मुंबई बुडाली म्हणणारे वाचाळवीर आता कुठे आहेत?; नागपूर तुंबल्यानंतर शिवसेनेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 08:24 AM2018-07-07T08:24:52+5:302018-07-07T08:26:41+5:30

पावसानं नागपूरची दैना उडाल्यानंतर शिवसेनेकडून भाजपाचा समाचार

shiv sena slams bjp and cm devendra fadnavis over flood situation in nagpur after heavy rainfall | मुंबई बुडाली म्हणणारे वाचाळवीर आता कुठे आहेत?; नागपूर तुंबल्यानंतर शिवसेनेचा सवाल

मुंबई बुडाली म्हणणारे वाचाळवीर आता कुठे आहेत?; नागपूर तुंबल्यानंतर शिवसेनेचा सवाल

googlenewsNext

मुंबई: मुसळधार पावसामुळे नागपूरची दैना उडाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला. एरवी पावसामुळे मुंबईच्या केवळ सखल भागात वीतभर पाणी साचले तरी ‘मुंबई बुडाली होSS’ असा बेंबीच्या देठापासून कंठशोष करणारे वाचाळवीर आता कुठे आहेत?, असा सवाल शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला आहे. मुंबई महापालिका आणि शिवसेनेविरुद्ध कोणाला कितीही ठणाणा करू देत, पण काही तासांच्या पावसात नागपूर का बुडाले? कोणामुळे बुडाले? विधिमंडळाचे अधिवेशन स्थगित करण्याइतकी नाचक्की का ओढवली?, असे अनेक प्रश्न शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून उपस्थित करण्यात आले आहेत.

काल नागपूरमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं. सतत सुरू असलेल्या पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीचे तीन-तेरा वाजले. वीजपुरवठा खंडित झाल्यानं विधीमंडळाचं कामकाजदेखील होऊ शकलं नाही. यावरुन शिवसेनेनं भाजपावर जोरदार हल्ला चढवला. 'नागपुरात सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने राज्याचं संपूर्ण सरकारच नागपुरात आले आहे. तथापि, विधान भवनातच पाणी शिरल्यानं विधिमंडळाचं अधिवेशनच दिवसभरासाठी स्थगित करण्याची भयंकर नामुष्की सरकारवर ओढवली. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्मभूमी असलेलं नागपूर काही तासांच्या पावसानं जलमय झालं. आमदार निवास, मंत्र्यांचे बंगले, वीज उपकेंद्रे सारं काही पाण्यात आहे. अधिवेशनासाठी आलेले अधिकारी, कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचेही अतोनात हाल झाले. आपल्या डोळ्यासमोर शहरात पाणी भरतं आहे, रस्त्यांचं रूपांतर नद्यांमध्ये होत आहे, हे पाहून मुख्यमंत्रीही नक्कीच व्यथित झाले असणार. ‘विकास पुरुष’ अशी ओळख असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं हे शहर. आपल्या लाडक्या शहराची आज जी अवस्था झाली ती बघून धडाकेबाज गडकरींनाही निःसंशय वेदना झाल्या असणारच,' अशा शब्दांमध्ये 'सामना'मधून देवेंद्र फडणवीस आणि गडकरी यांना टोला लगावण्यात आला आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या 'स्मार्ट' नागपुरमधील अतिक्रमणाचा प्रश्नदेखील 'सामना'मधून उपस्थित करण्यात आला आहे. 'मुंबई शहरातून जशी मिठी नदी धावते तशीच नागपुरातून नाग नदी वाहते. शुक्रवारच्या पावसात ही नदी दुथडी भरून वाहू लागली. नाग नदीतील अतिक्रमणांमुळे पुराच्या पाण्याने पात्र सोडलं आणि हे पाणी शहरभर पसरलं. शिवाय, शहरातील सगळ्या गटारी चोकअप! तुंबलेल्या गटारांनी नागपूरची परिस्थिती आणखी बिकट केली. अनेक ठिकाणी तर गटारांचं पाणी नागरिकांच्या घरातील टॉयलेटमधून बाहेर पडू लागलं. आज राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस काही काळ नागपूरचे महापौर होते. त्या शहराचा एका पावसात असा बोजवारा उडालेला पाहून मुख्यमंत्री हळहळले असतील. पुन्हा महिन्यापूर्वीच नागपूर शहराला देशातील ‘स्मार्ट’ शहरांच्या यादीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. अशा ‘स्मार्ट’ शहराचं एका पावसात असं विद्रूपीकरण का झालं आणि त्याला जबाबदार कोण, यावर ‘चिंतन’ मात्र जरूर व्हायला हवं,' असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे. 

नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहराची एकाच पावसात दैना उडाली, याचा विशेष समाचार अग्रलेखातून घेण्यात आला आहे. 'नागपूर शहर हे भौगोलिकदृष्ट्या देशाचा केंद्रबिंदू तर आहेच, पण केंद्रीय सरकारचा राजकीय केंद्रबिंदूही नागपुरातच आहे. भारतीय जनता पक्षाची जननी असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय याच ठिकाणी आहे. केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. महाराष्ट्रातही भाजपचीच सत्ता आहे. शिवाय नागपूर महापालिकेतही भारतीय जनता पक्षाचेच कारभारी सत्तेच्या खुर्च्यांवर विराजमान आहेत. असं असतानाही पावसाच्या पाण्यामुळे देशातील हे ‘हाय प्रोफाईल’ शहर ठप्प झालं. तेथील जनजीवन कोलमडलं,' अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं नागपूरमधील स्थितीवरुन भाजपावर शरसंधान साधलं आहे.
 

Web Title: shiv sena slams bjp and cm devendra fadnavis over flood situation in nagpur after heavy rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.