Shocking Hackers theft 143 crores for the Mumbai branch of State Bank of Mauritius | धक्कादायक! हॅकर्सनं स्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या मुंबई शाखेला लावला 143 कोटींचा चुना
धक्कादायक! हॅकर्सनं स्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या मुंबई शाखेला लावला 143 कोटींचा चुना

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून सायबर क्राइमचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हॅकर्स हॅकिंगच्या माध्यमातून अनेकांना गंडा घातला आहे. मुंबईस्थित स्टेट बँक ऑफ मॉरिशसलाही अशाच प्रकारचा चुना लावण्यात आला आहे. काही अज्ञात हॅकर्सनी स्टेट बैंक ऑफ मॉरिशसच्या बँकेतील खाती हॅक करून जवळपास 143 कोटी रुपयांवर हात साफ केला आहे. हा प्रकार स्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या नरिमन पॉइंट इथल्या शाखेत घडला आहे.

बँकेच्या तक्रारीनुसार, हा प्रकार गेल्या आठवड्यातील आहे. बँकेनं मुंबईतल्या सायबर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. स्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या मते, काही अज्ञातांना बँकेचं सर्व्हर हॅक करून अनेक खात्यांतून पैसे लंपास केले आहेत. मुंबई पोलीस आणि सायबर क्राइमचे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच हा मालवेअर हल्ला तर नाही ना, याचाही पोलीस तपास करत आहे. 5 ऑक्टोबरला यासंबंधी तक्रार नोंदवण्यात आली आहे.

तक्रारीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, बँकेचा सर्व्हर हॅक करत वेगवेगळ्या खात्यांमध्ये शिरकाव करण्यात आला. यानंतर त्यांच्या खात्यातून अनेक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आले. ही सर्व बँक खाती देशाबाहेरची आहेत. सध्या पोलीस तपास करत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. दरम्यान बँकेने यासंबंधी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, एफआयआर दाखल करण्यात आला असून, सायबर एक्स्पर्टच्या सहाय्याने तपास केला जात आहे.
 
सध्याच्या घडीला हा सायबर हल्ला आहे की नाही हे सांगू शकत नाही. बँकेतील अंतर्गत तपास सुरू असून, आतमधील कोणी मदत केली आहे का या दृष्टीनेही तपास सुरू असल्याचे एका अधिका-याने सांगितले. बँकेला गंडा घालण्यात आल्याची गेल्या नऊ महिन्यातील ही तिसरी घटना आहे. चेन्नईतील सिटी युनिअन बँकेतून 34 कोटींची रक्कम गहाळ झाली होती. तसेच ऑगस्ट महिन्यात कॉसमॉस बँकेच्या पुणे मुख्यालयातील 94 कोटींची रक्कम लुटण्यात आली होती. गेल्या वर्षी डिसेंबर 2017मध्ये चेन्नईतील सिटी युनियन बँकेचा सर्व्हर हॅक करून चोरट्यांनी 33 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोकड लुटल्याची घटना घडली होती.

कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ल्यात सर्व्हर हॅक करून 94 कोटी रुपयांची रोकड लुटल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने विशेष तपास पथकाची स्थापना केली. पोलिसांनी औरंगाबाद, नांदेड, मुंबई परिसरातून सात आरोपींना अटक केली होती. सात आरोपींनी बनावट डेबिट कार्डच्या माध्यमातून विविध बँकांच्या एटीएम केंद्रातून रोकड काढून घेतली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराने त्यांना बनावट डेबिट कार्ड देऊन रोकड काढण्याच्या बदल्यात काही मोबदला दिल्याचा संशय होता. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेले शेख महंमद, फहीम खान, ऑगस्टीन वाझ उर्फ अँथोनी आणि नरेश महाराणा यांचा चेन्नईतील सिटी युनियन बँकेतील रोकड लूट प्रकरणात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले.


Web Title: Shocking Hackers theft 143 crores for the Mumbai branch of State Bank of Mauritius
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.