Aditya Thackeray: 'लोकशाही अन् संविधानासाठी मी चालतोय'; आदित्य ठाकरेंची जादू की झप्पी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 07:31 PM2022-11-11T19:31:41+5:302022-11-11T19:52:19+5:30

देशातील संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे. याविरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून भारत जोडो यात्रेत आम्ही एकत्र आलो आहोत, अशी भूमिका युवासेना प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली.

देशातील संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे. याविरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून भारत जोडो यात्रेत आम्ही एकत्र आलो आहोत, अशी भूमिका युवासेना प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली.

आदित्य ठाकरे हे भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी आज नांदेड येथे दाखल झाले. नांदेडमधील यात्रेत पोहोचताच त्यांनी राहुल गांधींची गळाभेट घेतली. यावेळी, राहुल गांधींना जादू की झप्पी त्यांनी यात्रेत पायी सहभाग घेतला.

हिवरा फाटा येथून आज दुपारी चार वाजता भारत जोडो यात्रेला सुरवात करण्यात आली. यावेळी यात्रेचे स्वागत आमदार डॉ प्रज्ञा सातव यांनी स्वागत केले. त्यानंतर यात्रेत शिवसेनेचे आदित्य ठाकरे, विश्वजित कदम सहभागी झाले.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादावरही भाष्य केलं. मात्र, आदित्य यांच्या सहभागावरुन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी टोला लगावला आहे.

यात्रेला प्रतिसाद चांगला आहे. माझ्यासोबत अनेक शिवसैनिक यात्रेत सहभागी झाले आहेत. सध्या राज्यात घटनाबाह्य सरकार आहे. खा. संजय राऊत यांच्या जामिनावरील निकालपत्रावरून सरकारी यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे दिसते.

देशात लोकशाही उरली नाही. राज्य सरकारला शिवी देणार मंत्री अब्दुल सत्तार चालतात, बंदूक काढणारे चालतात. राजकारण सोडून राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा,असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

आदित्य यांनी यात्रेतील सहभागाचे फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. तसेच, walking for democracy and constitution... असे कॅप्शन आदित्य ठाकरेंनी या फोटोंसह लिहिले आहे.

विशेष म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत यांनीही राहुल गांधी आणि आदित्य ठाकरेंचा फोटो ट्विटरवरुन शेअर केला आहे. त्यासोबत, दोन शक्तीमान युवा नेते एकसाथ असे कॅप्शन संजय राऊत यांनी दिले आहे.

दरम्यान, यात्रेत रस्त्यावर ठिकठिकाणी पारंपरिक वेशभूषा केलेल्या नागरिकांनी वाद्ये वाजवत यात्रेचे स्वागत केले. खास लातूर येथून आणलेला गजराज ही यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

यात्रेत शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबन थोरात, माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. हिंगोली जिल्हा सीमेवर यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.