...अन्यथा जनता ‘पिंजरा’ लावून बसलीच आहे,मंत्रालयातील उंदीर घोटाळ्यावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2018 07:23 AM2018-03-24T07:23:42+5:302018-03-24T07:39:19+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मंत्रालयातील कारभारावर सामना संपादकीयमधून घेतला समाचार

Uddhav Thackeray Criticize the BJP government over bjp leader eknath khadses fresh allegations on rat scam in mantralaya | ...अन्यथा जनता ‘पिंजरा’ लावून बसलीच आहे,मंत्रालयातील उंदीर घोटाळ्यावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा

...अन्यथा जनता ‘पिंजरा’ लावून बसलीच आहे,मंत्रालयातील उंदीर घोटाळ्यावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा

Next

मुंबई - भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी (22 मार्च) मंत्रालयातील उंदीर घोटाळा उघडकीस आणून सरकारला चांगलेच पिंज-यात पकडले. मंत्रालयातील ३ लाख १९ हजार ४०० उंदीर सात दिवसांत कसे मारण्यात आले, असा सवाल खडसेंनी विधानसभेत करताच संपूर्ण सभागृहच अवाक् झाले. मंत्रालयातील या कारभारावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून ताशेरे ओढले आहेत. 

''उंदीर घोटाळ्याने फक्त सरकारी तिजोरीच कुरतडलेली नाही तर विद्यमान राजवटीच्या पारदर्शक कारभाराचे ढोलही फोडले आहेत, येथील तथाकथित स्वच्छ प्रशासनाला बिळे पडली आहेत, मंत्रालयाची जमीन ‘भुसभुशीत’ झाली आहे, असे आरोप सत्ताधारी पक्षाचेच लोक करीत आहेत. महाराष्ट्राचे मंत्रालय हे जणू ‘उंदरालय’ झाले आहे. एकनाथ खडसे यांनी कोणत्या हेतूने या घोटाळ्याचा स्फोट केला हे त्यांचे त्यांनाच माहीत, पण ‘अमुक-तमुक मुक्त’ करण्याची भाषा करणाऱ्यांच्याच राज्यात मंत्रालय घोटाळेबाज उंदीरयुक्त झाले आहे. ते उंदीरमुक्त करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. अन्यथा, राज्यातील जनता ‘पिंजरा’ लावून बसलीच आहे!''अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारला टोला हाणला आहे.

काय आहे आजचे सामना संपादकीय?

उंदीर हा ‘शेतकऱ्याचा मित्र’ म्हटला जातो हे आतापर्यंत माहीत होते, पण तो ‘घोटाळेबाजांचाही मित्र’ असल्याचे महाराष्ट्राच्या विधिमंडळातच उघड झाले आहे. भारतीय जनता पक्षाचे नाराज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनीच गुरुवारी मंत्रालयात ‘उंदीर घोटाळा’ झाल्याचा ‘स्फोट’ केला. त्यामुळे देशभरातील घोटाळय़ांमध्ये आणखी एका घोटाळय़ाची आणि त्याच्या सुरस कथेची भर पडली आहे. विधिमंडळातील या गौप्यस्फोटामुळे घोटाळेबाज असा शिक्का बसलेल्या मंत्रालयातील उंदीरमामांमध्ये काय प्रतिक्रिया उमटल्या हे कळायला मार्ग नाही. कदाचित, हे आरोप हेतुपुरस्सर आणि मूषकयोनीला बदनाम करण्याचे कारस्थान आहे असे म्हणत  राज्यभरातील मूषकराजांचा एखादा लाँगमार्च उद्या मुंबईवर धडकू शकतो. या लाँगमार्चचे निवेदन मुख्यमंत्री स्वीकारतात की नाही हे सांगता येणार नाही. कारण मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या सामान्य प्रशासन विभागाने राबविलेल्या मोहिमेतच हा घोटाळा झाल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. त्यावर खुलासे-प्रतिखुलासे होत राहतील, पण यानिमित्ताने सरकारी तिजोरी कुरतडलीही जाऊ शकते आणि उंदीर हे ‘कार्य’ करू शकतात हा नवा साक्षात्कार महाराष्ट्राला झाला हेदेखील महत्त्वाचेच. केंद्र वा राज्यांच्या तिजोऱ्या फक्त लुटल्याच जातात असा कालपर्यंत एक सार्वत्रिक समज होता. महाराष्ट्राच्या मंत्रालयातील उंदरांनी तो समज खोटा ठरवत सरकारची तिजोरी कुरतडलीही जाऊ शकते, हा नवा संदेश समस्त घोटाळेबाजांना दिला आहे.

तिकडे परदेशात लपून बसलेले नीरव मोदी आणि विजय मल्ल्या हेदेखील हे नवे घोटाळा तंत्र आपल्याला आधी का कळले नाही या विचाराने हैराण आहेत म्हणे. त्यांच्या फार्म हाऊसच्या आवारात बागडणाऱ्या उंदरांनी मंत्रालयातील उंदरांना तसे व्हॉटस् ऍप मेसेज पाठवल्याची  वदंता आहे. खरेखोटे त्या उंदरांनाच माहीत, पण हा ‘मूषक योग’ आपल्या कुंडलीत असता तर ना बँक घोटाळा करावा लागला असता ना परदेशात पळून जाण्याची वेळ आली असती, असे त्यांना वाटत असावे. राज्याच्या इतर भागांतील उंदरांनाही मंत्रालयातील ‘बांधवां’चा सध्या हेवा वाटतोय. मंत्रालयात आपली निदान ‘डेप्युटेशन’वर नेमणूक व्हावी अशी त्यांची इच्छा असून सामान्य प्रशासन विभागाने तसा शासन आदेश काढावा यासाठी ते प्रयत्नशील असल्याचेही सांगण्यात येत आहे. उंदीर निर्मूलन मोहिमेत मंत्रालयातील तीन लाख १९ हजार ४०० उंदीर सात दिवसांत मारले गेले. म्हणजे दिवसाला ४५ हजारांवर उंदीर मारण्यात आले. या एवढय़ा उंदरांचे काय केले गेले, त्यांचे कुठे दफन करण्यात आले वगैरेचा तपास करण्यासाठी सरकार एसआयटीची स्थापना करणार असल्याची चर्चाही सुरू आहे. उंदीर घोटाळय़ाचे असे साद-पडसाद सर्वत्र उमटत आहेत. उंदीर घोटाळा हा एक नवीन शब्द यानिमित्ताने शब्दकोशात समाविष्ट झाला आहे. इतरही काही नवी विशेषणे, म्हणी, वाप्रचार प्रचारात येण्याची चिन्हे आहेत.

‘तुझ्या उसाला लागंल कोल्हा’ असे म्हणण्याऐवजी भविष्यात ‘तुझ्या उसाला लागंल उंदीर’ असे म्हटले जाईल. ‘कागदी घोडे’ असा शब्द सरकारी   कामकाजासंदर्भात वापरला जातो. त्याची जागा ‘कागदी उंदीर’ हा शब्द घेईल.  ख्यातनाम कवी बा. सी. मर्ढेकर यांच्या ‘पिपात मेले ओले उंदीर’ या प्रसिद्ध कवितेचेही ‘मंत्रालयात मेले घोटाळेबाज उंदीर’ असे विडंबन केले जात आहे. मर्ढेकरांनी या कवितेत ‘माना पडल्या आसक्तीविण’ असे म्हटले असले तरी मंत्रालयातील उंदीरमामांनी जी ‘आसक्ती’ दाखवली आहे त्यामुळे घोटाळेबाजांची मान निश्चित ताठ झाली असेल. अर्थात सरकार आणि सत्ताधाऱ्यांची मान खाली झुकली आहे ही गोष्ट वेगळी. कारण उंदीर घोटाळय़ाने फक्त सरकारी तिजोरीच कुरतडलेली नाही तर विद्यमान राजवटीच्या पारदर्शक कारभाराचे ढोलही फोडले आहेत. येथील तथाकथित स्वच्छ प्रशासनाला बिळे पडली आहेत, मंत्रालयाची जमीन ‘भुसभुशीत’ झाली आहे, मंत्रालयात धर्मा पाटील यांच्यासारख्या शेतकऱ्यांना थारा दिला जात नसला तरी दलाल आणि उंदरांचा सुळसुळाट झाला आहे, सरकारी तिजोरीतील ‘लोणी’ उंदरांच्या नावाने भलतेच ‘बोके’ खात आहेत असे आरोप सत्ताधारी पक्षाचेच लोक करीत आहेत. महाराष्ट्राचे मंत्रालय हे जणू ‘उंदरालय’ झाले आहे. एकनाथ खडसे यांनी कोणत्या हेतूने मंत्रालयातील उंदीर घोटाळय़ाचा स्फोट केला हे त्यांचे त्यांनाच माहीत, पण ‘अमुक-तमुक मुक्त’ करण्याची भाषा करणाऱ्यांच्याच राज्यात मंत्रालय घोटाळेबाज उंदीरयुक्त झाले आहे. ते उंदीरमुक्त करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. अन्यथा, राज्यातील जनता ‘पिंजरा’ लावून बसलीच आहे!

 

Web Title: Uddhav Thackeray Criticize the BJP government over bjp leader eknath khadses fresh allegations on rat scam in mantralaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.