समतोल जीवनशैली हाच हृदयविकारावरील उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 02:55 AM2018-11-24T02:55:11+5:302018-11-24T02:55:30+5:30

धकाधकीच्या जीवनात बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यात हृदयविकार हा गंभीर आजार आहे. तो तरुणपिढीमध्ये सर्रास आढळताना दिसतो आहे.

 The solution of heart disease is the equilibrium lifestyle | समतोल जीवनशैली हाच हृदयविकारावरील उपाय

समतोल जीवनशैली हाच हृदयविकारावरील उपाय

Next

धकाधकीच्या जीवनात बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यात हृदयविकार हा गंभीर आजार आहे. तो तरुणपिढीमध्ये सर्रास आढळताना दिसतो आहे. या पार्श्वभूमीवर हृदयविकाराचे प्रमाण कमी करण्यासाठी आहारातील कर्बोदकांच्या सेवनावर नियंत्रण राखून प्रथिनांचे अधिक सेवन केले पाहिजे. तसेच, समतोल जीवनशैली हीच हृदयविकारावर नियंत्रण मिळविण्यासाठीची गुरुकिल्ली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या आजारावर कोणते प्रतिबंधात्मक उपाय योजावेत, नेमकी कोणती पथ्ये पाळावीत याविषयी न्यू यॉर्कमधील माऊंट सिनानी रुग्णालयाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि जयपूर येथील इटर्नल हार्ट केअर सेंटर अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. समिन शर्मा हे वांद्रे येथील कार्डिओलॉजी सोसायटी आॅफ इंडियाच्या परिषदेसाठी मुंबईत आले असताना त्यांच्याशी साधलेला संवाद...

बदलती जीवनशैली हृदयविकारास कारणीभूत आहे का?
बदलती जीवनशैली, निकृष्ट आहार, व्यायामाचा अभाव आणि अपुरी झोप या गोष्टीही हृदयरोगास कारणीभूत आहेत. सध्या सात्त्विक अन्न खाल्ले जात नाही. सध्याची तरुणाई जंक फूडच्या मागे आहे. सात्त्विक नसलेला आहार सातत्याने पोटात जात असल्याने हृदयरोग होतो, आहारात समतोल बाळगला जात नाही. त्याशिवाय जागतिक स्तरावर प्रदूषणाचे प्रमाणही खूपच वाढलेले आहे. त्यामुळे त्याचे परिणाम शरीरावर आणि त्याचबरोबर हृदयावर होतात. पूर्वी प्रदूषणामुळे केवळ फुप्फुसाला त्रास होत असल्याचे बोलले जायचे, मात्र हृदयविकारांमागेही प्रदूषण हे मुख्य कारण आहे. त्याचप्रमाणे, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हे हृदयविकारास फार मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. धूम्रपान, तंबाखू किंवा गुटखा यांच्या सेवनाचे प्रमाणही अधिक आहे, हृदयरोगाची व्याधी जडण्यास हेसुद्धा गंभीर कारण आहे.

तरुणाईमध्ये दिसून येणाऱ्या हृदयविकाराची कारणे कोणती?
मानसिक ताण हाही हृदयविकाराचे प्रमाण वाढविणारा तरुणाईमधील महत्त्वाचा घटक आहे. सध्याची तरुणाई करिअरच्या मागे असल्याने अनियमित आणि अधिक वेळ कामात स्वत:ला गुंतवून घेते. त्याचा परिणाम मानसिक ताण वाढण्यावर होतो. धकाधकीच्या जीवनात अनेकदा मानसिक स्वास्थ्य बिघडते. मनाचा परिणाम शरीरावर होत असल्याने शारीरिक आजार जडतात. अधिक मानसिक ताण हृदयविकार जडण्यास कारणीभूत ठरतो, हृदयविकाराचे प्रमाण कमी करण्यासाठी जनजागृतीची मोठी गरज आहे.

अन्य देशांच्या तुलनेत देशात हृदयविकाराची काय स्थिती आहे?
जागतिक स्तराचा विचार केला असता अन्य देशांमध्येही अमेरिकेतही हृदयविकाराची स्थिती सारखीच आहे, म्हणजेच तिथेही सातत्याने हृदयविकाराचा झटका आणि ब्लॉकेजेस्चे निदान होणारे रुग्ण अधिक आहेत. मात्र उपचार पद्धतींमध्ये तफावत आहे. आपल्याकडे वंचित गटातील रुग्णांना उपचार मिळणे खूप कठीण होते, बºयाच रुग्णांना हे उपचार परवडत नाहीत. त्यामुळे हृदयविकाराने होणाºया मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. मात्र याउलट स्थिती अमेरिकेत आहे. तिथे प्रत्येक रुग्णाला उत्तम दर्जाची आरोग्यसेवा मिळते, त्वरित उपचार केले जातात. त्यामुळे तेथील रुग्णांना दीर्घायुष्य लाभते. मात्र देशातील हृदयविकारांवरील उपचारपद्धतीत प्रगती व्हावी यासाठी वेगवेगळ्या पातळीवर संशोधन सुरू आहे.

हृदयविकार टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला पाहिजेत?
शारीरिक कष्ट न करता बैठे काम, जेवणाच्या व झोपेच्या चुकीच्या वेळा या सवयींमध्ये बदल केला पाहिजे. हृदयविकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी समतोल जीवनशैली अंगीकारली पाहिजे. त्याचप्रमाणे, रोजच्या आहारातील कर्बोदकांचे सेवन कमी करून प्रथिनांचे सेवन अधिक करण्यावर भर दिला पाहिजे. तसेच, दर आठवड्याला किमान चार तास आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यात वेळ घालविला पाहिजे. त्यात संगीत ऐकणे, चालणे, योगा, ध्यानधारणा, छंदाला वेळ देणे अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. याशिवाय, दररोज २ ते ३ फळांचे सेवन करावे. तसेच, आहारावर नियंत्रण ठेवून शारीरिक - मानसिक व्यायाम, योगाही करणे गरजेचे आहे.
या सर्व सवयींमुळे हृदयविकाराचे प्रमाण कमी होण्यास निश्चित मदत होते. त्याचप्रमाणे, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग या तिघांचा एकमेकांशी संबंध आहे. त्यामुळे मधुमेहाची व रक्तदाबाची तपासणी वेळोवेळी करणे गरजेचे आहे. कित्येकदा हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कळते की रुग्णाला मधुमेह होता. मधुमेह व उच्च रक्तदाब असेल तर ते हृदयविकाराला निमंत्रण असते. त्यामुळे सहा महिन्यांनी प्रत्येकाने आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे.

हृदयविकारासंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणते नवीन संशोधन होत आहे?
आंतरराष्ट्रीय पातळीवर औषधोपचार आणि शस्त्रक्रियांच्या दृष्टिकोनातून संशोधन होत आहे. त्यात नवीन महत्त्वाचे पाऊल म्हणजे हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणारे ‘माय व्हॉल्व्ह’ (े८ ५ं’५ी) हे उपकरण देशात लाँच करत आहोत. या उपकरणाच्या संशोधनात जयपूरच्या इटर्नल हार्ट केअर सेंटर अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटची महत्त्वाची भूमिका आहे. या उपकरणाला शासनाने मान्यता दिली असून १२ डिसेंबर रोजी देशात वापरण्यात येणार आहे. या उपकरणाची किंमत अजून निश्चित झाली नसली तरीही साधारण सहा लाखांएवढा खर्च अपेक्षित आहे. याखेरीज, गुगल प्लेस्टोअरवर हृदयात असणाºया ब्रांच पॉइंटविषयी मार्गदर्शन करणारे अ‍ॅप तयार केले आहे. इकऋवफउअकऊ हे अ‍ॅपचे नाव असून देशभरात १० हजारांहून अधिक व्यक्तींनी हे डाऊनलोड केले आहे. त्याचप्रमाणे, डिजिटल तंत्रज्ञानाला केंद्रस्थानी ठेवून ‘लाइव्ह केस ड्रेमोंस्ट्रेशन’ पद्धती सुरू करण्यात आली आहे. २००९ साली सुरू झालेल्या या पद्धतीत वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना एका ठिकाणी हाताळण्यात येणारी केसस्टडी एकाच वेळी १३० देशांतून पाहता येते, अभ्यासता येते. यादरम्यान सूचना, मार्गदर्शन, प्रश्नोत्तरांद्वारे वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिकविण्यात येते.

कार्डिओलॉजी सोसायटी आॅफ इंडियाच्या माध्यमातून कोणते प्रयत्न केले जात आहेत?
कार्डिओलॉजी सोसायटी आॅफ इंडियाच्या माध्यमातून जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर तज्ज्ञ एका व्यासपीठांतर्गत एकत्र आले आहेत. या परिषदेत हृदयविकार संदर्भातील संशोधन, उपचारपद्धती याविषयीच्या विचारांचे आदान- प्रदान केले जाणार आहे. या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना हृदयविकाराचे विविध पैलू शिकण्यास मदत होईल.

(मुलाखत : स्नेहा मोरे)

Web Title:  The solution of heart disease is the equilibrium lifestyle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई