धूर फवारणी बंद, साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची भीती

By जयंत होवाळ | Published: December 29, 2023 07:21 PM2023-12-29T19:21:59+5:302023-12-29T19:22:10+5:30

मुंबई : धूर फवारणी बंद असल्याचा फटका मुंबईतील विविध भागांना बसू लागला असून अंधेरी पूर्व भागात मलेरिया , चिकनगुनिया ...

Smoke spraying stopped, fear of increased risk of epidemics | धूर फवारणी बंद, साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची भीती

धूर फवारणी बंद, साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची भीती

मुंबई: धूर फवारणी बंद असल्याचा फटका मुंबईतील विविध भागांना बसू लागला असून अंधेरी पूर्व भागात मलेरिया , चिकनगुनिया आदी आजारांमध्ये वाढ झाल्याची तक्रार या भागातील रहिवाशांनी केली आहे. गेल्या १५ दिवसांपासून या भागात धूर फवारणी बंद आहे.

डासांची उत्पत्ती ज्या ठिकाणी होते अशा ठिकाणी पालिकेच्या कीटक नाशक विभागाकडून धूर फवारणी केली जाते. कचरा कुंड्या, घरगल्ल्या, झोपडपट्टी, चाळी , बांधकामे , पाणी साचणारी ठकाणी या स्थळांवर प्रामुख्याने धूर फवारणी होते. याच ठिकाणी डासांची उप्तत्ती होण्याची शक्यता जास्त असते. पूर्वी अनेक विभागात धूर फवारणी करणारे कर्मचारी सातत्याने दिसत. मात्र अलीकडे त्यांचे फारसे अस्तित्व जाणवत नाही. काही भागातील नागरिक तर विभाग कार्यालयात तक्रार करून , अधिकाऱ्यांच्या मागे लागून धूर फवारणीचा आग्रह धरतात, तेव्हा त्या भागात फवारणी केली जाते, असाही अनुभव आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून अनेक भागात धूर फवारणी थंडावल्याच्या तक्रारी आहेत.

नागरिकांच्या प्रश्नांबाबत सातत्याने आवाज उठवणाऱ्या 'वॉचडॉग फाउंडेशन'ने धूर फवारणी बंद असल्याने अंधेरी पूर्व भागात वाढलेल्या साथीच्या आजारांकडे पालिकेचे लक्ष वेधले आहे. धूर फवारणी बंद असल्याने डेंग्यू , चिकनगुनिया, मलेरिया सारख्या आजारांमध्ये वाढ झाल्याचा दावा करण्यात आला आहे. १ जानेवारी २०२३ ते २२ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत मुंबईत डेंग्यूचे ४३८४ रुग्ण आढळले होते. यापैकी ३६७५ रुग्ण पावसाळ्यात आढळले होते.

अंधेरी पूर्व भागात धूर फवारणी करणारी १६ यंत्रे होती. त्यात पूर्वी डेल्टामेथ्रीन रसायन वापरले जात होते. मात्र अन्य पर्याय न देता या रसायनाचा वापर बंद केल्याने त्याचा परिणाम फवारणीवर झाला आणि डेंग्यूच्या रुग्णामध्ये वाढ झाली आहे. आधीच प्रदूषणामुळे लोक आजारी पडत आहेत. त्यातच साथीचे आजार वाढल्यास आणखी समस्या निर्माण होईल, त्यामुळे तातडीने धूर फवारणी करून साथीच्या आजारांना आळा घालावा अशी मागणी फाउंडेशनने केली आहे.

Web Title: Smoke spraying stopped, fear of increased risk of epidemics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई