मुंबईवर झाले अनेक भेकड अतिरेकी हल्ले , तरीही मुंबई स्पिरीट राहिली कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 05:53 PM2017-11-27T17:53:57+5:302017-11-27T18:42:23+5:30

मुंबईवर असे अनेक भेकड हल्ले झाले पण मुंबई कायम खंबीरपणे उभी राहिली.

terror attacks on mumbai and mumbai spirit | मुंबईवर झाले अनेक भेकड अतिरेकी हल्ले , तरीही मुंबई स्पिरीट राहिली कायम

मुंबईवर झाले अनेक भेकड अतिरेकी हल्ले , तरीही मुंबई स्पिरीट राहिली कायम

googlenewsNext
ठळक मुद्देभारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराने अनेक दुर्देवी घटना पाहिल्यात.मुंबईला बॉम्बस्फोटाचा पहिला हादरा बसला तो १९९३ साली. हे दुर्दैवी चक्र २०११ पर्यंत चालुच होतं. मानसिक, आर्थिक , सांस्कृतिक आणि व्यवस्थापकीय स्तरावर हादरवण्यासाठी असे भ्याड हल्ले मुंबईवर अनेकदा केले आहेत.

मुंबई : भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर अनेकांचा डोळा आहे. सगळ्यात मोठी लोकसंख्या असलेल्या या शहराने अनेक दुर्देवी घटना पाहिल्यात. पण तरीही मुंबई केव्हाच थांबली नाही. बस बंद, रेल रोको, टॅक्सी-रिक्षा बंद अशा वाहतूक व्यवस्थाही बंद झाल्या तरी मुंबईकरांनी हार पत्कारली नाही. तसंच मोठ मोठ्या बॉम्ब स्फोट, दहशतवादी हल्ल्यानंतरही मुंबई शांत बसली नाही. सतत धावणाऱ्या या मुंबईने आपला प्रवास नेटाने सुरू ठेवला. दुर्दैवी घटना घडल्यावर मुंबईकरांनी एकमेंकाना साथ देत या कटू प्रसंगातून वाट काढण्याचा प्रयत्न केला. २६-११ च्या हल्ल्याला नुकतेच नऊ वर्ष पूर्ण झाले. पण केवळ २६-११ चाच हल्ला मुंबईला हादरवणारा नव्हता. याआधीही मुंबईने अनेक हल्ले पाहिले. मात्र तरीही मुंबईकराने या कोणत्याच गोष्टीला न भिता पुन्हा नव्याने सुरुवात केली. 

१९९३ चा साखळी बॉम्बस्फोट 

मुंबईला बॉम्बस्फोटाचा पहिला हादरा बसला तो १९९३ साली. १२ मार्च १९९३ साली साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. या स्फोटात तब्बल २५७ जणांनी प्राण गमावले तर ७०० पेक्षा जास्त लोक जखमी होते. १९९२ च्या डिसेंबरमध्ये बाबरी मशिद पाडण्यात आली होती. या घटनेचा बदला म्हणून डी कंपनीने दाऊद इब्राहिमच्या नियोजनाखाली हा कट रचला होता. मुंबईत जवळपास १२ ठिकाणी एकाच दिवशी बॉम्ब ब्लास्ट झाला. सगळ्यात प्रथम दुपारी १.३० वाजता मुंबई शेअर मार्केट इमारतीच्या तळमजळ्यावर स्फोट झाला. यात ८४ ठार तर २१७ जण जखमी झाले. त्यानंतर दुपारी २.१५ वाजता नरसी नाथा स्ट्रीट, कथा बाजार येथे स्फोट घडवण्यात आला, त्यावेळी ४ ठार, १६ जखमी झाले. दुपारी २.३० वाजता शिवसेना भवनाजवळील पेट्रोल पंपाजवळ स्फोट झाला, यामध्ये ४ ठार आणि ५० जण जखमी झाले. नरिमन पॉईंटच्या एअर इंडिया इमारतीत २.३३ वाजता हल्ला झाला, त्यात २० जण ठार आणि ८७ लोक जखमी झाले. त्यानंतर दुपारी २.४५ वाजता माहिमच्या मच्छिमार वसाहतीत स्फोट झाला, त्यामध्ये ३ ठार आणि ६ जण जखमी झाले. वरळीच्या सेंच्युरी बाजारात झालेल्या स्फोटात ११३ ठार आणि २२७ जखमी होते. झवेरी बाजारातही ३च्या दरम्यान हल्ला झाला त्यामध्ये १७ जणांनी प्राण गमावला तर ५७ जण जखमी होते. वांद्रे येथील हॉटेल सेना रॉक मध्येही स्फोट घडवून आणला  होता. त्यानंतर ३.१३ च्या दरम्यान दादरच्या प्लाझा सिनेमात स्फोट झाला, यामध्ये १० जणांनी प्राण गमावले. जुहू सेंटरमध्येही ३.२०च्या दरम्यान स्फोट झाला. सहार विमानतळावरही स्फोटके रचण्यात आली होती. हॉटेल एअरपोर्टसेंटरमध्येही स्फोट घडवून आणला. १९९२च्या डिसेंबरमध्ये बाबरी मशिद पाडली तेव्हाही मुंबईत दंगल उसळली होती. दंगलीच्या धक्यातून मुंबई सावरतेय तोपर्यंत साखळी बॉम्ब स्फोट घडवण्यात आले. पण तरीही मुंबई थांबली नाही. 

आणखी वाचा - मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोट खटल्यातील कैदी आता कारागृहात सुरक्षा रक्षक

२ डिसेंबर २००२

१९९३ साली झालेला बॉम्ब स्फोट हा बाबरी मशिद पाडल्याच्या निषेधार्थ होता. आणि बाबरी मशिद पाडल्यास दहा वर्ष झाल्यानंतरही पुन्हा २००२ साली हा बॉम्ब स्फोट घडवण्यात आला. ६ डिसेंबर २००२ ला बाबरी मशिद पाडल्यास १० वर्ष पूर्ण होणार होती. त्यासाठी चार दिवस आधीच म्हणजेच २ डिसेंबर २००२ साली घाटकोपरच्या एका बी.ई.एस.टी बसमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. घाटकोपर स्थानकाजवळ ही बस येताच स्फोट घडला, यामध्ये २ दोघांनी आपले प्राण गमावले तर ५० हून अधिक जण जखमी झाले होते. हा स्फोट घडला तेव्हा मुंबईभर पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला. पोलिसांनी मुंबईभर पाळत ठेवली. म्हणूनच पुढचा बॉम्ब स्फोट टाळण्यात पोलिसांना यश मिळालं. अंधेरीतल्या सिप्झ या इंडस्ट्रियल विभागात हा स्फोट होणार होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा स्फोट उधळण्यात आला. 

२७ जानेवारी २००३

२ डिसेंबरच्या स्फोटाने मुंबईकर सावतोय ना सावरतोय तोच काहीच दिवसांनी म्हणजेच २७ जानेवारी २००३ साली विले पार्लेच्या स्थानकाजवळ बॉम्ब स्फोट घडवण्यात आला. या स्फोटात एका मुंबईकराचा जीव गेला तर २८ मुंबईकर जखमी झाले होते. तत्कालिक पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेस मुंबई भेटीसाठी आले होते, म्हणूनच हा बॉम्ब स्फोट घडवण्यात आला होता.

१३ मार्च २००३

मुंलुंड स्थानकावर २००३ साली पुन्हा बॉम्ब स्फोट घडवण्यात आला होता. १३ मार्च २००३ साली मुलुंड स्थानकावर झालेल्या बॉम्ब स्फोटात १० प्रवाशांचा जीव गेला. रेल्वेच्या फर्स्ट क्लासमध्ये हा बॉम्ब पेरण्यात आला होता. त्यावेळेस फर्स्ट क्लासमधील ४ महिला आणि फर्स्ट क्लास डब्याच्या बाजूला पुरुषांचा सेकंड क्लास डबा होता, त्या डब्यातील ६ पुरुषांचा या मृतांमध्ये समा‌वेश आहे. ६ महिलांपैकी २ महिला पोलीस कॉन्स्टेबल होत्या. 

आणखी वाचा - दाऊदसह फरार २७ आरोपी आता आले आहेत भारताच्या टप्प्यात, ९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटल्याचा इतिहास

२८ जुलै २००३

आठ महिन्यांपासून सुरू असलेलं बॉम्ब स्फोटांचं सत्र संपता संपत नव्हतं. मुंबईकारंच्या डोक्यावर टांगती तलवार लागूनच होती. केव्हा कुठे काय होईल याचा काहीच पत्ता नव्हता. पोलिसही आपलं कर्तव्य अत्यंत नेटाने सांभाळत होते, डोळ्यात तेल टाकत प्रत्येक सुरक्षा रक्षक आपली जबाबदारी पार पाडत होता. मात्र तरीही २८ जुलै २००३ साली घाटकोपरमध्ये पुन्हा स्फोट घडवून आणला. यावेळेसही घाटकोपरच्या बससचाच वापर करण्यात आला. लाल बहादुर शास्त्री मार्गावर हा बॉम्ब स्फोट हल्ला झाला. ज्या बसमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आला होता त्या बसच्या मागे एक रिक्षा येत होती. या रिक्षात एक महिला प्रवासी होती. ज्यावेळेस हा बसचा स्फोट झाला तेव्हा रिक्षातील चालक आणि प्रवासी दोघेही जागीच ठार झाले. हा स्फोट ज्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला ते म्हणाले अचानक एक मोठा आवाज आला, त्यावेळेस रिक्षातील महिला काही फूट उडून खाली पडली आणि तिथेच तिचा मृत्यू झाला. या स्फोटात ४ जणांना जीव गमवावा लागला तर ३२ लोक जखमी झाले होते. 

आणखी वाचा : लष्कर-ए-तय्यबाचा विशेष कसाब क्लास

२५ ऑगस्ट २००३

१९९३ सालापासून मुंबईत ज्याप्रकारे बॉम्ब सत्र सुरू होते त्यामुळे मुंबईकर पूर्णपणे घाबरला होता. मात्र तरीही मुंबई कधीच थांबली नाही. कितीही संकंट आली तरीही मुंबईकर दुसऱ्या दिवशी नेटाने आणि आत्मविश्वासाने घराबाहेर पडत होता. घरातून बाहेर पडणारी व्यक्ती सुखरुप घरी परतावी याकरता घरातली मंडळी देवाकडे विनवणी करीत असत. अशा विवंचनेत जगत असताना मुंबईत पुन्हा २००३ च्या ऑगस्ट महिन्यात मोठा स्फोट झाला. मुंबईतल्या झवेरी बाजार आणि गेट वे ऑफ इंडियात कारमध्ये झालेल्या या बॉम्ब ब्लास्टने ५४ जणांचे बळी घेतले. या हल्ल्याची जबाबादारी त्यावेळेस कोणी स्विकारली नव्हती. मात्र लष्कर ए-तोयबाने हल्ला घडवून आणल्याचं स्पष्ट झालं होतं. नेमक्या दुपारच्या जेवणासाठी कर्मचारी बाहेर पडतात त्यावेळेस हा स्फोट घडवून आणला. हल्ला झाल्यानंतर पुढच्या पाचच दिवसात अश्रत अन्सारी, हानिफ सय्यद आणि फहमिदा यांना या हल्ल्यासाठी अटक करण्यात आली होती. 

११ जुलै २००६

२००३ सालानंतर मुंबई सुरळीत झाली. बॉम्ब स्फोटाची मालिका संपली म्हणून मुंबईकर विसावला होता. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. पण पुन्हा तीन वर्षांनी म्हणजेच २००६ साली रेल्वेत साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आला. पश्चिम रेल्वेच्या मार्गावर जास्त वर्दळीच्या वेळीच हा कट रचण्यात आल्याने तब्बल २०० मुंबईकरांनी आपला जीव गमावला तर ७०० हून अधिक मुंबईकर जखमी झाले होते. लष्कर ए तोयबाने अगदी कट कारस्थान रचून नियोजन पद्धतीने ११ मिनिटाच्या कालावधीत ७ बॉम्बस्फोट घडवून आणले होते. आरोपींनी सात रेल्वेमध्ये स्फोटकांच्या सात पिशव्या ठेवल्या होत्या. माहिमवर सगळ्यात आधी स्फोट घडला, त्यानंतर आठ मिनिटाच्या कालावधीत भाईंदर, सांताक्रुझ, माहिम, वांद्रे, जोगेश्वरी, बोरीवली, खार रोड या स्थानकावरही स्फोट झाले. या हल्ल्यातील सात आरोपींना जन्मठेप तर पाच जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. 

आणखी वाचा - जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तय्यबाच्या सहा अतिरेक्यांचा खात्मा, एका जवानास वीरमरण

२६ नोव्हेंबर २००८

संपूर्ण मुंबईला हादरवणारी घटना घडली ती २६ नोव्हेंबर २००८ साली. या घटनेच्या जखमा आजही कित्येकांच्या भरून निघालेल्या नाहीत. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान जवळपास तीन दिवस हा हल्ला चालला होता. त्यामुळे संपूर्ण मुंबई घाबरलेल्या अवस्थेत होती. संपूर्ण मुंबईभर हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह २०० जण ठार झाले होते. तर तब्बल ८०० हून अधिक लोक जखमी झाले होते. या हल्ल्यात मुंबई पोलीस आणि भारतीय सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांना ठार केलं होतं. एकूण दहा ठिकाणी एकाच वेळी हा हल्ला करण्यात आला होता. यामध्ये आठ हल्ले दक्षिण मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी झाले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला व हातबॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त माझगांव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सी मध्ये स्फोट झाला. शहीद तुकाराम ओंबळे यांनी या हल्ल्या दरम्यान २६ नोव्हेंबरलाच अजमल आमीर कसाब या दहशतावाद्याला जिवंत पकडून दिले होते. मात्र यात ओंबळे यांचा मृत्यृ झाला. कसाबने दिलेल्या माहितीनुसार हे सगळे दहशतवादी पाकिस्तानहून समुद्रमार्गे आले होते. त्यानंतर त्यांनी नियोजन आखून एकाचवेळी गोळीबार, हातबॉम्ब फेकून हल्ला चढवला. यावेळेस १७ पोलिसांनाही वीरमरण आले. या हल्ल्याला नुकतेच ९ वर्षे पूर्ण झाले. संपूर्ण मुंबईला एका झटक्यात थांबवणाऱ्या या हल्ल्यामुळे मुंबई दोन दिवस बंद होती. शाळा, कॉलेज, शेअर मार्केट सारंकाही बंद होतं. मात्र त्यानंतर मुंबई पुन्हा पूर्वीसारखी धावू लागली. 

आणखी वाचा - मुंबईवरच्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर आतंकवाद्यांचा चेहरा बदलतोय

१३ जुलै २०११

मुंबईने आजवर ए‌वढे बॉम्ब स्फोट पाहिले. अनेक हल्ले अंगावर झेलले. २६-११ चा हल्ला मुंबईकरांना हादरवणारा होता. त्यातून मुंबईकरांनी स्वत:ला सावरलं आणि पुन्हा कामाला सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा तीन वर्षांनी २०११ साली रेल्वेत साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. १३ जुलै २०११ साली दादर, झवेरी बाझार, ऑपेरा हाऊस अशा तीन ठिकाणी गर्दीच्या वेळेत स्फोट घडवण्यात आले. यामध्ये १९ मृत आणि १३० हून अधिक लोक जखमी झाले होते. इंप्रोव्हाइज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाईसेस या स्फोटकांच्या मदतीने हे हल्ले घडवण्यात आले होते. दादरच्या डिसिल्व्हा हायस्कूल आणि गोल हनुमान मंदिराजवळील बेस्ट बस थांब्याच्या मीटर बॉक्समध्ये संध्याकाळी पावणे सात वाजता बाँबस्फोट झाला. झवेरी बाजार येथील खाऊ गल्लीतही संध्याकाळी सातच्या सुमारास मोठा स्फोट झाला. येथे एका छत्रीमध्ये हा बॉम्ब लपवून ठेवण्यात आला होता. हिरे व्यापाराचे मोठे केंद्र असलेल्या ऑपेरा हाऊस येथील प्रसाद चेंबर इमारतीजवळील बसस्टॉपजवळ तिसरा बॉम्बस्फोट झाला.

Web Title: terror attacks on mumbai and mumbai spirit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.