मुंबईच्‍या पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविण्‍याचा उद्धव ठाकरे यांचा निर्धार 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 07:42 AM2018-07-20T07:42:45+5:302018-07-20T07:47:16+5:30

किर्लोस्‍कर ब्रदर्स करणार पालिकेला सहकार्य

Uddhav Thackeray's determination to take control of Mumbai's flood situation | मुंबईच्‍या पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविण्‍याचा उद्धव ठाकरे यांचा निर्धार 

मुंबईच्‍या पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविण्‍याचा उद्धव ठाकरे यांचा निर्धार 

Next

मनोहर कुंभेजकर

मुंबई - मुंबईत थोडा जरी पाऊस पडला तर मुंबई तुंबते. पाऊस आणि समुद्राला आलेली भरती यामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचतं. पालिकेने ठिकठिकाणी साचलेले पाणी काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात तैनात केलेले पंप आणि राबवलेल्या विविध योजना यामुळे यंदा मुंबईत पाण्याचा निचरा लवकर झाला. मात्र दरवर्षी पडणाऱ्या पावसामुळे मुंबईची तुंबापूरी होऊ नये यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत ओढवणाऱ्या पूरस्थितीवर नियंत्रण मिळविण्‍याच्‍या दृष्‍टीने  निर्धार केला आहे. या संदर्भात नुकतीच शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात एक महत्वाची बैठक उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

या बैठकीत विविध देशांमध्‍ये पूर नियंत्रण प्रणाली यशस्‍वीपणे राबविणाऱ्या पुण्याच्या किर्लोस्‍कर ब्रदर्स कंपनीने मुंबई महानगर पालिकेला मदतीचा हात पुढे केला आहे. या कंपनीचे अध्‍यक्ष संजय किर्लोस्‍कर यांनी त्‍यांच्‍या सहकाऱ्यांसह बैठकीत विविध उपाय योजनांचे सादरीकरण महापौर बंगल्यात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत केले.

मुंबईच्‍या सखल भागांमध्‍ये जास्‍त पाऊस झाली की बराच वेळ पाणी अडकून राहते. त्‍याचवेळी समुद्राला मोठी भरती आली तर पाणी समुद्रात वाहून नेता येत नाही. शिवाय मुंबईत काही ठिकाणी समुद्रपातळीपेक्षा जमिनीची पातळी खाली आहे. पुराचे पाणी पसरू शकेल अशा खुल्‍या जमिनीच्‍या कमतरता व सतत चालणारी प्रचंड वाहतूक हेही प्रश्‍न परिस्थिती बिकट बनवितात. या सगळया परिस्थितीचा सखोल अभ्‍यास करून किर्लोस्‍करांनी मुंबईसाठी काही कायमस्‍वरूपी उपाय योजना करता येतील काय याचे मार्गदर्शन करावे असे आवाहन उध्‍दव ठाकरे यांनी या बैठकीत  केले. या बैठकीला मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर व पालिका आयुक्‍त अजोय मेहता यांच्‍यासह शिवसेना पक्षप्रमुख उध्‍दव ठाकरे व मुंबई शहराचे पालकमंत्री  सुभाष देसाई हे उपस्थित होते. 

मुंबईचा पाणी तुंबण्‍याचा प्रश्‍न गंभीर असून केवळ मलमपट्टीसारखे उपाय न करता दीर्घकाळ पूर संकट रोखू शकेल अशी प्रभावी उपाय योजना आखावी असे आवाहन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मुंबई महापालिकेला केले. २०११ मध्‍ये बँकॉक या थायलंडच्‍या राजधानीच्‍या शहरात अतिवृष्‍टीमुळे आलेल्‍या महापुरानंतर समुद्राचे पाणी संपूर्ण शहरात घुसून हाहाःकार माजला. दोन ते तीन महिने बँकॉकमध्‍ये चहूकडे पाणीच पाणी तुंबून राहिले होते. थायलंडच्‍या शासनाने अशी परिस्थिती पालटवू शकणाऱ्या तंत्रज्ञानाचा जगभरात शोध घेतला व अखेर किर्लोस्‍कर ब्रदर्सकडे पुराचे संकट पुन्‍हा येऊ नये याचा बंदोबस्‍त करण्‍याची कामगिरी सोपविली होती.

किर्लोस्‍कर ब्रदर्स कंपनीच्‍या तंत्रज्ञांनी जमिनीच्‍या पोटात तयार केलेल्‍या बोगदयातून महाकाय ‘काँक्रिट व्‍हाल्‍यूट पंप’ बसवून अतिवृष्‍टी किंवा समुद्राच्‍या भरतीचे संकट रोखण्‍यासाठी प्रभावी यंत्रणा २०१७ पर्यंत पूर्ण केली. पुढील शंभर वर्षात कितीही अतिवृष्‍टी होवो वा लाटांची उंची कितीही वाढो बँकॉकचे व्‍यवहार सुरळीत चालतील याची पक्‍की तजवीज केली आहे. या बैठकीत स्‍थायी समिती अध्‍यक्ष यशवंत जाधव व पालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त विजय सिंघल, मुख्‍य अभियंता व अन्‍य वरिष्‍ठ अधिकारी उपस्थिती होते. सर्वांनी प्रस्‍तावित योजनेचा आराखडा लवकरच सादर करण्‍यात येईल असे किर्लोस्कर कंपनीने मान्‍य केले.

Web Title: Uddhav Thackeray's determination to take control of Mumbai's flood situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.