पेट्रोल खरेदी करणारे उपाशी मरत नाहीत, असे म्हणणारे सोंगाडे 'अच्छे दिन'चा रोज खून करताहेत - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 07:41 AM2017-09-18T07:41:48+5:302017-09-18T07:59:50+5:30

पेट्रोल, डिझेल दरवाढीची सर्वसामान्यांना झळ बसत असताना केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अल्फॉन्स कन्ननथनम यांनी इंधन दरवाढ योग्य असल्याचे सांगितले. एवढंच नाही तर कार आणि मोटारसायकल चालवणारेच पेट्रोल खरेदी करतात. पेट्रोल खरेदी करणारी मंडळी उपाशी तर मरत नाहीत ना, असे संतापजनक वक्तव्यही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केले होते.

Uddhav Thackarey Slams alphons kannanthanam on petrol diesel price rising | पेट्रोल खरेदी करणारे उपाशी मरत नाहीत, असे म्हणणारे सोंगाडे 'अच्छे दिन'चा रोज खून करताहेत - उद्धव ठाकरे

पेट्रोल खरेदी करणारे उपाशी मरत नाहीत, असे म्हणणारे सोंगाडे 'अच्छे दिन'चा रोज खून करताहेत - उद्धव ठाकरे

Next

मुंबई, दि. 18 -   पेट्रोल, डिझेल दरवाढीची सर्वसामान्यांना झळ बसत असताना केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अल्फॉन्स कन्ननथनम यांनी इंधन दरवाढ योग्य असल्याचे विधान केले आहे. एवढंच नाही तर कार आणि मोटारसायकल चालवणारेच पेट्रोल खरेदी करतात. पेट्रोल खरेदी करणारी मंडळी उपाशी तर मरत नाहीत ना, असे संतापजनक वक्तव्यही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केले होते. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून अल्फॉन्स कन्ननथनम यांचा खरपूस समाचार घेतला आहे. 'पेट्रोल खरेदी करणारे उपाशी मरत नाहीत', असे विधान करणारे एक प्रकारे 'अच्छे दिन'चा रोज खून करीत आहेत. महागाई व भुकेने माणसे उपाशी मरत नाहीत, असे मोदी सरकारच्या एका मंत्र्याने सांगितले. त्यांचे ऐका हो!, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासहीत अल्फॉन्स कन्ननथनम यांच्यावर निशाणा साधला आहे. 

नेमके काय आहे सामना संपादकीय?
काँग्रेसमध्ये मेरिटला स्थान नाही असे एक विधान अमित शहा यांनी केले आहे. याचा दुसरा अर्थ आम्ही असा घेतो की, भारतीय जनता पक्षातच फक्त गुणवत्ता म्हणजे मेरिटचा महापूर आला आहे. हे मेरिट काय लायकीचे आहे याचे दर्शन केंद्र सरकारातील ‘नवरतन’ अल्फान्स कन्ननथनम यांनी घडवले आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या होरपळीत सामान्य जनता भाजून निघाली असतानाच ही इंधन दरवाढ योग्यच आणि मस्तच असल्याची मखलाशी या अल्फान्स नामक सन्माननीय मंत्र्याने केली आहे. त्याही पुढे जाऊन ते सामान्य, मध्यमवर्गीय लोकांच्या तोंडावर असे काही थुंकले आहेत की विचारता सोय नाही. कार आणि मोटरसायकल चालविणारेच पेट्रोल खरेदी करतात. पेट्रोल खरेदी करणारी मंडळी उपाशी तर मरत नाही ना? मोदी सरकारातील हे ‘नवरतन’ अल्फान्स म्हणजे कोणी झग्यातून पडलेले देवदूत नक्कीच नव्हते. गरीबांचा इतका अपमान काँगेस राजवटीतही झाला नव्हता. काँगेस राज्यात इंधन दरवाढ झाली तेव्हा आज मंत्री असलेल्या राजनाथ सिंहांपासून सुषमा स्वराजपर्यंत आणि स्मृती इराणींपासून धर्मेंद्र प्रधानांपर्यंत सर्व भाजप नेते रस्त्यांवर उतरून आंदोलने करीत होते. रिकामी सिलिंडरे रस्त्यावर आणून चक्का जाम करीत होते. आता

याच मंडळींचे राज्य

देशात आले आहे. मात्र तेच ‘मंडळ’ जेव्हा पेट्रोल-डिझेल दरवाढीचे समर्थन करते आणि वर महागाई सहन करा असे जनतेला सांगते तेव्हा धक्का बसतो. केंद्रीय मंत्री अल्फान्स म्हणतात, पेट्रोल खरेदी करणारे उपाशी मरत नाहीत. अल्फान्स हे एक निवृत्त नोकरशहा आहेत म्हणूनच त्यांच्या तोंडून अशी मुक्ताफळे उधळली गेली आहेत. मेरिट नसलेली व लोकांशी नाते तुटलेली माणसे राजकारणात व सरकारात घुसवली की, काय होते याचा ‘मेरिट’ अनुभव सध्या देश घेत आहे. महाराष्ट्रात व देशात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यामागचे एक प्रमुख कारण पेट्रोल व डिझेलची दरवाढ आहे. त्यात लोडशेडिंगचे चटके बसत असतातच. कृषीपंप चालविण्यासाठी छोटे जनरेटर चालवावे तर डिझेल परवडत नाही. शेतमालाची वाहतूक पेट्रोल – डिझेल दरवाढीने महागते व शेतकऱ्यांस हे ओझे परवडत नाही. माल बाजारात पोहोचत नाही व त्या नुकसानीच्या धक्क्यानेही अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पेट्रोल खरेदी करणारे उपाशी मरत नाहीत असे सांगणारे मंत्री हे आज सरकारी पैशाने त्यांच्या गाडीघोड्यांत पेट्रोल भरत आहेत. सामान्य माणसांप्रमाणे त्यांच्या खिशाला चाट पडली असती तर त्यांच्या तोंडातून ही मुक्ताफळे बाहेर पडली नसती. काँगेसच्या मंत्र्याने असे एखादे बेलगाम व जनतेशी बेइमानी करणारे विधान केले असते तर आजच्या भाजप सरकारी सोंगाड्यांनी

सोशल मीडियावर मुखवटे लावून

नाचकाम केले असते, पण आज हे ‘सोंगाडे’ तोंडात कसल्या गुळण्या घेऊन बसले आहेत? लोकांना खायला अन्न नाही, शेतकरी संकटात आहे. महागाई आणि बेरोजगारीच्या वणव्यात जनता होरपळत आहे. अशी सगळी भयंकर स्थिती असताना जे लोक ‘बुलेट ट्रेन’चा उदोउदो करीत आहेत त्यांची डोकी तपासण्यासाठी त्यांना वेड्यांच्या इस्पितळात पाठवायला हवे. बुलेट ट्रेनचा तीस-चाळीस हजार कोटींचा भुर्दंड महागाई कमी करण्यासाठी वापरला असता तर बरे झाले असते, पण बुलेट ट्रेनची श्रीमंत चमचेगिरी करणारे व ‘पेट्रोल खरेदी करणारे उपाशी मरत नाहीत’ असे विधान करणारे एक प्रकारे ‘अच्छे दिन’चा रोज खून करीत आहेत. सोंगाडे सत्तेवर आणले की, मेरिटचा कसा ‘मामा’ होतो याचे दर्शन रोज घडत आहे. शेतकऱ्यांची अवस्था तुमच्या राज्यात बिकट झाली आहे व पेट्रोल, डिझेलच्या महागाईने जनतेची होरपळ सुरू आहे असे लातुरात विचारणाऱ्या एका पत्रकारास भाजपचे ‘आयात’ नेते पाशा पटेल यांनी शिव्यांची लाखोली वाहिली, चपलेने मारण्याची धमकी दिली. त्या पत्रकारास अजिबात अक्कल नावाची गोष्ट नाही व मेंदू नावाचा मांसल गोळा नाही. महागाई व भुकेने माणसे उपाशी मरत नाहीत, असे मोदी सरकारच्या एका मंत्र्याने सांगितले. त्यांचे ऐका हो!

Web Title: Uddhav Thackarey Slams alphons kannanthanam on petrol diesel price rising

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.