धक्कादायक! तोकडे कपडे घातले म्हणून वॉर्डनने केले विद्यार्थिनीला नग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 09:49 PM2018-10-14T21:49:58+5:302018-10-15T05:53:32+5:30

तोकडे कपडे घातले म्हणून वॉर्डनने विद्यार्थिनीला एका खोलीत नेऊन नग्न केल्याचा धक्कादायक प्रकार जुहूच्या एसएनडीटी हॉस्टेलमध्ये रविवारी घडला.

Wardon punishment to student because wear sleeveless clothes | धक्कादायक! तोकडे कपडे घातले म्हणून वॉर्डनने केले विद्यार्थिनीला नग्न

धक्कादायक! तोकडे कपडे घातले म्हणून वॉर्डनने केले विद्यार्थिनीला नग्न

Next

मुंबई : स्लिव्हलेस आणि तोकडे कपडे घातले, म्हणून वॉर्डनने इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनीला एका खोलीत नेत नग्न केल्याचा धक्कादायक प्रकार, जुहूच्या एसएनडीटी वसतिगृहात रविवारी घडला. या विरोधात विद्यार्थिनींनी वॉर्डनविरुद्ध कारवाईची मागणी करत, वसतिगृहाच्या प्रवेशद्वाराबाहेरच आंदोलन केले. रविवारी रात्री वॉर्डन रचना झवेरीविरुद्ध सांताक्रुझ पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला, तर विद्यापीठ प्रशासनाने झवेरी यांच्यावर ४ दिवसांच्या निलंबनाची कारवाई केल्यानंतर विद्यार्थिनींनी आंदोलन मागे घेतले.


तक्रारदार विद्यार्थिनीने दिलेल्या माहितीनुसार, मासिक पाळीमुळे गुप्तांगात संसर्ग झाल्याने डॉक्टरांकडून उपचार सुरू होते. डॉक्टरांनीच तिला सैल कपडे घालण्यास सांगितले होते. रविवारी डॉक्टरांकडे तपासणीसाठी मैत्रिणीसोबत जाताना, झवेरीने अश्लील टीकाटिप्पणी करण्यास सुरुवात केली. तेव्हा तिला होत असलेल्या त्रासाबाबत सांगितले. वसतिगृहात तोकड्या कपड्यांना मनाई असताना, असे कपडे घातल्यामुळे रागाने झवेरीने विद्यार्थिनीला शिवीगाळ करत खोलीत नेले. तेथे ‘कुठे त्रास झाला आहे? हे दाखव’ म्हणत कपडे उतरविल्याचे विद्यार्थिनीचे म्हणणे आहे. थोड्या वेळाने शिवीगाळ करत झवेरी बाहेर आली. विद्यार्थिनीही रडत बाहेर पडली. तिच्या मैत्रीणीने हा प्रकार अन्य विद्यार्थिनींना सांगताच विद्यार्थिनींनी वसतिगृहाबाहेरच ठिय्या केला, तसेच विद्यापीठ प्रशासनाकडे त्यांनी लेखी तक्रार केली.


या प्रकरणात झवेरीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती सांताक्रुझ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम कोरेगांवकर यांनी दिली.
अन्य विद्यार्थिनींनीदेखील झवेरीविरुद्ध तक्रार केली आहे. झवेरी या मुलींसोबत असभ्य वर्तन करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष समितीची नियुक्ती करण्यात येईल. त्या समितीच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांनी सांगितले.

Web Title: Wardon punishment to student because wear sleeveless clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.