दृष्टिकोन नक्की बदलेल - दाभोळकर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 05:12 AM2019-03-08T05:12:18+5:302019-03-08T05:12:36+5:30

कार्यालयात काम करीत असलेल्या, घरी काम करीत असलेल्या प्रत्येक महिलेला दैनंदिन कार्यातून समानतेच्या वागणुकीतून आदर दिला पाहिजे,

Viewpoint will change - Dabholkar | दृष्टिकोन नक्की बदलेल - दाभोळकर

दृष्टिकोन नक्की बदलेल - दाभोळकर

googlenewsNext

मुंबई : एखादी चळवळ उभी राहिली, मानसिकता बदलली म्हणजे महिलांना आदर मिळतो असे नाही, तर कार्यालयात काम करीत असलेल्या, घरी काम करीत असलेल्या प्रत्येक महिलेला दैनंदिन कार्यातून समानतेच्या वागणुकीतून आदर दिला पाहिजे, असे मत अ‍ॅडगुरू भरत दाभोळकर यांनी व्यक्त केले. विशेषत: ‘मीटू’ मोहिमेमुळे समाजात जरब, भीती निर्माण झाली असून, महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत आहे, असेही दाभोळकर म्हणाले.
जागतिक महिला दिना’च्या पार्श्वभूमीवर भरत दाभोळकर यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. ते म्हणाले की, केवळ ‘मीटू’च नाही, तर प्रत्येक बाबतीत आपण आपली मानसिकता बदलली पाहिजे. मग यात स्वच्छताही येते. तुम्ही तुमचे रस्ते स्वच्छ ठेवले पाहिजेत. पण या गोष्टी चटकन होत नाहीत. मानसिकता बदलली म्हणजे एखादी गोष्ट घडली, असे होत नाही. त्यास अनेक वर्षे लागतात. एखादी चळवळ उभी राहिली तरी मानसिकता चटकन बदलेल असे होत नाही. यास मोठा काळ जावा लागतो. पण जेव्हा युनिटी अ‍ॅक्शन होते; तेव्हा मात्र फरक पडतो. सिंगापूरमध्ये लोक रस्त्यांवर का थुंकत नाहीत, रस्त्यावर का कागद टाकत नाहीत? कारण ते शिकलेले आहेत म्हणून नाही, तर असे कृत्य केल्यास तिकडे पाच हजार डॉलर दंड आकारला जातो. म्हणजे शिकून एखादी गोष्ट येत नाही.
‘मीटू’बाबत बोलायचे झाल्यास आता भीती निर्माण झाली आहे. आपण असे वागलो तर त्याचे परिणाम आपल्या करिअरवर, आपल्यावर फार मोठे होऊ शकतात ही जी भीती आहे; त्यामुळे लोकांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. आपण असे करता कामा नये हे पुरेसे नाही, तर आपण आपले चरित्र बदलले पाहिजे ही जाणीव निर्माण होणे महत्त्वाचे आहे. भीती तुमची वागणूक बदलते; आणि हे पुरेसे आहे. महिलांना दिली जाणारी वागणूक बदलली तरी खूप झाले. पूर्वी महिला सर्वच क्षेत्रांत कार्यरत नव्हत्या. कार्यालयात महिला काम करीत होत्या. ती वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ असायची. आता जाहिरात क्षेत्र असो, चित्रपट क्षेत्र असो; अशा मोठ्या क्षेत्रांत सकाळपासून रात्रीपर्यंत काम सुरू असते. अशावेळी एकमेकांसोबतचा संपर्क वाढत जातो. म्हणजे असे म्हणता येईल की पूर्वी जी दरी होती ती आता कमी होत आहे.
महिला पुरुषांसारखेच काम करीत आहेत. आताच्या काळात महिला - पुरुष समानता येत आहे. किंवा महिला आणि पुरुष यांच्यामधील दरी कमी होते आहे, असे आपण म्हणू शकतो. अनेकवेळा असे होते की एकत्र काम केल्याने पूर्वीसारखा एकमेकांबद्दल आदर राहत नाही. तुम्ही एकसारखे काम करता. एकसारखे वागता. मग अंतर राहत नाही. पण अशावेळी भीती निर्माण करणे याशिवायही पर्याय नाही. कारण आपण असे वागलो तर आपले नाव खराब होते, अशी भीती राहते. आणि नाव कोणाचे खराब होते जी व्यक्ती प्रसिद्ध आहे तिचे नाव खराब होते. नाव खराब होणे हे प्रसिद्ध माणसांना लागू होते. मात्र आता सर्व स्तरांत याबाबत जागरूकता येत आहे. कंपन्या याची मोठ्या संख्येने दखल घेत आहेत. ‘मीटू’मुळे का होईना पुरुषांमध्ये एक भीती निर्माण झाली आहे. आपण असे वागता कामा नये. आपण असे वागलो आणि आपण कितीही शक्तिशाली असलो तरी आपल्यापुढे समस्या निर्माण होऊ शकतात याची जाणीव निर्माण होत आहे. सोशल नेटवर्क स्ट्राँग झाले आहे. ही भीती आहे; ती महत्त्वाची आहे. महिला कामाच्या बाबतीत खूप वेगवान असतात. पुरुषांच्या तुलनेत महिला स्वत:ला कामात झोकून देतात. जाहिरात क्षेत्र असो वा अन्य काही महिलांची काम करण्याची पद्धत पुरुषांपेक्षा वेगळी आणि दर्जेदार असते. महिला दिन असो व अन्य कोणतेही दिन. हे फारसे काही माझ्या पचनी पडत नाहीत.
>महिला दिनालाच महिलांचा आदर करायचा हे योग्य नाही. आपण समानतेच्या पातळीवर आहोत. आपण समान काम करीत आहोत. महिला दिन आहे म्हणून आपण चांगले बोलायचे, चांगले वागायचे यापेक्षा महिलांना क्षणोक्षणी आदर दिला पाहिजे. आणि प्रत्येक महिला ‘मीटू’ची भाग झाली पाहिजे. असे झाले तर खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा झाला किंवा महिलांचा आदर झाला, असे आपण म्हणू शकतो, असेही दाभोळकर म्हणाले.

Web Title: Viewpoint will change - Dabholkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.