आठवले धक्काबुक्की प्रकरणाचे ठाणे जिल्ह्यात तीव्र पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 04:55 AM2018-12-10T04:55:14+5:302018-12-10T04:55:43+5:30

कसाऱ्यात रेल्वे रोको : अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाडमध्ये बंद, ठाण्यात रास्ता रोको

A severe storm in the Thawe district of Athavale | आठवले धक्काबुक्की प्रकरणाचे ठाणे जिल्ह्यात तीव्र पडसाद

आठवले धक्काबुक्की प्रकरणाचे ठाणे जिल्ह्यात तीव्र पडसाद

Next

ठाणे / मुंबई : अंबरनाथ येथील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना प्रवीण गोसावी या तरुणाने केलेल्या धक्काबुकीचे रविवारी ठाणे जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले. या घटनेच्या निषेधार्थ रिपाइंच्या आठवले गटाने अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड आणि कसाºयात बंद पाळला. ठाण्यात या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई-नाशिक महामार्गावर रास्ता रोको केला. दरम्यान, आरोपी प्रवीण गोसावी याच्यावर पोलिसांच्या देखरेखीखाली मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अंबरनाथ येथे रिपाइंच्या वतीने आयोजित केलेल्या संविधान दिनाच्या कार्यक्रमानंतर स्टेजवरून उतरल्यावर रामदास आठवले यांना रिपाइंचा बंडखोर कार्यकर्ता प्रवीण गोसावी याने धक्काबुकी केली. गोसावी हा पूर्वी रिपाइंचाच कार्यकर्ता होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून तो आठवलेंच्या विरोधात सोशल मीडियावर लिखाण करीत होता. आठवले यांच्याविषयी असलेला राग गोसावी याने कार्यक्रमाच्या दिवशी व्यक्त केला. यानंतर गोसावी याला कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली. या वेळी पोलिसांनी गोसावीला ताब्यात
घेतले. घटनास्थळी तैनात असलेल्या एका पोलीस कर्मचाºयाच्या तक्रारीवरून या प्रकरणी गोसावीविरुद्ध भादंविचे कलम ३५३ (शासकीय कामात अडथळा निर्माण करणे) आणि कलम ३३२ (लोकसेवकास त्याचे कर्तव्य बजावण्यात अडथळा निर्माण करण्यासाठी दुखापत करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याला मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या घटनेच्या निषेधार्थ रिपाइंने अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड आणि कसाºयात बंद पाळला. अंबरनाथमध्ये बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. येथील स्टेशन परिसरातील सर्व दुकाने आणि रिक्षा बंद ठेवण्यात आल्या होत्या. उल्हासनगर, मुरबाड आणि कसाºयात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. कसारा येथून मुंबईला जाणारी लोकल दुपारी ४ वाजताच्या सुमारास कार्यकर्त्यांनी काही वेळ अडवली होती.
ठाण्यात मुंबई-नाशिक महामार्गावरील आनंदनगर चेकनाक्याजवळ दुपारच्या सुमारास कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आंदोलकांची समजूत काढली. या वेळी २६ आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शिष्टमंडळ घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना अंबरनाथ येथे झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाची चौकशी करावी आणि सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी ठेवल्याबद्दल पोलिसांवर कारवाईच्या मागणीसाठी पक्षाचे शिष्टमंडळ सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.
रामदास आठवले यांना झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे, तरीही त्यांच्या दौºयामध्ये सुरक्षेची पुरेशी कुमक असतेच असे नाही. ज्या ठिकाणी दौरा असतो, तिथे सुरक्षा व्यवस्था पाहण्याची जबाबदारी स्थानिक पोलिसांवर असते. मात्र, अंबरनाथ दौºयाच्या वेळी स्थानिक पोलिसांनी सुरक्षेत अक्षम्य दुर्लक्ष आणि त्रुटी ठेवल्या. पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरविली नसल्याची बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिल्याचे आरपीआयचे प्रवक्ते अविनाश महातेकर यांनी सांगितले.
या प्रकरणातील हल्लेखोराची कसून चौकशी करावी, त्याच्या पाठीशी कोण आहे, याचा तपास पोलिसांनी करावा, तसेच आठवलेंना पुरेशी सुरक्षा पुरविण्यासाठी त्यांच्या सुरक्षेत वाढ करावी आदी मागण्यांसाठी आरपीआयचे शिष्टमंडळ सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही महातेकर यांनी सांगितले.

गोसावी याच्या घराला सुरक्षा : आरोपी प्रवीण गोसावी हा अंबरनाथ येथील महालक्ष्मीनगर भागात कुटुंबासह वास्तव्यास आहे. खबरदारी म्हणून पोलिसांनी त्याच्या घराला सुरक्षा दिली आहे. या प्रकारामुळे त्याचे कुटुंबीय तणावात असून, पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ठाण्यात बोलाविले होते.

काही लोकांना माझी प्रगती पाहवत नाही - रामदास आठवले
विविध पक्षांतील नेते माझे चांगले मित्र आहेत. मला झालेल्या धक्काबुक्कीमागे कोणते षड्यंत्र असेल, असे मला वाटत नाही. पण माझी प्रगती काही लोकांना पाहवत नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अंबरनाथ येथील घटनेसंदर्भात दिली. आठवले यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी संतप्त प्रतिक्रया व्यक्त केली.
आठवले यांनी सर्व कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहनही केले. या धक्काबुक्कीबाबत आठवले म्हणाले की, माझ्यावर हल्ला करणाºया प्रवीण गोसावीमागे कुणाचे हात आहेत? त्याने माझ्यावर हल्ला नेमका का केला? या सर्वाची सखोल चौकशी व्हायला हवी. दरम्यान, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे यांनी रविवारी आठवले यांची वांद्रे येथील निवासस्थानी जाऊन भेट घेत विचारपूस केली.
प्रवीण गोसावी काही काळ आठवले यांच्या आरपीआयमध्ये होता. अंबरनाथ शहरात माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून वावरणारा गोसावी सुरुवातीला मनसेत होता. रिक्षाचालक, मनसे वाहतूक सेनेचा पदाधिकारी असणाºया गोसावीने पुढ मनसेला रामराम ठोकला. त्यानंतर फेसबुकवर राज ठाकरे यांच्याविरोधात लिखाण केले. सध्या प्रकाश आंबेडकर यांच्या भारिपमध्ये तो सक्रिय असल्याचे समजते.

Web Title: A severe storm in the Thawe district of Athavale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.