प्रभादेवीत स्वामी समर्थच्या व्यावसायिक कबड्डीचा आवाज 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 08:55 PM2024-03-01T20:55:25+5:302024-03-01T20:56:10+5:30

कबड्डी संघ आणि कबड्डीपटूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून मंडळाने काही हटके बक्षीसेही ठेवली आहेत.

Voice of Prabhadevi Swami Samarth's Professional Kabaddi | प्रभादेवीत स्वामी समर्थच्या व्यावसायिक कबड्डीचा आवाज 

प्रभादेवीत स्वामी समर्थच्या व्यावसायिक कबड्डीचा आवाज 

मुंबई: प्रो कबड्डीचा चढाई-पकडींचा खेळ थांबताच आता प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतीचषक कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने अव्वल १४ व्यावसायिक संघांची प्रो कबड्डीला साजेशी चढाओढ पाहायला मिळणार आहे. येत्या ५ ते ८ मार्चदरम्यान विशेष व्यावसायिक पुरूष गट कबड्डी संघाचा जोरदार संघर्ष कबड्डीप्रेमींना अनुभवायला मिळेल.

कबड्डीला प्रो कबड्डीची श्रीमंती लाभण्यापूर्वी कबड्डी आणि कबड्डीपटूंना मान आणि सन्मान मिळवून देताना दिमाखदार स्पर्धांचे आयोजन करणार्‍या ८० वर्षांच्या "तरुण तडफदार" स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने पुन्हा एकदा विशेष व्यावसायिक गट स्पर्धेचे आयोजन केले आहे. यंदाही मंडळाच्या विशेष व्यावसायिक स्पर्धेत गतविजेता भारत पेट्रोलियम, इन्शुअरकोट स्पोर्टस् (युवा पलटन), युनियन बँक, मुंबई महानगर पालिका,  बँक ऑफ बडोदा, महिंद्रा आणि महिंद्रा, रिझर्व्ह बँक, मिडलाईन अ‍ॅकॅडमी, मुंबई पोर्ट ट्रस्ट अशा बलाढ्य संघांचा 'दम'दार खेळ चवन्नी गल्लीत उभारलेल्या सीताराम चव्हाण क्रीडानगरीतील एका मॅटच्या मैदानावर अनुभवता येईल.

आगळ्या वेगळ्या बक्षीसांचाही वर्षाव
कबड्डी संघ आणि कबड्डीपटूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून मंडळाने काही हटके बक्षीसेही ठेवली आहेत. यात एकाच चढाईत पाच गुण टिपणारा, सुपर रेडदरम्यान चढाईपटूची दोघांतच यशस्वी पकड करणारे पकडवीर, सामना सुरु होताच पाच मिनीटात प्रतिस्पर्ध्यावर लोण चढवणारा संघ, तसेच एका सामन्यात चढाईचे १५ गुण मिळविणारा चढाईबहाद्दर आणि पकडींचे ७ गुण टिपणारा पकडवीर यांना मंडळाच्या वतीने आकर्षक बक्षीस दिले जाणार असल्याची घोषणा मंडळाचे प्रमुख कार्यवाह महेश सावंत यांनी केली.

या स्पर्धेचे वैशिष्ट्यं म्हणजे आपल्या जोरदार चढाया- पकडींनी कबड्डी चाहत्यांना आपल्या प्रेमात पाडणारे अनेक कबड्डीचे सुपरस्टार  प्रभादेवीच्या मॅटवर आपला सुसाट आणि भन्नाट खेळ करताना दिसतील. कबड्डीचे ग्लॅमर वाढेल असे आयोजन करताना मंडळाने विजेत्या संघाला लक्षाधिश करणार असल्याचे जाहीर केले आहे. उपविजेता संघालाही पाऊणलाख आणि चषक दिला जाणार आहे. एवढेच नव्हे तर उपांत्य सामन्यात पराभूत झालेले संघही २१ हजार रुपयांची कमाई करणार असल्याची माहिती मंडळाच्या महेश सावंत यांनी दिली. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूही सोनसाखळी जिंकेल तर चढाई आणि पकडवीरालाही सोन्याची भेटवस्तू दिली जाणार आहे.

स्पर्धेत एकंदर १४ बलाढ्य संघ खेळणार असून तीन-तीन संघांचे दोन तर चार-चार संघांचे दोन- दोन गट खेळविले जातील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी एकमेकांशी भिडतील. स्पर्धा अधिक रंजक आणि थरारक व्हावी म्हणून एकाच मॅटवर खेळविली जाणार असून प्रत्येक दिवशी सहा सामने खेळविले जाणार असल्याची माहिती मंडळाचे क्रीडाप्रमुख रवी शिंदे यांनी दिली.

राजाभाऊ देसाई स्मृतीचषक कबड्डी स्पर्धेत सहभागी संघ
बँक ऑफ इंडिया, मुंबई पोर्ट ट्रस्ट (एमपीटी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल),  रिझर्व्ह बँक (आरबीआय), मुंबई महानगरपालिका (एमसीजीएम), अ‍ॅग्रीकल्चर प्रोड्युसर मार्केट कमिटी (एपीएमसी), युनियन बँक (युबीआय), आयएसपीएल (युवा पलटण), मिडलाईन अ‍ॅकेडमी, संत सोपान सहकारी बँक, न्यू इंडिया ॲश्युरंस, जे एस डब्ल्यू, महिंद्रा आणि महिंद्रा.

Web Title: Voice of Prabhadevi Swami Samarth's Professional Kabaddi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.