का होते एलफिन्स्टन - परळ स्थानकांमध्ये प्रचंड गर्दी? जाणुन घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 11:58 AM2017-09-29T11:58:14+5:302017-09-29T12:44:36+5:30

एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाली आहे. पंधरा प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असून, 20 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.  

Why was Elphinstone - a huge crowd in Parel stations? Know ... | का होते एलफिन्स्टन - परळ स्थानकांमध्ये प्रचंड गर्दी? जाणुन घ्या...

का होते एलफिन्स्टन - परळ स्थानकांमध्ये प्रचंड गर्दी? जाणुन घ्या...

Next
ठळक मुद्देपरेल-एलफिन्स्टन स्थानकाला जोडणारा हा पूल आहे अत्यंत अरुंद आहे.

मुंबई - एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाली आहे. पंधरा प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असून, 20 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.  परेल-एलफिन्स्टन स्थानकाला जोडणारा हा पूल आहे अत्यंत अरुंद आहे. परेल स्टेशनकडे जाणा-या जिन्यावर नेहमी पोलीस तैनात असतात. चेंगरा-चेंगरीची दुर्घटना घडू नये यासाठी गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलीस तैनात असतात. काय आहे या स्थानकांची स्थिती... 
 

काय आहेत परेल स्थानकाची नेमकी स्थिती

- परेल स्थानकात वर्षाला 22 लाख तिकीटांची विक्री होते. 

- पूर्वी गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणा-या या भागात आता कॉर्पोरेट हाऊसेस, मॉल्स उभे राहिले आहेत. 

- परेलमध्ये केईएम आणि टाटा मेमोरीयल ही महत्वाची रुग्णालये आहेत. त्यामुळे रविवार वगळता दरदिवशी इथे रुग्णांची मोठी गर्दी असते. 

-  शिवडी, लोअर परेल, वरळीला अनेक ऑफीसेस आहेत. या भागात काम करणाऱ्या चाकरमान्यांची संख्या प्रचंड वाढली आहे.

- सकाळी 8.30 ते 11 वाजेपर्यंत तर, संध्याकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत इथे गर्दी होत असते. 

- गर्दीच्यावेळी परेल स्थानकात ट्रेन आल्यानंतर या पूलावर मोठी गर्दी होते. 

-  परेल स्थानकात दोन प्लॅटफॉर्म आहेत. एक प्लॅटफॉर्म प्रवाशांसाठी आहे तर, दुसरा 3-4 नंबर प्लॅटफॉर्म परेल वर्कशॉपमधल्या प्रवाशांसाठी आहे.

- अनेक जण दादरला होणारी प्रचंड गर्दी टाळण्यासाठी पुढे परळला उतरतात, त्यामुळेही इथल्या गर्दीत भर पडते.

- रेल्वे प्रशासनानं दादरच्या दिशेला परळमध्ये पूल बांधला. परंतु हा पूल उपयोगाचा नसल्याच्या लोकांच्या प्रतिक्रियेला रेल्वे प्रशासनानं केराची टोपली दाखवली.

- दादरच्या दिशेचा पूल उपयोगाचा नसून सीएसटीएम दिशेला पुलाची गरज आहे, असं वारंवार सांगुनही प्रवाशांच्या मागणीची दखल रेल्वेनं घेतली नाही आणि अशी दुर्घटना घडली आहे.

नेमके काय घडले?

सकाळपासूनच मुंबई शहरात कोसळणाऱ्या पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. यावेळी परेल आणि एलफिन्स्टन रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या पुलावर प्रचंड गर्दी झाली होती. यादरम्यान पुलावरील पत्र्याचा काही भाग खाली कोसळल्याचे वृत्त समोर आले. मात्र पूल सुरक्षित होता. पण या घटनेदरम्यान प्रवाशांमध्ये पूल पडल्याची अफवा पसरल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि याचे रूपांतर चेंगराचेंगरीत झाले. नेमका याचसुमारास जोरदार पाऊस पडला आणि अनेक प्रवासी बाहेर न जाता खोळंबले होते. त्यात नवीन येणारी प्रत्येक गाडी हजारो प्रवासी या दोन्ही स्टेशनांवर येत होते. त्यामुळे थोड्याच वेळात या स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली. त्यात झालेल्या लहान घटनेमध्ये पूल पडल्याच्या अफवेची भर पडली. काहीजणांनी शॉर्ट सर्किट झाल्याची बोंब ठोकली. या सगळ्याचा विपरीत परिणाम होत प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि चेंगराचेंगरीची तीव्रता वाढली.

अफवांवर विश्वास ठेवू नका

अग्निशमन दल आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे. वाहतूक आणि प्रवाशांसाठी हा पूल तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, पूल पडल्याच्या किंवा शॉर्ट सर्किटच्या कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

Web Title: Why was Elphinstone - a huge crowd in Parel stations? Know ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.