघटनेनं वानखेडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

इतकंच नव्हे, तर समीर वानखेडे कार्यालयात दाखल होत असताना त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. तसंच वानखेडे यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा जंगी सत्कार देखील करण्यात आला.

'समीर वानखेडे तुम आगे बढो...हम तुम्हारे साथ है', 'हर हर महादेव' या घोषणांनी एनसीबी कार्यालयाबाहेर शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी वानखेडेंचा सत्कार केला.

तसंच ड्रग्ज माफियांच्या विरोधात कारवाई करुन समीर वानखेडे चांगलंच काम करत आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका करुन त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम काही जण करत आहेत.

पण आम्ही त्यांच्यासोबत असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही इथं आलो आहोत, असं शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यानं सांगितलं.

समीर वानखेडे यांनीही शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी केलेला सत्कार स्वीकारला आणि त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी वानखेडेंनीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ते नेहमीप्रमाणे आपल्या कार्यलयीन वेळेत एनसीबीच्या कार्यालयात पोहोचले.

समीर वानखेडेंचा सत्कार करणाऱ्या शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या संघटनेचा भिडे गुरुंजीचा इतिहास आहे. संभाजी भिडे यांचा शिष्य असलेल्या नितीन चौघुले यांनीच ही संघटना फेब्रुवारी महिन्यात स्थापन केली आहे.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरूजींना वाळू तस्कर, पतसंस्था बुडवणारे, खासगी सावकारी व फसवणूक करणाऱ्यांनी घेरले आहे. लाचाराप्रमाणे गुरूजींना सर्वत्र फिरवून वापर केला जातोय.

गुरूजींभोवती असलेल्या चांडाळ चौकडीने मला बदनाम करून माझ्याविषयी द्वेष निर्माण केला. माझे निलंबन करायला लावले. परंतू मी काही कच्च्या गुरूजींचा चेला नाही.

गुरूजींच्या मनातून माझे निलंबन कोणीही करू शकणार नाही. मला संपवण्याचा कोणाचा घास नाही, असे म्हणत नितीन चौगुले यांनी "श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान' या नव्या संघटनेच्या स्थापनेची घोषणा केली होती.

भिडे गुरूजींच्या भोवती गेली 20 वर्षे सावलीप्रमाणे असलेल्या नितीन चौगुले यांना नुकतेच निलंबित केल्यामुळे ते पुढे काय करणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह विविध भागातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले होते.

चौगुले यांनी काही दिवस कार्यकर्त्यांची मते आजमावून घेतल्यानंतर 21 फेब्रुवारी रोजी डेक्कन हॉलमध्ये शिवभक्तांचा मेळावा घेतला.

त्यावेळी त्यांनी शिवप्रतिष्ठानच्या उद्देशानचे वाटचाल करणाऱ्या "श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान' या नव्या संघटनेची घोषणा केली होती.