तरुणाईला लागले ‘व्हॅलेंटाईन डे’चे वेध!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 10:07 AM2024-02-13T10:07:11+5:302024-02-13T10:07:53+5:30
व्हॅलेंटाईनसाठी डिजिटल गिफ्टला मिळतेय पसंती !
मुंबई : तरुणाईला व्हॅलेंटाईन डेचे वेध लागले आहेत. पूर्वी केवळ एक दिवस साजरा होणारा हा दिवस आताची पिढी आठवडाभर साजरा करताना दिसते, त्यामुळे या निमित्ताने गिफ्टिंग मार्केटचे विश्व तेजीत आहे. त्यात आता गिफ्टिंगसाठी तरुणाईचा कल ऑनलाइन प्लॅटफाॅर्मकडे अधिक दिसून येतो, शिवाय गिफ्टस् देताना आपलेपणा वाटण्यासाठी त्यात कस्टमायझेशन करण्याकडे तरुण पिढीचा अधिक कल दिसून येतो. सध्या व्हॅलेंटाईन वीकसाठी टेडी, आर्टिफिशियल ज्वेलरी, मग्स, वॉच, पेन, चॉकलेट्स यासारख्या गिफ्ट्सला अधिक पसंती मिळत आहे.
व्हॅलेंटाईन वीकमध्ये गिफ्ट करण्यासाठी मुंबईतील कुलाबा काॅजवे, क्राॅफर्ड मार्केट, नटराज मार्केट, लालबाग, दादर, घाटकोपर, विलेपार्ले, वांद्रे हिल रोड, लिंकिंग रोड या बाजारपेठांमध्ये मार्केटमध्ये अगदी गॅझेट्सपासून कपडे, मग्स, चाॅकलेट्स ते ब्रॅंडेड कपडे, कुर्ते, काफ्तान, ज्वेलरी आणि अँटिक पीस खरेदी करू शकतात. ऑनलाइनच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आता ऑफलाइन बाजारपेठांमध्ये प्रत्येक छोट्या सण-उत्सवांच्या काळात सेल आणि सवलतीच्या योजना सुरू असतात. त्यामुळे या मार्केट्समध्ये आता या गिफ्ट खरेदीवर तरुणाईला घसघशीत सवलत देखील मिळू शकते. तसेच, ज्यांचे भाव कमी करण्याचे कौशल्य अधिक चांगले आहे अशा लोकांसाठी या बाजारपेठांमधील खरेदी उत्तम पर्याय आहे.
मार्केटपेक्षा ऑनलाइनला पसंती :
ऑनलाइनला व्यासपीठांवर गिफ्ट खरेदी करताना बऱ्याचदा परदेशातील उत्पादनांचा अधिक प्राधान्याने विचार केला जातो. त्यात डिजिटल फ्रेम, व्हिडीओ फ्रेम्स, मेकअप किट्स, फोटो काढणारे फोन कव्हर्स, एकमेकांची आठवण करून देणारे ब्रेसलेट्स - रिंग्स, सरप्राईज प्लॅनिंग याकडे तरुणाईचा अधिक कल आहे.
शुभेच्छापत्रे लुप्त...
सोशल मीडियाच्या युगात शुभेच्छापत्रे काळाच्या पडद्याआड गेली आहेत. याउलट, व्हॉट्सॲप, फेसबुक, टेक्स्ट मेसेज, इन्स्टाग्रामसह विविध प्रकारे शुभेच्छा देण्याची घाई दिसून येते.
शुभेच्छापत्रे व संदेशाची वाट पाहण्यातली मजा आता राहिलेली नाही. बदलत्या काळाबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञान आले अन् ही शुभेच्छापत्रे गिफ्टिंगच्या दुनियेतून आता लुप्त झालेली दिसून येतात.
कस्टमायझेशनकडे अधिक कल :
गिफ्ट देताना देणाऱ्या व्यक्तीचा स्पेशल टच असावा यासाठी सध्या तरुणाई आग्रही दिसून येते. गिफ्ट देताना स्वतःच्या अक्षरात लिहिलेली नोट, ज्या व्यक्तीला गिफ्ट द्यायचे आहे त्यांच्या सोबतचा फोटो किंवा गिफ्ट कायम लक्षात राहावे यासाठी देणाऱ्याच्या आवडी निवडीचा संपूर्ण विचार करून तयार केलेले स्पेशल गिफ्ट्सना सध्या अधिक मागणी आहे. सध्या अनेक ऑनलाइन संकेतस्थळांवर या कस्टमायझेशनचे पर्याय उपलब्ध आहेत. या गिफ्ट खरेदीवर तरुणाईला घसघशीत सवलत देखील मिळू शकते.