मुंबईत ठिकठिकाणी श्रीरामाची महाआरती; शिवसेनेचं जोरदार शक्तीप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 07:32 PM2018-11-24T19:32:01+5:302018-11-24T19:45:00+5:30

मुंबईतील 24 ठिकाणी शिवसेनेकडून महाआरती

uddhav thackeray in ayodhya for ram mandir shiv sena workers done mahaaarati in mumbai | मुंबईत ठिकठिकाणी श्रीरामाची महाआरती; शिवसेनेचं जोरदार शक्तीप्रदर्शन

मुंबईत ठिकठिकाणी श्रीरामाची महाआरती; शिवसेनेचं जोरदार शक्तीप्रदर्शन

Next

- मनोहर कुंभेजकर

मुंबई- शहरांच्या विविध भागांमध्ये आज सायंकाळी शेकडो शिवसैनिकांनी महाआरती करून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी शिवसैनिकांनी वातावरण निर्मिती करून महाआरतीच्या वेळी मंदिराच्या ठिकाणी सजावट व विद्युत रोषणाई केली होती. तर ठिकठिकाणी राम व हनुमानाचे आणि अयोध्येत उद्धव ठाकरे यांच्या होणाऱ्या महाआरतीचे व अयोध्या दौऱ्याचे मोठे कटआउट, होर्डिंग लावले होते. मुंबईतील एकूण 24 ठिकाणी महाआरतीचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठी, हिंदी आणि गुजराती भाषेतील सर्व देवांच्या आरत्या मोठ्या आवाजात ध्वनींक्षेपकावरून लावण्यात आल्या होत्या. उत्तर भारतीय नागरिकदेखील या महाआरतीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

अयोध्येत राम मंदिर लवकर बांधावे मागणीसाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे आज आणि उद्या अयोध्येत आहेत. आज सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरे, शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख अदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सांताक्रूझ येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरदेशीय विमानतळावरून अयोध्येला प्रयाण केले. यावेळी त्यांना शिवसेना सचिव व खासदार विनायक राऊत आणि उपस्थितीत शिवसैनिकांनी शुभेच्छा दिल्या.



उद्धव ठाकरे आज  सायंकाळी अयोध्येच्या शरयू तीरावर हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत महाआरती सुरू झाल्यावर राज्यातील 288 विधानसभा आणि मुंबईतील 24 ठिकाणी महाआरतीला दिमाखात सुरुवात झाली. हर हिंदुकी यही पुकार, पहिले मंदिर फिर सरकार, प्रभू श्रीराम चंद्र की जय अशा घोषणा देत शिवसैनिकांनी जयघोष केला. दक्षिण मध्य मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात झालेल्या महाआरतीला राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, शिवसेना खासदार व सचिव विनायक राऊत, शिवसेना सचिव आदेश बांदेकर उपस्थित होते.



शिवसेना शिवसेना विभाग क्रमांक 1 तर्फे आमदार व विभागप्रमुख विलास पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली दहिसर व बोरिवली विधानसभा क्षेत्रात तीन ठिकाणी महाआरतीचे आयोजन केले होते. दहिसर पश्चिम येथील विठ्ठल मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. येथे खास अयोध्येच्या राम मंदिराची 40 फुटी भव्य प्रतिकृती उभारली आहे. मागाठाणे विधानसभेतर्फे आमदार प्रकाश सुर्वे यांनी दहिसर पूर्व अशोकवन, आजी आजोबा उद्यान येथील हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजन केले होते. येथे उत्तर भारतीय नागरिक व शिवसेनेची महिला आघाडी मोठ्या संख्येने महाआरतीत सहभागी झाली होती. बोरिवली पश्चिम येथील वजिरा गणपती मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या तिन्ही ठिकाणी हजारो शिवसैनिकांनी महाआरतीत सहभाग घेतला.



शिवसेना विभाग क्रमांक 2 तर्फे विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली पश्चिम एसव्ही रोड येथील राम मंदिरात, मालाड पश्चिम सोमवार बाजार येथील राम मंदिर आणि कांदिवली पूर्व,आकुर्ली रोड येथील शिवसेना शाखा क्रमांक 24 समोर या तीन ठिकाणी सायंकाळी 6 ते 7 यावेळी महाआरती आयोजित केली होती. शिवसेना विभाग क्रमांक 3 तर्फे शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद, आमदार व विभागप्रमुख सुनील प्रभू यांनी आरे चेक नाका, सर्व्हिस रोडवरील पंचमुखी हनुमान मंदिरात महा आरतीचे आयोजन केले होते. याठिकाणी श्रीरामाचा 15 फुटी कटआउट लावण्यात आला होता. उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे खासदार व शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांच्या उपस्थितीत येथे महाआरतीला सुरुवात झाली. दिंडोशी, गोरेगाव आणि जोगेश्वरी पूर्व येथील तीन विधानसभेतील शिवसैनिक व महिला आघाडी श्रीरामाचा जल्लोष करत मिरवणुकीने व बाईक रॅली ने येथे सहभागी झाले होते.

आमदार व विभागप्रमुख अॅड.अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना विभाग क्रमांक 4 व 5 वांद्रे ते जोगेश्वरीची महाआरती विलेपार्ले पूर्व शिवाजी चौकात महाआरती व त्यापूर्वी महायज्ञ आयोजित केला होता. या दोन्ही ठिकाणच्या महाआरतीत मोठ्या संख्येने शिवसैनिक व महिला आघाडीचा सहभागी होता. यावेळी माजी नगरसेवक शशिकांत पाटकर यांनी हर हिंदू की यही पुकार, पहिले मंदिर फिर सरकार असा मथळा लिहिलेल्या सुमारे 50000 आरती पुस्तकांचे वाटप विभाग क्रमांक 4 व 5 मध्ये केले. मुंबईत ठिकठिकाणी झालेल्या महाआरतीत हिंदुत्ववादी संघटना, धार्मिक संघटना, वारकरी संप्रदाय, अध्यात्मिक मंडळ आणि इतर संघटनांचादेखील सहभाग होता.
 

Web Title: uddhav thackeray in ayodhya for ram mandir shiv sena workers done mahaaarati in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.