बेइमानीचा पराभव सुरू झालाय, साहेब!, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 08:13 AM2018-05-22T08:13:45+5:302018-05-22T08:13:45+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 

Uddhav Thackeray Criticized Chief Minister Devendra Fadnavis over palghar bypoll election | बेइमानीचा पराभव सुरू झालाय, साहेब!, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

बेइमानीचा पराभव सुरू झालाय, साहेब!, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

googlenewsNext

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 
''चिंतामण वनगा आयुष्यभर आदिवासी पाड्यांवर भगवा ध्वज हाती घेऊन काम करीत राहिले. मात्र त्यांची मरणोत्तर उपेक्षा करणे आणि राजेंद्र गावीत यांच्यासारखे दलबदलू लोक आयात करून हेच वनगांचे राजकीय वारसदार बरं का, असे आता जाहीर सभांतून सांगणे यालाच बेइमानी म्हणतात साहेब.  मुख्यमंत्री पैशांचा पाऊस पाडत आहेत, पण सत्य व प्रामाणिकपणाचा म्हणजे चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांचाच विजय होईल. कर्नाटकात आमदारांना विकत घेऊन राज्य आणू पाहणाऱ्या रामलूंसारख्या धनदांडग्यांचे काही चालले नाही. महाराष्ट्र तर शिवरायांची पवित्र भूमी आहे. पालघरला असे बेइमान, भ्रष्ट रामलू पाचोळय़ासारखे उडून जातील. बेइमानीचा पराभव सुरू झालाय, साहेब'', अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. 

- काय आहे आजचे सामना संपादकीय?
भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यापासून देशाचा इतिहास नव्याने लिहिला जात असल्याची बोंब आहे. लोकमान्य टिळक हे भारतीय असंतोषाचे जनक ही त्यांची खरी ओळख, पण आता शालेय पुस्तकांत जो नवा इतिहास लिहिला जात आहे त्यानुसार टिळक हे दहशतवाद्यांचे पुढारी असल्याचे लिहिले गेले. श्री. मोदी हे रामाचे किंवा विष्णूचे अवतार असल्याचेही म्हटले गेले. भारतीय जनता पक्षाचा वायदा ‘भूगोल’ बदलण्यासंदर्भातला होता. म्हणजे पाकिस्तानचे नामोनिशाण मिटवून टाकू. पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानात परत आणू. तसे झाले नाही व फक्त इतिहासाला ‘मेकअप’ करण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर काही शब्दांचे अर्थ व व्याख्याही बदलल्या जात आहेत. पालघरात हे पुन्हा दिसले. पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीने भारतीय जनता पक्षाला घाम फोडला आहे व घाम पुसत ते शिवसेनेवर टीका करीत आहेत. ‘आमदार’ विकत घेण्याचा, पळवून नेण्याचा संपूर्ण अधिकार भाजपसारख्या पक्षांनी लोकशाही मार्गाने मिळवला आहे, हे कर्नाटकातील तमाशात दिसून आले. त्याप्रमाणे टीका करण्याचे अधिकारही त्याच पक्षाला लोकशाहीने दिले आहेत. पालघरच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपने जोरदार टीका सुरू केली आहे. एखाद्या राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतही भाजपचे संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्या-राज्यांचे मुख्यमंत्री, इतर फौजफाटा साग्रसंगीत उतरत असतो, तसा फौजफाटा पालघरलाही उतरला आहे. मंत्रालय ओस पडले आहे. महाराष्ट्राचे सर्व प्रश्न जणू सुटले आहेत आणि फक्त पालघरच्या पोटनिवडणुकीचा प्रश्नच तेवढा बाकी आहे असे सत्ताधारी भाजपचे वागणे आहे. 

पालघरची पोटनिवडणूक जिंकण्यासाठी थैल्या घेऊन त्यांनी संपूर्ण मंत्रिमंडळच उतरवले. मात्र अंतिम विजय हा शिवसेनेचाच होणार आहे. आम्हाला आश्चर्य वाटते ते भाजपने सुरू केलेल्या बेताल प्रचाराचे. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडे भाजपकडून कोणी फिरकले नाही. मुख्यमंत्री सोडाच, पण जिल्हय़ातील संघ आणि भाजप परिवाराने पाठ फिरवली. वनगा यांचे निधन दिल्लीत झाले. त्यांच्या निवासस्थानापासून ‘भाजप’चे कार्यालय पाच मिनिटांवर आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाईंचे घर तीन मिनिटांवर. इतरही भाजप परिवार आसपास असतो. कोणी त्यांच्या पार्थिवावर फूल वाहण्यास गेले नाही. वनगा यांनी सारी हयात ठाणे – पालघरच्या आदिवासी भागात संघाचा विचार व भाजप वाढविण्यात घालवली. त्यासाठी त्यांना शारीरिक हल्ले सहन करावे लागले. वनगा हे मरेपर्यंत भाजपशी इमान राखूनच होते. त्यांच्या इमानदारीची किंमत मरणानंतर संपली व वनगा यांच्या कुटुंबाला जणू वाऱ्यावरच सोडण्यात आले. त्यानंतर ते सर्व कुटुंब शिवसेना परिवारात सामील झाले. यात मुख्यमंत्र्यांना बेइमानी वगैरे दिसत असेल तर राजभाषा कोश नव्याने लिहावा लागेल. वनगा यांनी हयात भारतीय जनता पक्षात घालवूनही मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांचे धिंडवडे निघाले. कुटुंबाचे पालकत्व घ्यायला भाजपचा एकही मायका लाल पुढे आला नाही. 

तेव्हा ‘बेइमानी’ म्हणायचीच असेल तर ती ‘बेइमानी’ येथे आहे. किरीट सोमय्या यांनी मराठी फेरीवाल्यांच्या तोंडावर त्यांची घामाची कमाई असलेल्या पाच-पंचवीस रुपयांच्या नोटा फाडून फेकल्या. नोटेवर ‘अशोकस्तंभ’ तर आहेच, पण भारतीय चलन फाडून फेकणे हा देशद्रोहाचा गुन्हा आहे, परंतु भाजप खासदारास वाचविण्यासाठी संपूर्ण सरकार कामास लागते आणि वनगांच्या कुटुंबीयांना साधा फोन करायला कुणी तयार नाही. यालाच बेइमानी म्हणतात मुख्यमंत्री साहेब. पालघरच्या प्रचारात पोस्टरवर स्वर्गीय वनगांचा फोटो लावून भाजपने मत मागण्यास सुरुवात केली. यावर चिंतामण वनगा यांच्या पत्नीने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. हा सरळसरळ स्वर्गीय वनगांच्या नावाचा ‘गैरवापर’ आहे असे त्या माऊलीचे म्हणणे आहे. वनगा कोणाची खासगी प्रॉपर्टी नाही हे त्यावरचे खरे उत्तर नाही. (असे मुख्यमंत्री म्हणतात) चिंतामण वनगा यांची व्यक्तिगत ‘प्रॉपर्टी’ काहीच नव्हती. ते आयुष्यभर आदिवासी पाड्यांवर भगवा ध्वज हाती घेऊन काम करीत राहिले. त्यांची कमाई हा त्यांचा हिंदुत्ववादी विचार होता. मात्र त्यांची मरणोत्तर उपेक्षा करणे आणि राजेंद्र गावीत यांच्यासारखे दलबदलू लोक आयात करून हेच वनगांचे राजकीय वारसदार बरं का, असे आता जाहीर सभांतून सांगणे यालाच बेइमानी म्हणतात साहेब. नोटा फाडून गरीबांच्या तोंडावर फेकणाऱ्यांचा माज उतरविण्यासाठी जनता महाराष्ट्रात सज्ज आहे. पालघर ही त्याची नांदी आहे. मुख्यमंत्री पैशांचा पाऊस पाडत आहेत. घोषणांचा धुरळा उडवीत आहेत. सारे मंत्रिमंडळ एका हातात पैशांच्या बॅगा व दुसऱ्या हातात दंडुका घेऊन पालघरात बसले आहे, पण सत्य व प्रामाणिकपणाचा म्हणजे चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांचाच विजय होईल. कर्नाटकात आमदारांना विकत घेऊन राज्य आणू पाहणाऱ्या रामलूंसारख्या धनदांडग्यांचे काही चालले नाही. महाराष्ट्र तर शिवरायांची पवित्र भूमी आहे. पालघरला असे बेइमान, भ्रष्ट रामलू पाचोळय़ासारखे उडून जातील. बेइमानीचा पराभव सुरू झालाय, साहेब.

Web Title: Uddhav Thackeray Criticized Chief Minister Devendra Fadnavis over palghar bypoll election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.