‘अलिबाग से आया है क्या?’वर बंदी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 06:28 AM2019-07-20T06:28:48+5:302019-07-20T06:29:03+5:30

‘अलिबाग से आया है क्या?’ अशा होणाऱ्या उल्लेखावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली.

'What has come from Alibag?' No ban on this | ‘अलिबाग से आया है क्या?’वर बंदी नाही

‘अलिबाग से आया है क्या?’वर बंदी नाही

Next

मुंबई: ‘अलिबाग से आया है क्या?’ अशा होणाऱ्या उल्लेखावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. प्रत्येक समाजावर विनोद केले जातात. त्यात मानहानिकारक काही नाही. त्याकडे अपमान म्हणून पाहू नये. उलट प्रत्येकाने त्याचा आनंद लुटावा, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले.
कोणी भाबडा असेल, तर त्याला उद्देशून ‘अलिबाग से आया है क्या?’ असे म्हणण्यात येते. हा उल्लेख केवळ महाराष्ट्रात करण्यात येतो, असे अलिबागचे रहिवासी राजेंद्र ठाकूर यांनी याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. प्रदीप नंद्राजोग व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर होती.
‘प्रत्येक समाजावर विनोद केले जातात येतात... संता बंता, मद्रासी आणि उत्तर भारतीयांवरही विनोद करण्यात येतात. मजा करा...अपमान झाला असे समजू नका,’ असे मुख्य न्या. प्रदीप नंद्राजोग यांनी म्हटले. ‘यामध्ये मानहानी आहे, असे आम्हाला वाटत नाही,’ असेही न्यायालयाने म्हटले. ही म्हण अपमानास्पद व अयोग्य आहे. या उल्लेखाद्वारे अलिबागचे लोक अशिक्षित असल्याचे दाखविण्यात येते. वास्तविक, अलिबाग हे खूप चांगले ठिकाण आहे. येथे पर्यटक आकर्षित होतात. येथे शाळा आहेत आणि येथील लोक सुशिक्षितही आहेत, असे ठाकूर यांनी याचिकेत म्हटले आहे.
अलिबाग निसर्गसमृद्ध असून, संस्कृती, इंडस्ट्री, वैद्यकीय सुविधा आणि शिक्षण हे सर्व असतानाही, या शहराची अशी अहवेलना करणे आक्षेपार्ह आहे. त्यामुळे लोकांना अशी टिप्पणी करण्यापासून रोखण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणी ठाकूर यांनी जनहित याचिकेद्वारे केली होती. तसेच चित्रपट, लघुपट, टीव्ही मालिका इत्यादींना ‘अलिबाग से आया है क्या?’ हा संवाद वापरण्यास मनाई करावी. त्यांना सेन्सॉर प्रमाणपत्र देऊ नये, अशीही विनंती ठाकूर यांनी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला.
>ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे
छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी अलिबाग वसवले. निसर्गरम्य समुद्र किनारे, सागरी किल्ले, देवस्थान, अभयारण्य यांनी समृद्ध असलेल्या रायगड जिल्ह्याचा हा एक भाग आहे. तसेच नव्याने विकसित करण्यात आलेले सरकारी आणि खासगी उद्योगधंदे हे या ठिकाणाचे महत्त्व अधोरेखित करतात, असे याचिकेत म्हटले आहे.

Web Title: 'What has come from Alibag?' No ban on this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.