सागरमाला प्रकल्पाच्या अंतर्गत ससून डॉकचा होणार कायापालट - संजय भाटीया 

By अोंकार करंबेळकर | Published: November 18, 2017 08:41 AM2017-11-18T08:41:02+5:302017-11-18T08:43:09+5:30

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सागरमाला प्रकल्पाच्या अंतर्गत ससून डॉकचा विकास आणि कायापालट होणार असल्याची माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटीया यांनी लोकमतशी बोलताना दिली

Sasoon Dock will be renovated under Sagarmala project | सागरमाला प्रकल्पाच्या अंतर्गत ससून डॉकचा होणार कायापालट - संजय भाटीया 

सागरमाला प्रकल्पाच्या अंतर्गत ससून डॉकचा होणार कायापालट - संजय भाटीया 

Next
ठळक मुद्देसागरमाला प्रकल्पाच्या अंतर्गत ससून डॉकचा विकास आणि कायापालट होणार मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटीया यांची माहिती

मुंबई - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सागरमाला प्रकल्पाच्या अंतर्गत ससून डॉकचा विकास आणि कायापालट होणार असल्याची माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटीया यांनी लोकमतशी बोलताना दिली. ससून डॉकमध्ये सध्या सुरु असलेल्या स्ट्रीट आर्ट प्रदर्शनाच्या निमित्ताने भाटिया यांनी ससून धक्क्याच्या विकासाचा आराखडा सांगितला.

सागरमाला प्रकल्पामध्ये बंदरांचा विकास त्यांचे आधुनिकीकरण, बंदरांचा इतर मार्गांशी सुयोग्य संपर्क वाढवणे, कोस्टल इकॉनॉमिक झोन तयार करणे तसेच मासेमारी केंद्रांचा विकास करणे यांचा समावेश होतो. त्यानुसारच ससून डॉकचा विकास करण्याचा आराखडा बनविण्यात आल्याचे भाटिया म्हणाले. 

या आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात ससून डॉकची स्वच्छता, वाहतूक नियोजन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यांची तरतूद होणार आहे. त्यानंतर ५२ कोटी रुपयांची तरतूद करुन नवा ससून डॉक येथे स्वच्छता, आधुनिक उपकरणे तसेच मत्स्य लिलावासाठी स्वच्छ जागा, बर्फ ठेवण्याची जागा, पिण्याचे पाणी तसेच इतर सोयी देण्यात येणार आहेत. तसेच कोळी लोकांच्या पाककृती सर्वांना समजाव्यात यासाठी कोळी महोत्सव, अॅग्रो टुरिझमच्या धर्तीवर मत्स्य पर्यटन असे प्रकल्प राबवण्यात येतील. १३ दशकांहून अधिक काळ मुंबईत मासेमारी, मत्स्य लिलाव, विक्रीचे असणारे केंद्र वेगाने विकसीत होऊन पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाईल असेही भाटिया यांनी यावेळेस सांगितले.

येथे असलेल्या मोकळ्या आणि पोर्ट ट्रस्टच्या ताब्यात असलेल्या जागांमध्ये पर्यटकांना माहिती देण्याची सोय, धक्क्याचा इतिहास समजावून देणारे केंद्र, दृकश्राव्य माध्यमातून माहिती देणारा टुरिझम प्लाझा उभा  करण्यात येईल. डॉकच्या अंतर्गत प्रश्नांचे निराकरण पोर्ट ट्र्स्ट मार्फत करण्यात येते. त्यात रस्ते , दिवाबत्ती, वाहतूक, पाणी, स्वच्छता, बांधकाम अशा विविध विषयांचा समावेश होतो त्यांचे काम सुटसुटीत व्हावे आणि त्यात सूत्रबद्धता यावी यासाठी अधिकार्याची नेमणूक केल्याचीही माहिती भाटीया यांनी दिली.

स्ट्रीट आर्ट एक्झिबिशन
पोर्ट ट्रस्ट कायापालट प्रकल्पामध्ये पहिला प्रकल्प स्ट्रीट आर्ट एक्झिबिशन हा हाती घेण्यात आला आहे. जगभरातील विविध देशांमधील कलाकार सहभागी झाले आहेत. जर्मनी, ऑस्ट्रेलिया, आँस्ट्रिया अशा देशातील कलाकारांनी मुंबईचे जीवन, मासेमारी, कोळी लोक यांच्या जीवनावर या प्रदर्शनातून प्रकाश टाकला आहे. 

ससून डॉकबद्दल तुम्हाला माहिती आहे का ?
ससून धक्का असो वा भाऊचा धक्का आपल्या डोळ्यांसमोर येतो तो समुद्र आणि माशांचा वास. पण ससून डॉक हा मुंबईच्या स्थानिक इतिहासातील अत्यंत महत्त्व आहे. ससून हे बगदादी ज्यू कुटुंब मुंबई, पुणे आणि कलकत्ता येथील लोकांना माहिती नसेल तर नवलच. व्यापाराच्या निमित्ताने ससून कुटुंबाचा चीनशीही संपर्क होता. कापसाच्या व्यापारासाठी हा धक्का अल्बर्ट ससून यांनी १८७५ साली बांधला. अल्बर्ट हे डेव्हिड ससून यांचे पुत्र होते. डेव्हीड ससून ग्रंथालय, मागन डेव्हिड सिनेगाँग, ससून हायस्कूल, 

नेसेट इलियाहू सिनेगाँग अशा विविध ऐतिहासिक इमारतींशी हे कुटुंब संबंधित आहे.

Web Title: Sasoon Dock will be renovated under Sagarmala project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.