राजकारणातील घराणेशाहीविरोधात युवा चेतनाचा लढा

By दीपक भातुसे | Published: March 3, 2024 12:11 PM2024-03-03T12:11:43+5:302024-03-03T12:12:06+5:30

राष्ट्रवादी विचारधारा घेऊन काम करणारी युवा चेतना सामाजिक संघटना राजकारणातील घराणेशाहीविरोधात काम करत असून, या संघटनेचे राष्ट्रीय संयोजक रोहितकुमार सिंग नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेले. संघटनेच्या कार्याविषयी त्यांच्याशी केलेली ही विशेष बातचीत. 

The fight of youth consciousness against nepotism in politics | राजकारणातील घराणेशाहीविरोधात युवा चेतनाचा लढा

राजकारणातील घराणेशाहीविरोधात युवा चेतनाचा लढा

दीपक भातुसे -

मुंबई : राष्ट्रवादी विचारधारा घेऊन काम करणारी युवा चेतना सामाजिक संघटना राजकारणातील घराणेशाहीविरोधात काम करत असून, या संघटनेचे राष्ट्रीय संयोजक रोहितकुमार सिंग नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेले. संघटनेच्या कार्याविषयी त्यांच्याशी केलेली ही विशेष बातचीत. 

प्रश्न : युवा चेतना स्थापनेमागचा उद्देश काय?
उत्तर : मी मूळचा बिहारचा. मागील १३ वर्षांपासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करतो आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान सभेच्या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, आता राजा-राणीच्या पोटातून नव्हे तर जनतेच्या मतातून राजा जन्माला येईल. मात्र, दुर्दैवाने आंबेडकरांचे नाव घेणाऱ्यांना त्यांनी सांगितलेल्या बाबींविषयी चिंता वाटत नाही. स्वातंत्र्यापासूनच या देशात घराणेशाहीचे बीज रोवले गेले, पुढे त्याचे रोपटे झाले आणि आज वृक्षात रूपांतर झाले आहे. काँग्रेस आणि गांधी कुटुंबाचा यात मोठा वाटा आहे. या देशात भय, भूक, भ्रष्टाचार आणि घराणेशाहीविरोधात १९७४ साली जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण क्रांती आंदोलन झाले. त्या चळवळीतून निघालेल्या लोकांनीही पुढे घराणेशाहीला प्रोत्साहन दिले. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव, उत्तर प्रदेशात मुलायमसिंह यादव ही त्याची उदाहरणे आहेत. यामुळे देशातील सामान्य तरुण आज चिंतित आहे, त्याला वाटते आपल्याबरोबर धोका झाला आहे. देशातील तरुणांची समृद्ध शक्ती एकत्रित करण्यासाठी २०१६ मध्ये आम्ही युवा चेतना संघटनेची स्थापना केली. 

प्रश्न : या संघटनेचे कार्यक्षेत्र काय आहे?
उत्तर : काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत देशाला घराणेशाहीपासून मुक्ती देण्यासाठी आम्ही काम करत आहोत. त्यासाठी देशातील युवाशी संवाद साधून त्यांना जागरूक करत आहोत. 

प्रश्न : घराणेशाहीबद्दल तुम्हाला एवढी चीड का?
उत्तर : काँग्रेस आणि स्थानिक पक्षांनी देशाचे खूप नुकसान केले. त्यांना गरीब कल्याणशी घेणे-देणे नाही. परिवार कल्याण हाच त्यांचा अजेंडा आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने आपल्याला असा नेता मिळाला जो देशातील गरीब, शेतकरी, युवा, मजदूर, वंचित वर्ग, महिलांना आपला परिवार मानून देशाच्या विकासाप्रति कटिबद्ध आहे. 

प्रश्न : तुम्ही भाजपचा प्रचार करत आहात असे वाटत नाही का?
उत्तर : मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नसून स्वतंत्र सामाजिक कार्यकर्ता आहे. नरेंद्र मोदींमुळे आज संपूर्ण जग भारताच्या मागे उभे आहे. जी-२० संमेलनाच्या वेळी दिल्लीतील राजघाटावर बापूंच्या समाधीवर जेव्हा मोदी आदरांजली वाहायला गेले तेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसह सर्व देशांचे प्रमुख मोदींच्या मागे चालत होते. तेव्हा वाटले भारत भाग्यविधाता चालत आहे. देशात २०१४ नंतर गरीब कल्याण क्षेत्रात अद्भुत काम झाले आहे. त्यामुळेच वेळोवेळी देशातील जनतेने राहुल गांधी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव यासारख्या राजकुमारांना नाकारले आहे. देशातील तरुण श्रीरामभक्तांबरोबर उभा आहे. मी देशाचा प्रचार करत आहे आणि देश मोदींबरोबर आहे.

प्रश्न : इंडिया आघाडीबद्दल तुमचे काय मत आहे? 
उत्तर : आपले आणि आपल्या परिवाराचे अस्तित्व टिकवण्यासाठी ही आघाडी लढाई लढत आहे. तर दुसरीकडे मोदी भारतमातेचे वैभव वाढवण्यासाठी काम करत आहेत. राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे बहादूरशाह जफर आहेत आणि घराणेशाहीचे संरक्षक आहेत. देशाचा तरुण त्यांना धडा शिकवेल. मी देशभरातील युवा वर्गाला नियमित भेटत आहे आणि त्यांना आवाहन करत आहे की, भारताला विश्वगुरू बनविण्याच्या अभियानात त्यांनी पुढे यावे.

प्रश्न : युवा चेतनाचे महाराष्ट्रात कसे कार्य सुरू आहे? 
उत्तर : महाराष्ट्रात युवा चेतना संघटनेला ग्रामीण भागात मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. मुंबई, पुणे, नागपूर, यवतमाळ, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, कोल्हापूर या जिल्ह्यांचा मी दौरा केला आहे. महाराष्ट्रात प्राथमिक स्तरावर संघटना वाढत आहे, मुंबईत चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यभर कार्यक्रम करून राज्यातील तरुणांना आमच्यासोबत जोडण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केला आहे. महाराष्ट्र ही महात्मा ज्योतिबा फुले यांची जन्म आणि कर्मभूमी, आंबेडकरांची कर्मभूमी आहे. गरीब उद्धार, शैक्षणिक सुधारणा आणि वंचित वर्गाच्या उद्धाराचे केंद्र महाराष्ट्र राहिले आहे. इथे आले की एका अद्भुत ऊर्जेचीप्रचिती येते. 

प्रश्न : मोदी सरकारची महत्त्वपूर्ण उपलब्धी काय वाटते?
उत्तर : देशात ५०० वर्षांपासून भगवान श्रीरामाचे मंदिर होऊ शकले नाही. स्वात्र्यानंतर ७५ वर्षांनी हे मंदिर निर्माण झाले, त्याचे श्रेय मोदींना जाते. काँग्रेसने ५० वर्षांपेक्षा जास्त काळ या देशात राज्य केले, त्यांना कधीच रामाची चिंता नव्हती. २२ जानेवारीच्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा समारंभात आणि त्यापूर्वी सर्वोच्च न्यायालय आणि सार्वजनिकरीत्या श्रीरामाच्या अस्तित्वावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले. काँग्रेस सनातन आणि श्रीरामविरोधी आहे हे स्पष्ट आहे. रामविरोधामुळे जनता काँग्रेसला ४० जागाही देणार नाही.

Web Title: The fight of youth consciousness against nepotism in politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.