महामानवाला वंदन करत अनुयायी परतीच्या वाटेवर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 04:04 AM2018-12-07T04:04:06+5:302018-12-07T04:04:14+5:30

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतिस्थळाला वंदन केल्यानंतर लाखो अनुयायी गुरुवारी परतीच्या वाटेवर निघाले.

 On the way to the followers walking the bowl of the great man | महामानवाला वंदन करत अनुयायी परतीच्या वाटेवर

महामानवाला वंदन करत अनुयायी परतीच्या वाटेवर

Next

मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतिस्थळाला वंदन केल्यानंतर लाखो अनुयायी गुरुवारी परतीच्या वाटेवर निघाले. गर्दी टाळण्यासाठी मंगळवारपासून मोठ्या संख्येने अनुयायी महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आले होते. त्यातील बहुसंख्य भीमसैनिकांनी गुरुवारपर्यंत शिवाजी पार्कवर मुक्काम केल्यानंतर परतीचा प्रवास सुरू केला.
परतीच्या वाटेवर निघालेल्या अनुयायांच्या गुरुवारी सकाळपासूनच दादर रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाण्यासाठी रांगा दिसत होत्या. दादर, मुंबई सेंट्रल, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस अशा विविध ठिकाणांहून रेल्वे प्रवास करण्यासाठी अनुयायी स्थानिकांकडे चौकशी करताना दिसले. सुरक्षेसह वाहतुकीचीही योग्य खबरदारी पोलिसांनी घेतल्याचे चित्र दादरमधील चैत्यभूमीसह शिवाजी पार्क परिसरात दिसले. मात्र मोठ्या संख्येने परतीच्या वाटेवर निघालेल्या अनुयायांमुळे लोकमान्य टिळक उड्डाणपुलावर काही काळासाठी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. निळे झेंडे लावलेल्या खासगी बस, रिक्षा, दुचाकी अशा वाहनांचा ताफाच दुपारनंतर शिवाजी पार्क व चैत्यभूमीच्या दिशेने जाताना दिसत होता. मुंबईतील उपनगरीय सेवा, लांब पल्ल्याची रेल्वे सेवा याद्वारे आलेल्या या भीमसैनिकांमुळे मुंबईतील रेल्वे स्थानक, लोकलमध्ये गर्दी झाली होती. रेल्वेमध्ये बाबासाहेबांचा जयघोष अनुयायांकडून केला जात होता.
>विशेष गाड्यांना प्रतिसाद
मध्य व पश्चिम रेल्वेने आंबेडकरी अनुयायांच्या सोयीसाठी मध्यरात्री ते पहाटे दरम्यान विशेष उपनगरीय फेऱ्या चालवल्या. त्याशिवाय लांब पल्ल्याच्या गाड्यादेखील चालवण्यात आल्या. या सर्व सेवांना प्रवाशांचा तुडुंब प्रतिसाद मिळत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली.
>व्यसनमुक्तीसह कामगार नोंदणीचे आवाहन
महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्कवर येणाºया अनुयायांच्या माध्यमातून राज्याच्या नशाबंदी मंडळाने व्यसनमुक्तीचा संदेश दिला. तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून माहिती पुस्तिकेचे वाटप करताना कामगार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत होते.
महापरिनिर्वाण दिनासाठी लाखो अनुयायी चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क येथे एकटवतात. त्यांच्या माध्यमातून राज्यभर व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी नशाबंदी मंडळाने या ठिकाणी स्टॉलची उभारणी केली होती. मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास म्हणाल्या की, स्टॉलवर व्यसनमुक्तीचे पोस्टर्स प्रदर्शनी लावून अनुयायांचे लक्ष वेधून घेतले. शिवाय अनुयायांना प्रचार पत्रकांचे वाटप करत मंडळातर्फे डॉक्टरांमार्फत मोफत सल्ला देण्यात आला. लाखो अनुयायांच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवण्याचे काम मंडळाने केले.दरम्यान, कामगार कल्याणकारी मंडळानेही असंघटित कामगारांबाबत माहिती दिली. बांधकाम किंवा नाका कामगार म्हणून काम करणाºया अनुयायायांना मंडळामार्फत राबवण्यात येणाºया योजनांची माहिती देण्यात आली. मंडळाचे कर्मचारी जातीने अनुयायांना नोंदणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करत होते. नोंदणीपासून कामगारांसाठी मंडळाने आखलेल्या योजनांची माहिती देणारे पत्रकही कर्मचाºयांनी या वेळी वाटले.
>पोलिसांची करडी नजर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यास भीमसागर लोटला असताना कोणतीही अनुचित घटना किंवा सुरक्षेबाबत कोणताही प्रश्न उदभवू नये, यासाठी दीड हजारावर पोलीस परिसरातील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होते. त्यासाठी विशेष तुकडीतील जवानांचा सशस्त्र फौजफाटा बुधवार सायंकाळपासून परिसरात तैनात होता. महापरिनिर्वाण दिनी रात्रीपर्यंत कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यत बंदोबस्त कायम होता.
>शिल्प, छायाचित्रांमधून स्मृतींना उजाळा
महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्कात शिल्पे, छायाचित्रे, पोस्टर्स, टी-शर्ट इत्यादी वस्तूंच्या माध्यमातून आंबेडकरांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. विविध पुस्तके, मूर्ती, शिल्पे, गाण्यांच्या सी.डी., टी-शर्ट तसेच महापुरुषांच्या प्रतिमा विकणारे स्टॉल होते. चैत्यभूमीच्या बाहेरच्या परिसरात पुस्तकांची खरेदी-विक्री सुरू होती. त्याचबरोबर महापुरुषांच्या प्रतिमा, पोस्टर घेताना अनुयायांनी गर्दी केली होती. महापालिका विभागाकडून ४६९ स्टॉल्स लावण्यात आले होते. या स्टॉल्सवर बाबासाहेबांची विविध विषयांवरील पुस्तके, नियतकालिके खरेदीसाठी आंबेडकरी अनुयायींची झुंबड उडाली होती. तसेच राज्यभरातून आलेले फोटो विक्रेते, गायक, लोककलाकार, शाहीर यांनाही पाहण्यासाठी अनुयायींनी गर्दी केली होती. महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दादर परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर व पोस्टर लावण्यात आले होते.
>सोशल मीडियावर आंबेडकरांना अभिवादन
महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, टिष्ट्वटर यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटीझन्सने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. या वेळी डॉ. आंबेडकरांचे विचार, संदेश हे मोठ्या प्रमाणात शेअर केले. याशिवाय, दादर शिवाजी पार्क येथील चैत्यभूमीवरील फोटोही फेसबुकवर शेअर होताना दिसले. चैत्यभूमीवर उपस्थित राहणाºया तरुण पिढीची संख्याही वाढली आहे. डॉ. आंबेडकरांचे विचार विस्तारण्यासाठी उपक्रम राबविणारी तरुणाई सोशल मीडियावरही जागरूक होऊन याबद्दल बोलताना गुरुवारी पाहायला मिळाली. बºयाच नेटीझन्सने व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व फेसबुक स्टोरीवर आंबेडकरांचे संदेश पोस्ट केलेले दिसले.
>बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी परिवारासह जळगावहून आलो आहोत. दरवर्षी चैत्यभूमी येथे येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून परतीच्या वाटेला लागतो.
- जगदीश कांबळे, जळगाव
बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन केले. चैत्यभूमीला भेट देऊन एक नवीन प्रेरणा घेऊन निघालो आहोत.
- सईबाई सावळे, नांदेड
जगण्याचे अस्तित्व बाबासाहेबांमुळे मिळाले आहे. त्यामुळे चैत्यभूमी येथे वंदन करण्यासाठी परिवारासह जयपूरवरून आलो आहे. मुलांवर बाबासाहेबांच्या विचारांचे संस्कार व्हावेत. यासाठी दरवर्षी मुलांनाही घेऊन येतो.
- अनमोल टक्कर, जयपूर
मी उत्तर प्रदेशातून आलो आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सहपरिवार दरवर्षी येतो. बाबासाहेबांनी केलेले कार्य खूप महान आहे. दीन-दुबळ्यांना त्यांनी माणसात आणले आहे.
- संजय जैस्वाल, उत्तर प्रदेश
>डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील शिवाजी पार्क येथे बंगळुरूमधील रहिवासी वेणू गोपाल यांनी आंबेडकरांची वेशभूषा करून सर्व भीम अनुयायांचे लक्ष वेधून घेतले. दादरमधील चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना अभिवादनासाठी ते पहिल्यांदाच आले होते. या वेळी त्यांच्या हातामध्ये भारतीय संविधान होते. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी चैत्यभूमीत दाखल झाले होते.

Web Title:  On the way to the followers walking the bowl of the great man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.