राज ठाकरे मुख्यमंत्री भेटीत तुकाराम मुंढेंनी लक्ष वेधलं, दोन मिनिटांत ब्लड टेस्ट अन् बरंच काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 06:50 PM2022-10-15T18:50:55+5:302022-10-15T19:08:28+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली. अचानक झालेल्या या भेटीमुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं. पण या भेटीमागची सविस्तर माहिती आता समोर आली आहे.

आरोग्य विषयावर चर्चा करण्यासाठी या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. बैठकीला राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत तसंच महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी तुकाराम मुंढे यांनीही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तुकाराम मुंढे यांनी नुकतंच आयुक्त आरोग्‍य सेवा आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

राज ठाकरे शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले. राज ठाकरे अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचल्याने राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण आलं. दोघांमध्ये जवळपास दीड तास बैठक झाली.

भेटीमागचं कारण म्हणजे राज्यातील एका कंपनीनं एक अशी ब्लड चाचणी मशीन तयार केली आहे की त्यातून फक्त दोन मिनिटांत रिपोर्ट मिळतात. या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती.

अवघ्या दोन मिनिटांत वेगवेगळ्या जवळपास १४० ब्लड टेस्ट अवघ्या दोन मिनिटांत रिपोर्ट देणारी मशीनची माहिती एका कंपनीच्या काही लोकांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन दिली होती. राज ठाकरे यांना ही मशीन पाहून खरोखरच याची माहिती सरकारला द्यायला हवी. कारण ही राज्यासाठी आणि जनतेसाठी उपयोगाची आहे हे पाहून राज यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला होता.

राज ठाकरे यांनी लागलीच आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनीही ही मशीन नेमकी कशी काम करते हे जाणून घेण्याची उत्सुकता दाखवली आणि राज ठाकरे यांना तातडीने भेटीसाठी वेळ दिला.

राज ठाकरे यांच्यासोबत पक्षाचे काही नेते आणि संबंधित कंपनीचे प्रतिनिधी होते. राज्याच्या आरोग्य विभागासमोर एक सादरीकरण देखील झालं. यात नुकतेच पदभार स्विकारलेले तुकाराम मुंढे यांनीही आरोग्य खात्याच्या मार्फत सादरीकरण केलं.

विविध रक्त नमुने २ मिनिटात येणाऱ्या एका मशीनचा शोध महाराष्ट्रातील एका कंपनीनं लावलाय. या मशीनद्वारे विविध १४० टेस्टचा रिपोर्ट २ मिनिटांत येऊ शकतात. या अनोख्या शोधाचं सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर केलं गेलं. मुख्यमंत्र्यांनी ते पाहिल्यानंतर आरोग्य विभागाला तातडीनं यावर योग्य तो सकारात्मक निर्णय घ्यावा अशा सूचना केल्या आहेत.

त्यामुळे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीमागे कोणताही राजकीय विषय नाही असं सांगितलं जात आहे. पण सध्याच्या राजकीय परिस्थिती आणि अंधेरीची पोटनिवडणूक पाहता दोघांमध्ये यावर चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.