आयपीएलच्या मैदानात हाेणार मतदानाचे 'अपील'; मालिकांचाही घेणार आधार

By यदू जोशी | Published: April 11, 2024 07:32 AM2024-04-11T07:32:30+5:302024-04-11T07:33:34+5:30

निवडणूक आयोगाचा पुढाकार, मालिकांचाही आधार

Voting 'appeal' to be held in IPL grounds; Serials will also be supported | आयपीएलच्या मैदानात हाेणार मतदानाचे 'अपील'; मालिकांचाही घेणार आधार

आयपीएलच्या मैदानात हाेणार मतदानाचे 'अपील'; मालिकांचाही घेणार आधार

यदु जोशी   
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इंडियन प्रीमिअम लीगच्या (आयपीएल) सामन्यांचा थरार सुरू असताना सामन्यांना निवडणुकीच्या मतदानाशी जोडण्याची अनोखी शक्कल निवडणूक अधिकारी कार्यालयाने लढविली आहे. १४ एप्रिलला मुंबईत होणाऱ्या सामन्यात ती बघायला मिळू शकते. महाराष्ट्रात किमान ७५ टक्के मतदान व्हायला हवे, असे उद्दिष्ट आयोगाने ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोठ्या संख्येने मतदानाचे आवाहन सामन्यांमधून केले जाईल.  

राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी बुधवारी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ते म्हणाले की, आयपीएल आयोजकांशी तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनशी आमची चर्चा झाली आहे. सामने मुंबईत होणार असले तरी संपूर्ण राज्यात, देशात ते बघितले जातात. हे लक्षात घेऊन या सामन्यांचा उपयोग मतटक्का वाढीसाठी करून घेता येऊ शकतो. मतदानासाठी मोठ्या संख्येने या, असे आवाहन करणाऱ्या जाहिराती दाखविणे, स्टेडियममध्ये तसे स्क्रीन लावणे, सेल्फी पॉइंट्स उभारणे असे नियोजन केले आहे. 

बूथनिहाय प्रयत्न करणार
२०१९ च्या निवडणुकीत कोणत्या बूथवर कमी मतदान झाले याची माहिती आयोगाने संकलित केली आहे. या बूथच्या परिसरात घरोघरी अधिकारी, कर्मचारी जात असून त्यांना मतदानाचे आवाहन करत आहेत. डॉक्टरांनी  रुग्णाला मतदानाचे आवाहन करावे, यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनची मदत आयोग घेत आहे. 

जोडून आलेल्या सुट्ट्यांचे आव्हान     
महाराष्ट्रातील पाच टप्प्यांच्या निवडणुकीत फक्त ७ मे (मंगळवार) ही एकच तारीख अशी आहे की, त्याला जोडून सुटी नाही, इतर चारही तारखांना शुक्रवार वा सोमवार आहे. त्यामुळे शनिवार, रविवारची सुटी जोडून येणार आहे. त्यामुळे मतांची टक्केवारी कमी होण्याची भीती आहे.   

मालिकांमधून करणार आवाहन  
विविध चॅनेलवरील लोकप्रिय हिंदी, मराठी मालिकांद्वारे मतटक्का वाढविण्याची कल्पना आयोगाने मांडली आहे. या संदर्भात चार चॅनेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चाही केली आहे. लोकप्रिय पात्रांच्या तोंडी मतटक्का वाढविण्याचे आवाहन केले जावे, असा प्रयत्न आहे. तशा तीन स्क्रिप्ट आयोगाकडे मान्यतेसाठी आल्या आहेत.

Web Title: Voting 'appeal' to be held in IPL grounds; Serials will also be supported

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.