...अन् मुसळधार पाऊस भाजपा पदाधिकाऱ्याला 10 लाखांना पडला

By मनीषा म्हात्रे | Published: July 11, 2018 12:00 PM2018-07-11T12:00:10+5:302018-07-11T13:03:55+5:30

पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू

theft in bjp leader vilas ambekars office | ...अन् मुसळधार पाऊस भाजपा पदाधिकाऱ्याला 10 लाखांना पडला

...अन् मुसळधार पाऊस भाजपा पदाधिकाऱ्याला 10 लाखांना पडला

googlenewsNext

मुंबई : चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भाजपाच्या माहिम विधानसभा अध्यक्षाला 10 लाखांचा फटका बसला आहे. मुसळधार पाऊस असल्यानं भाजपाच्या पदाधिकाऱ्यानं 10 लाखांची रोकड बँकेत जमा न करता कार्यालयातच ठेवली. नेमकी त्याच रात्री त्याच्या कार्यालयात चोरी झाली आणि चोरट्यांनी 10 लाख रुपये लांबवले. 

माहिम भाजपा विधानसभा अध्यक्ष विलास आंबेकर व्होडाफोन गॅलरी चालवतात. माहिम पश्चिमेला त्यांची गॅलरी असून त्यामागेच त्यांचं कार्यालय आहेत. चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं त्यांनी गॅलरीत जमा होणारी रोकड बँकेत जमा करणं टाळलं. नोटा भिजू नये, म्हणून त्यांनी 10 लाखांची रोकड कार्यालयातच ठेवली. सोमवारी रात्री आंबेकर यांच्या कार्यालयात चोरी झाली. तीन चोरट्यांनी 10 लाख रुपये घेऊन पोबारा केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी तीन अज्ञात व्यक्तींविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 

विलास आंबेकर सोमवारी 10 लाखांची रोकड बँकेत जमा करणार होते. मात्र मुसळधार पाऊस असल्यानं उद्या बँकेत रोकड जमा करु, असा विचार त्यांनी केला. त्याच मध्यरात्री त्यांच्या कार्यालयात चोरी झाली. मंगळवारी पहाटे या घटनेची माहिती आंबेकर यांना समजली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या चोरांचा शोध घेत आहेत. 

कार्यालय आणि गॅलरीच्या सुरक्षेसाठी दोन कॅमरे आणि पाच लॉक आहेत. तसंच परिसरात सरकारी कॅमेरे आहेत. एवढी काळजी घेऊन देखील अशी घटना घडणं चिंताजनक आहे. मी पैसे नेहमी बँकेत जमा करतो. मात्र पावसामुळे ते शक्य झालं नाही, असं माहीम विधानसभा अध्यक्ष विलास आंबेकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं. मात्र या घटनेमुळे आमच्या सारख्यांनी व्यवसाय करायचा की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिसही हवं तसं सहकार्य करत नाही. त्यामुळे सुरक्षेचं काय?, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला.

Web Title: theft in bjp leader vilas ambekars office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.