योग्य-अयोग्य काय, याचा अभ्यास करणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 02:25 AM2019-04-07T02:25:49+5:302019-04-07T02:26:01+5:30

३० मिनिटांचा प्रवास । हार्बर मार्गावरून प्रवास करताना ‘लोकमत’ प्रतिनिधीने जाणून घेतले जनतेचे ‘मत’

Will be studying what is right! | योग्य-अयोग्य काय, याचा अभ्यास करणार!

योग्य-अयोग्य काय, याचा अभ्यास करणार!

googlenewsNext

- भक्ती सोमण 


मुंबई : आम्ही डोळसपणे मतदान करणार आहोत. टीव्ही, सोशल मीडियावर अनेक पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. बरेच मिम्सही व्हायरल होत आहेत. त्या सगळ्यावर विश्वास ठेवून मत देणं योग्य होणार नाही. म्हणून आम्ही सोशल मीडियाचा आधार घेऊन योग्य काय, अयोग्य काय, याचा अभ्यास करूनच मत देणार आहोत... ही भावना आहे, हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या तरुण-तरुणींची.


या मार्गावर दुपारच्या वेळेत प्रवास करणाऱ्यांमध्ये कॉलेजमधील मुला-मुलींची संख्या जास्त आहे. त्यामुळे पहिल्यांदा अशा ग्रुपला गाठले. मतदान करायला आम्ही खूपच उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.


सध्या अनेक घोटाळ्यांची चर्चा सुरू आहे. आधीचे सरकार असतानाही ते झालेले आहेतच. त्यामुळे कोणामुळे चांगले बदल घडले आहेत आणि घडू शकतील, याचा अभ्यासही आम्ही एकीकडे करत आहोत. कुठलाही बदल घडायला काही कालावधी जावाच लागतो. तो वेळ सगळ्यांनाच द्यायला हवा. याबाबत आम्ही मित्र-मैत्रिणी एकमेकांशी चर्चा करत आहोत. सत्यता पडताळून घेत आहोत. व्हायरल चेक सुरू आहे... असे सांगत त्यांनी सोशल मीडियाच्या पोस्टबद्दल कितपत जागरूक आहोत, ते स्पष्ट केले.


एका अर्थी या निवडणुकीला खूपच मजा येणार आहे, असे या मुलांना वाटते आहे.
जेव्हा ही चर्चा रंगत गेली, तेव्हा डब्यातील अन्य प्रवासीही त्यात सहभागी झाले. ‘निवडणुका आल्या की प्रत्येक जण मी किती चांगले काम केले, हे सांगण्याच्या प्रयत्नात असतो. आता तर सोशल मीडियामुळे ते काम अधिक सोपे झाले आहे. मात्र, या सगळ्यावर विश्वास ठेवण्याआधी त्यांनी खरंच किती काम केले, हे पडताळून पाहायला हवे,’ अशी स्पष्ट प्रतिक्रिया जयेश ओक यांनी दिली.
महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक उमेदवाराला, पक्षाला स्वत:ला सिद्ध करायची संधी मिळायला हवी. आधीचे सरकार खूप काळ सत्तेवर होते. आताच्या सरकारलाही आणखी बदल घडवायला वेळ मिळायला पाहिजे, अशी भूमिका अनिश सावंत यांनी मांडली. त्याला लगेचच उत्तरही दिले गेले. गेल्या पाच वर्षांत नेमके काय केले, असा जाब विचारला गेला. जीएसटीतील बदल काहींना योग्य वाटले, तर काहींना अयोग्य. त्यामुळे या विषयी चर्चा सुरू असताना जीएसटीच्या अतिरिक्त भारामुळे हॉटेल व्यवसायाला काही काळ कसा तोटा सहन करावा लागला, याविषयी बबन ढापरे यांनी तावातावाने चर्चा केली. त्याला अनेकांनी पाठिंबा दर्शविला. या तोट्यामुळे त्यांनी मी खूप नाराज असल्याचे सांगत, नोटा पर्यायाचा विचार करत असल्याचे ते म्हणाले. पुरुषांच्या डब्यातून उतरत असताना पटकन दोघांनी थांबत सरकार कोणतेही आले, तरी जे सरकार चांगल्या सुविधा देईल, त्याला मत देणे फायद्याचे ठरेल, असे मत मांडले.


महिलांच्या डब्यात प्रवास करताना एक जाणवले, महिला निवडणुकांविषयी बोलायला फारशा उत्सुक नाहीत. त्यांना बोलते करावे लागले. एका गुजराती स्त्रीने मी गुजराती आहे, म्हणून कुणा एकाची बाजू घेतेय, असे तुम्हाला वाटू शकते, असे सांगताना ‘जे सध्या आहे त्याने मी समाधानी आहे,’ असे स्पष्ट करताना नाव सांगणार नाही, असा आग्रह धरला. काही महिलांनी मतदान नक्की करणारच, असे सांगताना महागाईसारखे महत्त्वाचे प्रश्न सरकारने सोडवावेत. मग ते कोणतेही सरकार का असेना, यावर भर दिला.


सुमन कचरे यांनी आमच्या सुरक्षेचे काय, हा प्रश्न उपस्थित केला. त्याबद्दल विचारता, हार्बर मार्गावरील शहरांत अनेक चांगल्या सुविधा आहेत, पण लोकल प्रवास म्हणावा तितका सुरक्षित नाही. कुर्ल्यानंतरची चेंबूर, गोवंडी, मानखुर्द या स्थानकांची अवस्था फारशी चांगली नाहीच. एक्सलेटर वगैरे ठीक आहे, पण इथे स्वच्छतेचा, सुरक्षेचा अभाव कायम दिसतो, असे स्पष्ट केले. महिलांसाठी स्वच्छ स्वच्छतागृहे असावीत, अशी आमची कायमच अपेक्षा असल्याचे मत लगेचच डब्यातील अन्य महिलांनीही मांडले. त्यानंतर, आमच्या सुरक्षेसाठी ठोस पावले सरकारने उचलली आहेत, असे फारसे दिसले नाही. त्यामुळे मतदान करताना मी याबाबत गंभीरपणे विचार करून मतदान करेन, असे स्नेहा यांनी सांगितले.

Web Title: Will be studying what is right!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Lokmatलोकमत