गरिबांसाठीच्या किमान उत्पन्न हमीचे काँग्रेसजनांकडून स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 05:42 AM2019-01-30T05:42:00+5:302019-01-30T05:42:21+5:30

उत्पन्न हमीची घोषणा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे, तर काँग्रेस सरकार महाराष्ट्राला गरिबीमुक्त करेल, असे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी म्हटले आहे.

Welcome to Congressional Minimum Income Guarantee for Poor | गरिबांसाठीच्या किमान उत्पन्न हमीचे काँग्रेसजनांकडून स्वागत

गरिबांसाठीच्या किमान उत्पन्न हमीचे काँग्रेसजनांकडून स्वागत

Next

मुंबई : सत्तेत आल्यास गरिबांना किमान उत्पन्नाची हमी देऊ, या राहुल गांधी यांच्या निवडणूक आश्वासनाचे काँग्रेसजनांकडून जोरदार स्वागत होत आहे. उत्पन्न हमीची घोषणा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे, तर काँग्रेस सरकार महाराष्ट्राला गरिबीमुक्त करेल, असे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी किमान उत्पन्न हमीचे आश्वासन दिल्यानंतर, मंगळवारी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेत या घोषणेचे स्वागत केले. घोषणेची अंमलबजावणी सुरू झाल्यावर एकाही गरीब व्यक्तीला आपल्या मूलभूत गरजांसाठी इतरांवर विसंबून राहण्याची गरज भासणार नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले. काँग्रेसने मनरेगा, शिक्षण हक्क कायदा, अन्नसुरक्षा कायदा आणला. आता प्रत्येकाला किमान उत्पन्न देण्याच्या दिशेने काँग्रेसने पाऊल उचलले आहे. काँग्रेस दिलेला शब्द पाळतो, भाजपाप्रमाणे शब्द फिरविण्याची किंवा जुमलेबाजीची परंपरा काँग्रेसमध्ये नाही, असा टोलाही अशोक चव्हाण यांनी लगावला. भाजपा सरकारच्या काळात कुपोषण आणि भूकबळींची समस्या गंभीर झाली आहे. महाराष्ट्रात कुपोषणामुळे हजारो मृत्यू होत आहेत. अशा परिस्थितीत ही योजना गरिबांसाठी वरदान ठरेल, असेही चव्हाण म्हणाले.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या निर्णयाचे स्वागत करताना, राहुल गांधी यांच्या घोषणेमुळे गरिबांबाबत काँग्रेसची कटिबद्धता अधोरेखित झाल्याचे म्हटले. मोदी, फडणवीस सरकारच्या काळात गरिबांचे खच्चीकरण सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी या योजनेतून गरिबांना मोठा आधार मिळणार असल्याचे सांगितले. किमान वेतनाची नवीन योजना शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागात राबविली जाणार आहे. आज मुंबईतील प्रत्येकी ५ नागरिकांपैकी १ जण दारिद्र्यरेषेखाली आहे. त्यांना न्याय देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे निरुपम म्हणाले. २०१९ निवडणुकीनंतर महाराष्ट्रात आणि केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यावर गरिबांना किमान उत्पन्न योजना सुरू करून गरिबीमुक्त भारत आम्ही निर्माण करणार, असा दावाही त्यांनी केला.

Web Title: Welcome to Congressional Minimum Income Guarantee for Poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.