ट्रेनच्या दरवाजात उभ्या तरुणीच्या हातावर काठी मारुन मोबाइल चोरीचा प्रयत्न, ट्रेनमधून पडून तरुणी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 10:08 AM2018-02-09T10:08:11+5:302018-02-09T10:46:20+5:30

द्रविता ट्रॅकमध्ये पडलेली असताना दुसऱ्या लोकलनं तिला धडक दिली. या अपघातात तिला आपला एक पाय आणि हाताची काही बोटं गमवावी लागली.

Woman falls of train and gets injured in robbery bid | ट्रेनच्या दरवाजात उभ्या तरुणीच्या हातावर काठी मारुन मोबाइल चोरीचा प्रयत्न, ट्रेनमधून पडून तरुणी गंभीर जखमी

ट्रेनच्या दरवाजात उभ्या तरुणीच्या हातावर काठी मारुन मोबाइल चोरीचा प्रयत्न, ट्रेनमधून पडून तरुणी गंभीर जखमी

Next

मुंबई - ट्रेनच्या दरवाजात उभ्या 23 वर्षीय तरुणीच्या हातावर काठी मारुन मोबाइल चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. चोरीच्या या प्रयत्नात तरुणी चालत्या ट्रेनमधून खाली पडून गंभीर जखमी झाली आहे. मोबाइल फोन चोराने तरुणीच्या हातावर काठी मारल्याने तिचा तोल गेला आणि ती खाली पडली, ज्यामुळे तिला गंभीर जखमा झाल्या आहेत अशी माहिती आरपीएफ अधिका-याने दिली आहे. तरुणी सीएसटीएमच्या दिशने जाणा-या लोकलमध्ये प्रवास करत असताना सॅण्डहर्स्ट रोड आणि मस्जिद स्थानकादरम्यान ही घटना घडली. रेल्वे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अल्पवयीन मोबाइल चोराला ताब्यात घेतलं आहे. 

कल्याणची रहिवासी असणारी द्रविता सिंह गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी घरातून निघाली होती. सीएसटीएमच्या दिशेने जाणारी लेडिज स्पेशल ट्रेन तिने पकडली होती. फोर्टमध्ये द्रविताचं ऑफिस आहे. ट्रेनमध्ये प्रवास करत असताना नेटवर्क नसल्या कारणाने फोनवर बोलण्यासाठी ती दरवाजाजवळ येऊन उभी राहिली होती. लोकलने सॅण्डहर्स्ट रोड स्टेशन सोडल्यानंतर मस्जिद स्टेशनजवळ वेग कमी होताच प्लॅटफॉर्मवर उभ्या एका तरुणाने काठीने द्रविताच्या हातावर फटका मारला. सकाळी 9 वाजता ही घटना घडली. 

अनपेक्षितपणे हातावर बसलेल्या फटक्यामुळे द्रविता ट्रेनमधून खाली पडली. द्रविता ट्रॅकमध्ये पडलेली असताना दुसऱ्या लोकलनं तिला धडक दिली. या अपघातात तिला आपला एक पाय आणि हाताची काही बोटं गमवावी लागली. यावेळी आरोपी मात्र संधी साधून मोबाइल घेऊन पळून गेला. 

घटनेला साक्षीदार असणा-या उपस्थित प्रवाशांनी द्रविताला रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. द्रविताला गंभीर जखमा झाल्या असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान जीआरपीला अल्पवयीन आरोपीची माहिती मिळाली. सॅण्डहर्स्ट रोड आणि मस्जिद परिसरातील सीसीटीव्हींची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याविरोधात कलम 307 (हत्येचा प्रयत्न), 397 (चोरी), आणि 394(चोरी करताना जाणुनबुजून इजा पोहोचवणे) गुनहा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास अद्याप सुरु आहे. 
 

Web Title: Woman falls of train and gets injured in robbery bid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.