अस्वच्छतेच्या विळख्यातून आमची सुटका कधी? महाराष्ट्र नगरमधील रहिवाशांचा आर्त सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 10:15 AM2024-05-03T10:15:09+5:302024-05-03T10:17:29+5:30

नाले गाळातच, रुंदीकरणाचेही भिजत घोंगडे.

when will we be freed from the scourge of impurity a concern of the residents of mankhurd maharashtra nagar asked to government | अस्वच्छतेच्या विळख्यातून आमची सुटका कधी? महाराष्ट्र नगरमधील रहिवाशांचा आर्त सवाल 

अस्वच्छतेच्या विळख्यातून आमची सुटका कधी? महाराष्ट्र नगरमधील रहिवाशांचा आर्त सवाल 

मुंबई : निवडणुका आल्यावर मतदारराजाची आठवण होणाऱ्या नेत्यांना मानखुर्द येथील महाराष्ट्र नगरमधील प्रश्नांचा मात्र विसर पडला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मानखुर्द येथील नाल्याच्या रुंदीकरणाचे भिजत घोंगडे पडले आहे. त्याचबरोबर या वस्तीला अस्वच्छतेचा विखळा पडला असून, वस्त्यांमधील स्वच्छतागृहांचीही दुरवस्था झाली आहे. यंदा निवडणुकीच्या वर्षात तरी लोकप्रतिनिधी या समस्यांकडे लक्ष देतील का, असा प्रश्न आता रहिवासी विचारत आहेत. 

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील मानखुर्दमधील महाराष्ट्र नगरमध्ये शिरताच सर्वत्र धूळ आणि दुर्गंधी पसरलेली दिसते. या भागात नियमित साफसफाई केली जात नसल्याने बहुतांश ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग दिसतात. सर्वत्र माशांचा वावर दिसून येतो. यातून रोगराई वाढत असून सर्दी आणि तत्सम आजार नित्याचेच झाल्याचे स्थानिक रहिवासी लता कांबळे यांनी सांगितले. 

महाराष्ट्र नगर वस्ती आणि बीआरसीचा परिसर यांच्यामधून जाणाऱ्या नाल्याचे पाणी दरवर्षी पावसाळ्यात परिसरातील झोपड्यांमध्ये शिरते. नाल्याच्या रुंदीकरणाचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून रखडले आहे. रुंदीकरणासाठी २०१७ मध्ये स्थानिकांना नोटिसा बजावल्या होत्या. जवळपास १४०० कुटुंबांचे स्थलांतरण केले जाणार आहे. २०२४ उलटले तरी रुंदीकरणाचे काम अपूर्ण आहे. दरवर्षी पावसाळ्यात येथील घरांमध्ये नाल्याचे दूषित पाणी शिरल्याने रहिवशांना एक-दोन दिवस घरातील पोटमाळ्यावर जीव मुठीत धरून राहावे लागते, अशी व्यथा नाला रुंदीकरणासाठी पाठपुरावा करणाऱ्या रहिवासी संगीता कांबळे यांनी मांडली. 

परिसरात तुटपुंज्या कचराकुंड्या ठेवलेल्या आहेत. रहिवाशांना नाइलाजास्तव कचरा रस्त्याकडेला टाकावा लागतो. त्यातून परिसरात अस्वच्छता पसरते. निवेदने देऊनही कचराकुंड्या वाढविलेल्या नाहीत, असे रहिवासी गुडिया जयस्वाल यांनी सांगितले. कचऱ्याने भरलेल्या नाल्यांची सफाईच होत नसल्याने पावसाळ्यात सर्व पाणी रस्त्यांवरून वाहते. हे गटरातील दूषित पाणी घरात शिरते. त्यातूनच चालत घर गाठावे लागते, 
अशी व्यथा रहिवासी सुवर्णा पाटील यांनी मांडली.

शौचालयांचे डबे ठेवले, स्वच्छतेचा विसर-

१)  या भागातील एकता नगरमध्ये रहिवाशांसाठी स्वच्छतागृह नाही. स्थानिकांच्या तक्रारीनंतर रस्त्याच्या कडेला पत्र्याचे शौचालयाचे दोन डबे ठेवले आहेत. मात्र, त्यांची साफसफाई होत नाही. 

२)  या शौचालयामध्ये ना-पाणी, ना-लाइट आहे. रात्रीच्या वेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने शौचालयाचा वापर शक्य नसल्याने दूरवर असलेल्या शौचालयाचा पैसे देऊन वापर करतो, अशी प्रतिक्रिया मंदा डोंगरदेवे यांनी दिली. ही स्थिती शिवकृपा चाळीतील शौचालयाची आहे. 

३) पत्र्याच्या शौचालयात लाइट आणि पाणीपुरवठा करण्यासाठी निधी नसल्याचे अधिकारी सांगतात. मूलभूत सुविधांसाठी निधी नसताना शहरात कोट्यवधी रुपयांच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी निधी मात्र कमी पडत नाही, अशी टीका गोदाबाई मादगुडे यांनी केली. 

Web Title: when will we be freed from the scourge of impurity a concern of the residents of mankhurd maharashtra nagar asked to government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.