विद्यापीठ ४५ दिवसांची डेडलाइन पाळण्यात अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 06:11 AM2019-05-26T06:11:21+5:302019-05-26T06:11:31+5:30

सार्वजनिक विद्यापीठाच्या अधिनियमानुसार बोर्डाच्या परीक्षेतील शेवटचा पेपर संपल्यानंतर पुढील ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर करणे अनिवार्य असते.

University fails to keep up to 45 day deadline | विद्यापीठ ४५ दिवसांची डेडलाइन पाळण्यात अपयशी

विद्यापीठ ४५ दिवसांची डेडलाइन पाळण्यात अपयशी

Next

सीमा महांगडे 

मुंबई : सार्वजनिक विद्यापीठाच्या अधिनियमानुसार बोर्डाच्या परीक्षेतील शेवटचा पेपर संपल्यानंतर पुढील ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर करणे अनिवार्य असते. मात्र, २०१८ च्या पहिल्या सत्रातही नेहमीप्रमाणे मुंबई विद्यापीठ वेळेवर निकाल जाहीर करण्यात अयशस्वी ठरले असल्याची माहिती समोर आली. महत्त्वाची बाब म्हणजे तब्बल २६८ परीक्षांचे निकाल ४५ दिवसांच्या आत लावण्यास विद्यापीठ अयशस्वी ठरले. त्यामुळे यंदाच्या सत्रांचे निकाल तरी वेळेत लागतील का, असा सवाल सिनेट सदस्य आणि विद्यार्थ्यांना पडला आहे.
२४ आणि २५ एप्रिल रोजी पार पडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय बैठकीत सिनेट सदस्य वैभव नरवडे यांनी या संदर्भातील प्रश्न विचारला होता. २०१८ च्या पहिल्या सत्रातील अनेक निकाल वेळेत न लागल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्यामुळे त्यांनी याबाबत विद्यापीठाकडे माहिती विचारली होती. त्यानुसार २०१८ च्या पहिल्या सत्रातील २०३ परीक्षांचे निकाल हे ४५ दिवसांच्या आत लागले आहेत, तर २६८ निकाल उशिरा लागले आहेत.
विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार सगळ्यात जास्त म्हणजे १२५ दिवसांचा कालावधी एमएफएम अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या सत्राचा निकाल लावण्यासाठी लागला. तर त्यानंतर लायब्ररी अ‍ॅण्ड इन्फॉर्मेशन सायन्स अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्राच्या निकालासाठी १०४ दिवसांचा कालावधी लागला. एमए इन इंग्लिश आणि एमए इन इंग्लिश रिसर्च विषयांच्या चौथ्या सत्रांचे निकाल लावण्यास विद्यापीठाने ११४ दिवसांचा वेळ घेतला असल्याची माहिती नमूद केली आहे. उशिरा निकाल लागलेल्या अभ्यासक्रमांत बीकॉम, एमकॉम, बीएड , बीए, बीएमएस, बीएससी, एमई आणि बºयाच अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
२०१७ पासून विद्यापीठात पहिल्यांदाच आॅनस्क्रीन मार्किंग सिस्टीमची सुरुवात करण्यात आली होती. आधीच विद्यार्थ्यांचे निकाल वेळेत लावण्यासाठी विद्यापीठाची तारांबळ उडत असताना नवीन कार्यप्रणालीमुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली. या प्रकरणी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची उचलबांगडी करण्यात आली होती.
>पदरी पुन्हा निराशाच!
मुंबई विद्यापीठात कुलगुरूपदाचा पदभार रुईया महाविद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हाती सोपवण्यात आला. महाविद्यालयीन कामकाजातील एका अनुभवी व्यक्तीकडे विद्यापीठाचा कारभार सोपवण्यात आल्यामुळे यंदा तरी आपला निकाल वेळेत लागेल, असा विश्वास विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला होता. मात्र, २०१८ मध्येही मुंबई विद्यापीठाने भोंगळ कारभाराची परंपरा जोपासत ४५ दिवस उलटूनही निकाल लावलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पदरी पुन्हा निराशा पडली, तर यंदा निकालासाठी विद्यापीठ सज्ज असल्याची माहिती परीक्षा विभागाने दिली आहे.
विद्यापीठाचे यंदाचे काही निकाल तयार आहेत. मात्र २६८ निकाल वेळेत न लागणे ही गंभीर बाब आहेच. त्यामुळे विद्यापीठाने यापुढे नियमानुसार ४५ दिवसांच्या आत निकाल कसा लावला जाईल याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होऊ शकेल.
- वैभव नरवडे,
सिनेट सदस्य

Web Title: University fails to keep up to 45 day deadline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.