मापात पाप कराल, तर होईल खटला दाखल! भाजीपाला, धान्य विकताना बेइमानी नको

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 10:48 AM2023-03-10T10:48:47+5:302023-03-10T11:06:32+5:30

तक्रारदाराचं नावही गुप्त ठेवलं जातं, पाहा कोठे तक्रार करता येणार.

अनेकदा दुकानदारांकडून धान्याची विक्री करताना वजन काट्यात फेरफार करून ग्राहकांना कमी धान्य देऊन जास्तीचे पैसे वसूल केले जातात. भाजीपाला विकतानाही असाच प्रकार घडतो. त्यामुळे आता जर असे कराल, तर खटला दाखल केला जाईल, असा इशारा वैधमापन अधिकाऱ्यांनी दिला आहे.

व्यवसाय करताना बेइमानी करता कामा नये. प्रामाणिकपणे ग्राहकांना सेवा द्यावी. किराणा माल दुकान, भाजी विक्री हा ग्राहकांच्या मूलभूत गरजा भागविणारा व्यवसाय आहे. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक केल्यास अन् त्यासंबंधी तक्रार आली, तर थेट कारवाई करण्यात येईल.

जर पुराव्यानिशी तक्रार आल्यास संबंधित दुकानदाराला कोर्टाची पायरीही चढावी लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे व्यवसाय करताना प्रामाणिक राहा, त्यामुळे ग्राहकांचाही विश्वास वाढेल अन् व्यावसायातही भरभरटी येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

ग्राहकांनी भाजीपाला खरेदीवेळी सजग राहिले पाहिजे. सध्या घाऊकपासून ते किरकोळ बाजारातदेखील ‘खाचा’ मारला जातो. त्यामुळे ग्राहकांनी भाजीपाला खरेदी करताना योग्य प्रमाणात भाजी मिळत आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या दुकानदारांवर वैधमापन विभागाने कारवाई केली आहे. ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेत जवळपास ५५८ आस्थापने आणि ३१ लोकांवर कारवाई केली आहे.

वजन, मापेसंदर्भात काही तक्रार असल्यास कोणतीही जागृत व्यक्ती किंवा ग्राहक स्वतःहून तक्रार किंवा माहिती दिल्यास त्याचे नाव गुपित ठेवण्यात येते. आपल्या दररोजच्या व्यवहारात खरेदी करताना वजन आणि मापाशी आपला संबंध येत असतो.

अनेकदा किरकोळ व्यवहार असतानाही अशाप्रकारे मापात पाप केले जाते. तेव्हा नागरिकांनी जागरूकपणे हा व्यवहार करावा आणि कोणी काटामारी करून फसवत असेल तर त्याची तक्रार केल्यास आणि तो दोषी आढळल्यास त्यावर खटला दाखल होतो, असे मुंबई वैधमापन अधिकाऱ्यांनी सांगितले.

ग्राहकांना काही तक्रार असल्यास वैधमापन शास्त्र यंत्रणेच्या ०२२-२२६२२०२२ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा dclmms_complaints@yahoo.in ई-मेलवर करता येईल.

टॅग्स :मुंबईMumbai