कोस्टल रोडवरील स्थगिती उठविण्यासाठी शिवसेनेची धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 05:53 AM2019-04-23T05:53:07+5:302019-04-23T05:53:23+5:30

मोठ्यात मोठा वकील शोधण्याची स्थायी समितीत मागणी

Shiv Sena's runway to raise the suspension on the coastal road | कोस्टल रोडवरील स्थगिती उठविण्यासाठी शिवसेनेची धावपळ

कोस्टल रोडवरील स्थगिती उठविण्यासाठी शिवसेनेची धावपळ

Next

मुंबई : महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे, आता प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू होण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारांची धावपळ सुरू आहे. स्थगिती उठून कोस्टला रोडच्या कामाला सुरुवात व्हावी, यासाठी मोठ्यात मोठा वकील नियुक्त करण्याची मागणी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत केली.

लोकसभा निवडणुकीपूर्वी या प्रकल्पाचे भूमिपूजन शिवसेनेने घाईघाईत आटोपले. मात्र, या प्रकल्पामुळे मच्छीमारांच्या उपजीविकेचे साधन नष्ट होणार आहे. त्यामुळे प्रकल्पाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. सुनावणीदरम्यान प्रकल्पाचे काम थांबविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात दिले. मात्र, महत्त्वाकांक्षी प्रकल्प बंद पडल्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

सतत स्थगिती आल्यास कामाचा खर्च वाढेल. त्यामुळे मोठा वकील करून न्यायालयाचा स्थगिती आदेश उठवावा, अशी मागणी राऊत यांनी स्थायीच्या बैठकीत केली. कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी २९ एप्रिलला मतदानानंतर विशेष बैठक घेऊन स्थायी समिती सदस्यांना माहिती द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे आसिफ झकारिया यांनी केली.

Web Title: Shiv Sena's runway to raise the suspension on the coastal road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.