मुंबईत युतीचा पुन्हा षट्कार, विरोधाचे शिवधनुष्य पेलत फुलवले विजयाचे कमळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 05:31 AM2019-05-24T05:31:22+5:302019-05-24T05:31:55+5:30

विरोधाचे शिवधनुष्य पेलत या मतदारसंघातील सहाही जागा जिंकत विजयाचे कमळ फुलवण्यात युतीला यश मिळाले.

Shiv sena-BJP win in Mumbai | मुंबईत युतीचा पुन्हा षट्कार, विरोधाचे शिवधनुष्य पेलत फुलवले विजयाचे कमळ

मुंबईत युतीचा पुन्हा षट्कार, विरोधाचे शिवधनुष्य पेलत फुलवले विजयाचे कमळ

Next

मुंबईवर युतीची पकड मजबूत आहे. यंदा मात्र विरोधकांचा जोरदार सुरू असलेला प्रचार आणि या प्रचारात मनसेने घेतलेली उडी यामुळे मुंबईत युतीला गड राखता येईल का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, विरोधाचे शिवधनुष्य पेलत या मतदारसंघातील सहाही जागा जिंकत विजयाचे कमळ फुलवण्यात युतीला यश मिळाले.

दक्षिण मुंबईत सेनेचे अरविंद सावंत विजयी 
मुंबई : बहुसंख्य अमराठी मतदार, देशातील मोठ्या उद्योगपतींचा काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा, जैन समाजात नाराजी या घडामोडींमुळे दक्षिण मुंबईतील युतीची जागा धोक्यात असल्याचे चित्र होते. ती खेचून आणण्यासाठी काँग्रेसने येथून उमेदवारी दिलेल्या मिलिंद देवरा यांना मुंबई अध्यक्षपदही दिले. परंतु प्रतिष्ठेच्या या लढतीत काँग्रेस पहिल्या फेरीपासूनच पिछाडीवर राहिला तो शेवटपर्यंत. गत निवडणुकीच्या तुलनेत मतांचा फरक कमी होऊनही शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत एक लाख ६७ मतांच्या फरकाने दुसऱ्यांदा निवडून आले.
पहिल्या फेरीपासूनच शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत १५ हजार मतांनी पुढे होते. दरम्यान, काही फेऱ्यांमध्ये देवरा, सावंत यांना मिळालेल्या मतांमध्ये केवळ चार-पाच हजारांचाच फरक दिसून आला. परंतु अखेरच्या टप्प्यात सावंत यांनी बाजी मारत दुस-यांदा विजय मिळवला.

शेवाळे दुस-यांदा विजयी
दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे यांनी सलग दुसºया विजयाची नोंद केली आहे. काँग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाड यांचा त्यांनी तब्बल दीड लाख मतांनी पराभव केला. याच मतदारसंघात शिवसेना भवनाची वास्तू असल्याने सलग दुस-यांदा शेवाळे शिवसेना भवनाचे खासदार असतील. शेवाळे तब्बल १ लाख ५२ हजार १३९ च्या मताधिक्याने विजयी झाले.
शिवडी येथील मतमोजणी केंद्रात सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली. पहिल्या २१ फेºयांमध्ये शेवाळे यांनी गायकवाड यांच्या विरोधात आघाडी कायम ठेवली होती. केवळ २२ व्या फेरीतच गायकवाड यांनी शेवाळेंना मागे टाकले. मात्र, अखेर शेवाळेंनी गायकवाड यांना मागे टाकत बाजी मारली.

शेट्टींच्या विजयाची घोडदौड कायम
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी बहुमतांनी विजयी झाले. काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांचा त्यांनी दणदणीत पराभव केला असून, या यशाचे श्रेय त्यांनी मतदारांनाच दिले आहे.

काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांना बॉलीवूडचे वलय असल्याने हे वलय मतदारांचा कौल आपल्याकडे वळवण्यात यशस्वी ठरणार की गेल्या लोकसभा निवडणुकीत चार लाखांच्या मताधिक्याने विजयी झालेले भाजपचे गोपाळ शेट्टी विजयी घोडदौड कायम ठेवणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. गुरुवारी मतमोजणीस सुरुवात झाली आणि पहिल्याच फेरीत शेट्टी यांनी आघाडी घेतली. या फेरीत शेट्टी यांना ३५ हजार ११० तर ऊर्मिला यांना १२ हजार २०२ मते मिळाली. पहिल्या फेरीत घेतलेली ही आघाडी शेट्टी यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली. शेट्टी यांना ७ लाख ६ हजार ६७८ मते मिळाली तर मातोंडकर यांना केवळ २ लाख ४१ हजार ४३१ मते मिळाली. अखेर ४ लाख ६५ हजार २४७ इतक्या प्रचंड मताधिक्याने विजयी होत त्यांनी भाजपचा हा गड कायम राखला.

कोटक यांनी बंद केली ‘टिकटिक’
उत्तर पूर्व मुंबईत वाढलेल्या मतदानाच्या टक्क्याचा कौल भाजपचे मनोज कोटक यांच्या पारड्यात पडला आणि राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्यावर त्यांनी सव्वादोन लाख मताधिक्याने विजय मिळवला. वंचित बहुजन आघाडीच्या निहारिका खोंदले यांना ६८ हजार मते मिळाली.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच कोटक यांनी ६ हजार मतांनी आघाडी घेतली. टप्प्याटप्प्याने ही आघाडी कायम राहिली. कोटक यांनी ५ लाख १४ हजार ५९९ मते मिळवत पाटील यांचा पराभव केला. पाटील यांना २ लाख ८८ हजार ११३ मतांवर समाधान मानावे लागले. मुलुंड, घाटकोपर पश्चिम परिसरातील गुजराती मतदारांबरोबरच भांडुप, विक्रोळीतूनही कोटक यांना आघाडी मिळाल्याने शिवसैनिकांचा पाठिंबाही त्यांना मिळाल्याचे दिसून आले. पाटील यांचा मराठी-अमराठी प्रचार त्यांच्यावरच उलटल्याचे दिसले. या मतदारसंघात आतापर्यंत सलग एकाच पक्षाचा खासदार झालेला नाही. हेदेखील येथे नवा चेहरा असलेल्या कोटक यांच्या यशासाठी कारणीभूत ठरल्याची शक्यता नाकारता येत नाही.

निरुपमविरोधात कीर्तिकर विजयी
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून सलग दुस-यांदा महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर २ लाख ५९ हजार ५१५ एवढ्या मताधिक्याच्या फरकाने विजयी झाले. येथे शिवसेनेचे गजानन कीर्तिकर विरुद्ध काँग्रेसचे संजय निरुपम यांच्यात प्रमुख लढत झाली.
पहिल्या फेरीतच कीर्तिकर यांनी आघाडी घेतली होती. त्यांनी प्रत्येक फेरीत ही आघाडी कायम ठेवली. मराठी मतदारांसोबतच उत्तर भारतीय, गुजराथी, मारवाडी, निरुपम यांच्यावर नाराज असलेल्या अल्पसंख्याक मतदारांनीही कीर्तिकर यांच्या बाजूने कौल दिला. याउलट काँग्रेस व राष्ट्रवादीचे उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचारात कामत, कृपाशंकर गट अलिप्त राहिले. उत्तर भारतीय व अल्पसंख्याक मतदारांनी निरुपम यांना साथ दिली नाही.

पूनम महाजन जिंकल्या
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सलग दुस-यांदा आपल्याकडे राखण्यात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांना यश आले आहे. काँग्रेसच्या उमेदवार माजी खासदार प्रिया दत्त यांचा त्यांनी पराभव केला.
महाजन यांनी मतमोजणीत पहिल्या फेरीतच आघाडी घेतली होती. काही फे-यांमध्ये सलग आघाडीवर असलेल्या महाजन यांच्यावर १२, १३ व १४ व्या फेरीत मात्र दत्त यांनी मात केली. त्यानंतर १५ व्या फेरीमध्ये महाजन यांनी पुन्हा दत्त यांच्यावर आघाडी घेतली. अखेर महाजन यांनी दत्त यांचा १ लाख ३० हजार ५ एवढ्या मतांच्या फरकाने पराभव केला. २०१४ च्या तुलनेत यंदा महाजन यांच्या मतात सुमारे ५ हजारांची वाढ झाली असून दत्त यांच्या मतांत तब्बल ६२ हजारांची वाढ झाली.

Web Title: Shiv sena-BJP win in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.