धक्कादायक! चहा वेळेत दिला नाही म्हणून पत्नीला जाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 04:36 AM2018-10-29T04:36:46+5:302018-10-29T06:46:23+5:30

पाच दिवस मृत्यूशी झुंज; ट्रॉम्बे पोलिसांत गुन्हा

The tea was not given in time so the wife was burnt | धक्कादायक! चहा वेळेत दिला नाही म्हणून पत्नीला जाळले

धक्कादायक! चहा वेळेत दिला नाही म्हणून पत्नीला जाळले

Next

- मनीषा म्हात्रे 

मुंबई : केवळ चहा वेळेत दिला नाही म्हणून रागाच्या भरात पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याची घटना घडली आहे. तब्बल पाच दिवस ही विवाहिता मृत्यूशी झुंज देत होती. अखेर गुरुवारी तिची मृत्यूशी झुंज संपली. बुलडाण्याच्या वृद्ध शेतकऱ्याच्या मुलीसोबत काळीज पिळवटून टाकणारी ही घटना घडली. या प्रकरणी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून ट्रॉम्बे पोलीस तपास करत आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यात ६७ वर्षीय शेतकरी मधुकर नाथाजी बनसोडे राहतात. दोन मुले आणि दोन मुली असे त्यांचे कुटुंब. दिवस-रात्र एक करून मुलांचे शिक्षण पूर्ण केले. पुढे दोन्ही मुलींचे लग्न लावून दिले. मुलींच्या सुखी संसाराचे स्वप्न रंगवत असतानाच, लग्नाच्या दोन महिन्यांतच लहान मुलगी शिल्पा (२१) आजारी पडली आणि सासरच्या जाचाला कंटाळून तिने सासरी जाण्यास नकार देत घटस्फोट घेतला. त्यानंतर ती वडिलांकडेच राहू लागली. काही दिवस उलटल्यानंतर मुंबईतील नरेश एकनाथ भांबळेचे तिला स्थळ आले. त्याचेही पहिले लग्न झाले असून पत्नी सोडून गेली होती. तसेच शिल्पाच्या लग्नाबाबत त्याला कल्पना होती. मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून बनसोडे यांनी मुलीचा २८ मे २०१७ रोजी नरेशसोबत विवाह जुळवला. लग्नात नरेशने ३ हजार रुपयांची मागणी केली. त्यांनी कसेबसे दोन हजार रुपये जमवून दिले.

लग्नानंतर शिल्पा चेंबूरच्या पांजरापोळ परिसरात सासू, सासरे यांच्यासोबत राहू लागली. लग्नाच्या दोन महिन्यांतच काम येत नाही, डबा लवकर करत नाही, असे म्हणून सासरच्यांनी तिला घरी आणून सोडले. वर्षभराने ७ आॅक्टोबर रोजी सासरची मंडळी शिल्पाला घेऊन गेले. १५ आॅक्टोबर रोजी मोठ्या मुलीला मुलगी झाल्याने त्याने शिल्पाला तिला भेटून येण्यास सांगितले. त्यानंतर मुलीच्या खुशालीसाठी कॉल सुरू असताना, पोलीस ठाण्यातून ती जळाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी मुंबईत धाव घेतली, तेव्हा २० आॅक्टोबर रोजी सकाळी वेळेवर चहा दिला नाही म्हणून नरेशने तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जाळल्याचे शिल्पाने वडिलांना सांगितले.

त्याच अवस्थेत ती आली रस्त्यावर
पतीने पेटवल्यानंतर ती त्याच अवस्थेत रस्त्यावर आली. तेव्हा शेजारच्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर पती पळून गेल्याचे तिला समजले. शिल्पाच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: The tea was not given in time so the wife was burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग