'फुलपाखरांचे अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्नशील'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 04:22 AM2019-06-16T04:22:25+5:302019-06-16T04:23:09+5:30

‘छान किती दिसते फुलपाखरू’ एवढ्यावरच समाधान मानून चालणार नाही. तर, त्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी, संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ (पुणे) प्रयत्नशील आहे

'Striving to Preserve Flowerpot' | 'फुलपाखरांचे अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्नशील'

'फुलपाखरांचे अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्नशील'

googlenewsNext

- सागर नेवरेकर 

‘छान किती दिसते फुलपाखरू’ एवढ्यावरच समाधान मानून चालणार नाही. तर, त्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी, संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ (पुणे) प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून फुलपाखरांची ओळख सर्वसामान्यांना व्हावी यासाठी फुलपाखरांना बोलीभाषेतील नावे देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. यासंदर्भात मंडळाचे सदस्य डॉ. जयंत वडतकर यांच्याशी केलेली बातचीत....

प्रश्न : फुलपाखरांना इंग्रजी नावे कशी देण्यात आली?
उत्तर : भारतात ब्रिटिशांनी सर्वप्रथम फुलपाखरांवर अभ्यास केल्यावर त्यांना लॅटिन भाषेत नावे दिली. त्याला इंग्रजीतही नाव दिले. त्या वेळेस फुलपाखरांवरील सर्व अभ्यास ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केला होता. त्यामुळे त्यांची नावे, पद यावरून फुलपाखरांचे बारसे झाले. भारतातील काही पक्षी अभ्यासक, संशोधकांनीही इंग्रजी व बोलीभाषेत नावे दिली.

प्रश्न : मराठीत नावांची संकल्पना कशी सुचली?
उत्तर : सर्व फुलपाखरांना आपण फुलपाखरूच म्हणतो. त्यांची इंग्रजी नावे फारसी प्रचलित नाहीत. ती फक्त अभ्यासकांना माहीत असतात. त्यामुळे आपल्या भाषेत नावे असावीत, असा विचार झाला; आणि यातूनच मराठी नावांची संकल्पना सुचली.

प्रश्न : त्यात कोणते निकष ठरवले?
उत्तर : मराठी नावे ठरविताना ती शक्यतो बोली भाषेतील असावीत. उच्चारासाठी सोपी ठरतील, आदी नियम व अटी ठरवल्या. तसेच फुलपाखरांचा रंग, आकार, रूप, सवयी, उडण्याच्या पद्धती आवडी-निवडी इत्यादी निकष ठरवले.

प्रश्न : प्रसारासाठी कोणते प्रयत्न करणार?
उत्तर : महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ बैठक घेऊन मराठी नावांना मान्यता देईल. त्यानंतर ही नावे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी बुकलेट प्रकाशित केले जाईल. वनविभाग व शिक्षण विभागाच्या माध्यमातून ते शाळांपर्यंत पोहोचविण्याचे काम होईल. लॅटिन, इंग्रजी, मराठी अशा तिन्ही भाषांमधील पुस्तिका तयार करून जास्तीतजास्त लोकांपर्यंत वितरित होतील.

महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू घोषित
तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य फुलपाखरू घोषित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने राज्य सरकारला प्रस्ताव दिला होता. त्यास मंजुरी मिळाल्याने राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. महाराष्ट्रानंतर उत्तराखंड, कर्नाटक आणि आता गोवा ही राज्ये राज्य फुलपाखरू घोषित करत आहेत. त्यामुळे आता फुलपाखरांवर चर्चा सुरू झाली आहे. त्यांचे अस्तित्व जपण्यासाठी हा चांगला प्रयत्न आहे.

समितीची स्थापना कशी केली?
महाराष्ट्र जैवविविधता मंडळाने फुलपाखरांना मराठी नावे देण्यासाठी पुढाकार घेऊन त्यासाठी मान्यता घेतली. त्यानंतर समिती स्थापन केली. समितीत या क्षेत्रात काम करणाऱ्यांचा समावेश केला. मंडळाचे अध्यक्ष विलास बर्डेकर यांनी जातीने याकडे लक्ष दिले. आंबोलीचे हेमंत ओगळे, बीएनएचएसचे राजू कसंबे, ठाण्याचे दिवाकर ठोंबरे, जळगावचे अभय उजागरे आदींच्या सहभागातून समिती झाली.

Web Title: 'Striving to Preserve Flowerpot'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.