Sachin Vaze: वाझेंना नेमकं काय करायचं होतं? घरात ६२ जिवंत काडतुसं; विभागातून मिळालेली २५ काडतुसं गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 05:54 PM2021-03-25T17:54:37+5:302021-03-25T18:01:45+5:30

Sachin Vaze: सचिन वाझेंच्या एनआयए कोठडीत वाढ; ३ एप्रिलपर्यंत कोठडीतच मुक्काम

एँटिलिया स्फोटकं आणि मनसुख हिरेन प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या सचिन वाझेंबद्दल दिवसागणिक धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामुळे वाझेंचा पाय आणखी खोलात गेला आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचा तपास सचिन वाझे करत होते. मात्र राष्ट्रीय तपास यंत्रणेला त्यांच्याच विरोधात पुरावे सापडले. त्यामुळे एनआयएनं त्यांना बेड्या ठोकल्या.

सचिन वाझेंना १३ मार्चला अटक करण्यात आली. तेव्हापासून त्यांच्याविरोधात एनआयएला भक्कम पुरावे मिळाले आहे. सचिन वाझेंबद्दल अतिशय धक्कादायक माहिती समोर आल्यानं त्यांच्याविरोधात यूएपीएच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एनआयएला सचिन वाझेंच्या घरातून ६२ जिवंत काडतुसं सापडली आहेत. इतकी काडतुसं घरात का ठेवली होती, असा प्रश्न वाझेंना विचारण्यात आला. मात्र त्यांना या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही.

सचिन वाझे पोलीस अधिकारी होते. त्यांनी विभागातून ३० जिवंत काडतुसं मिळाली होती. मात्र यापैकी केवळ पाचच गोळ्या वाझेंकडे मिळाल्या. उरलेली काडतुसं कुठे आहेत, याचंही समाधानकारक उत्तर वाझेंना देता आलेलं नाही.

पोलीस विभागातून घेतलेल्या ३० पैकी २५ काडतुसांचं काय झालं, त्यांचा वापर कुठे आणि कशासाठी केला, अशी प्रश्नांची सरबत्ती एनआयएनं केली. मात्र यातल्या एकाही प्रश्नाचं व्यवस्थित उत्तरं देणं वाझेंना जमलेलं नाही, अशी माहिती एनआयएच्या वकिलांनी न्यायालयाला दिली आहे.

सचिन वाझे तपासात सहकार्य करत नसल्याचा दावादेखील एनआयएच्या वकिलांनी न्यायालयात केला. त्यानंतर वाझेंच्या कोठडीत वाढ करण्यात आली. त्यामुळे वाझेंचा कोठडीतील मुक्काम ३ एप्रिलपर्यंत वाढला आहे.

मला बळीचा बकरा केलं जात असल्याचा दावा त्यांनी केला. मी समाजाविरोधात कट केलेला नाही. तसं असल्यास एनआयएनं ते सिद्ध करावं, असं सचिन वाझे न्यायालयात म्हणाले.

मुकेश अंबानींच्या घराजवळ उभ्या करण्यात आलेल्या कारमध्ये आढळून आलेली स्फोटकं कुठून, कशी आणली, यामध्ये कोणाकोणाचा सहभाग होता, त्याची अंमलबजावणी कशी करण्यात आली, या प्रश्नांची उत्तरं अद्याप एनआयएला मिळालेली नाहीत.

अंबानींच्या घराजवळ स्फोटकं आढळून आली. मात्र तिथे डिटोनेटर आढळून आलेलं नाही. केवळ जिलेटिनच्या कांड्यांमुळे स्फोट होत नाही. त्यासाठी डिटोनेटर लागतो, असा दावा वाझेंच्या वकिलांकडून न्यायालयात करण्यात आला.

Read in English