Navneet Rana: राणा दाम्पत्यांबाबत कोर्टात काय घडलं, दोन्ही वकिलांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 02:14 PM2022-04-26T14:14:33+5:302022-04-26T14:22:27+5:30

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना सत्र न्यायालयानंही आज दिलासा दिला नाही. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आता २९ एप्रिल रोजीच सुनावणी होणार आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना सत्र न्यायालयानंही आज दिलासा दिला नाही. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आता २९ एप्रिल रोजीच सुनावणी होणार आहे.

त्यामुळे दोघांनाही आता २९ एप्रिलपर्यंत तुरुंगातच राहावं लागणार आहे. राणा दाम्पत्यानं जामीनाच्या प्रयत्नांसाठी सत्र न्यायालयात दाद मागितली होती.

पण न्यायालयानं त्यांच्या जामिन याचिकेवर २९ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. त्यानंतरच सुनावणीची तारीख ठरवू असंही सत्र न्यायालयानं म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याच्या धार्मिक मद्द्यावरुन मुंबई पोलिसांनी कलम १५३ (अ) अंतर्गत राणा दाम्पत्याला अटक केली आहे.

त्यावेळी, अटकेसाठी गेलेल्या पोलिसांसोबत हुज्जत घातली, त्यांना धक्काबुक्की केल्याचा दावा सरकारी वकिलांकडून करण्यात आला आहे.

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राणा दाम्पत्याविरोधात ३५३ कलमान्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला असून याची नोंद वेगळ्या एफआयआरमध्ये करण्यात आली आहे. दरम्यान, आज राणा दाम्पत्याच्या जामिन अर्जावर सुनावणी झाली.

या गुन्ह्यात जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे त्यामूळे राणा दाम्पत्याला खालच्या कोर्टात जामीन मिळणं अशक्य होतं म्हणून त्यांनी कालच सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलाय. आज कोर्टाने वर्कलोड पाहता 29 तारखेला पोलिसांनी उत्तर फाईल करावं असे निर्देश दिल्याचे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले.

पोलीस आपलं उत्तर फाईल करतील त्यानंतर लेखी युक्तिवाद होईल आणि आम्हाला युक्तीवादासाठी वेळ दिला जाईल. त्यामुळे 29 तारखेला सुनावणी होणं थोडं कठीण वाटत आहेत, असेही घरत यांनी म्हटले.

आज सत्र न्यायालयात आम्ही राणा दाम्पत्याच्या जामिनासाठी अर्ज केला आणि सुनावणी घेण्याची मागणी केली मात्र, आधीचे बरेच जामीन अर्ज प्रलंबित आहेत म्हणून आम्ही तातडीच्या सुनावणीची मागणी लावून धरली नाही, अशी माहिती राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी दिली.

सरकारी वकिलांनी म्हटलं की वांद्रे कोर्टात जामीन अर्ज केलेला आहे तो मागे न घेता इथे अर्ज करणं योग्य नाही. पण, आम्ही तो अर्ज मागे घेतोय. न्यायालयाने आज सांगितलं की 29 तारखेला पोलिसांनी जामीन अर्जावर उत्तर फाईल करावं त्यानंतर सुनावणी होईल, असेही मर्चंट म्हणाले.