दसरा मेळावा होणारच! शिवाजी पार्क न मिळाल्यास शिवसेनेचा 'प्लान बी' तयार, शोधून काढला जबरदस्त पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 12:35 PM2022-09-23T12:35:04+5:302022-09-23T12:41:13+5:30

दसरा मेळाव्यावरुन शिंदे आणि ठाकरे एकमेकांसमोर आले आहेत. दोन्ही गटाकडून शिवाज पार्क मैदानासाठी आग्रह करण्यात आला आहे. तर पालिकेनं कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणात्सव दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. पण शिवसेना आता याविरोधात थेट मुंबई हायकोर्टात गेली आहे.

मुंबई हायकोर्टाकडूनही काहीच दिलासा न मिळाल्यास शिवसेनेनं 'प्लान बी' देखील तयार केला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. शिवाजी पार्क मिळो न मिळो दसरा मेळावा होणारच अशी ठाम भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी पक्ष कामाला लागला आहे आणि यासाठी शिवाजी पार्कच्या तोडीच्या पर्यायी जागा चाचपडून पाहिल्या जात आहेत.

शिवाजी पार्क मिळालं नाही. तर एका बाजूला मुंबईचा समुद्र आणि दुसऱ्या बाजूला शिवसैनिकांचा जनसागर अशी सांगड घालत थेट गिरगाव चौपाटीवर मेळावा घेण्यासाठी शिवसेनेकडून चाचपणी सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. गिरगाव चौपाटीसोबतच महालक्ष्मी रेसकोर्स आणि शिवसेना भवनासमोरील रस्त्यासाठीचीही शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे.

शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेण्यासाठी अजूनही शिवसेना आग्रही आहे. त्यासाठी थेट हायकोर्टात धाव घेतली आहे. आज कोर्टात यावर सुनावणी होणार असून निर्णय अपेक्षित आहे. कोर्टानं नकारात्मक निकाल दिल्यास शिवसेना आपले पत्ते उघडणार असल्याची माहिती मिळाली आहे.

शिवसेनेतील ज्येष्ठनेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यामुळे आता शिवसेनेत उभी फूट पडली असल्याचे बोलले जात आहे. आता काही महिन्यातच मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण तापू लागले आहे.

आता दोन्ही गटातील वाद पाहाता हायकोर्ट काय निकाल देतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसऱ्याबाजूला शिंदे गटाच्या मेळाव्याला बीकेसीतील एमएमआरडी मैदानाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे शिवाजी पार्क न मिळाल्यास शिंदे गटाचा मेळावा बीकेसीमध्ये होणार हे निश्चित झालं आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून मेळाव्यासाठी शक्तीप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.

शिंदे गटाच्या मेळाव्याला आव्हान देण्यासाठी शिवसेनेकडूनही पर्यायी प्लान तयार करण्यात आला आहे. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी मुंबईत दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन पाहायला मिळणार हे निश्चित मानलं जात आहे. आता यात नेमकं वरचढ कोण ठरतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंनी गट प्रमुखांच्या मेळाव्यातही आक्रमक भूमिका घेत शिवाजी पार्कमध्येच दसरा मेळावा होणार असा ठाम निर्धार बोलून दाखवला आहे. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्क मैदानाच्या परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. शिवाजी पार्क मैदान न मिळाल्यास जवळच असलेल्या शिवसेना भवनासमोरील रस्त्यावर मेळावा घेण्याचा शिवसेनेचा प्लान बी असल्याचं सांगण्यात येत आहे.