साहित्य संघ मंदिर आयसीयूमध्ये? साहित्य, सांस्कृतिक चळवळीच्या केंद्राकडे प्रेक्षकांची पाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 10:06 AM2023-12-15T10:06:59+5:302023-12-15T10:08:44+5:30
मराठी साहित्य आणि नाट्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे साहित्य संघ मंदिर उपेक्षा आणि अनास्थेच्या चक्रात सापडले.
स्नेहा माेरे, मुंबई : मराठी साहित्य आणि नाट्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे साहित्य संघ मंदिर उपेक्षा आणि अनास्थेच्या चक्रात सापडले असून, अशीच स्थिती राहिल्यास या वास्तूला अखेरची घरघर लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दक्षिण मुंबईत मराठी संस्कृती अभिमानाने मिरवणाऱ्या गिरगावाचेच नव्हे तर संपूर्ण मुंबईचे आणि मराठी साहित्य संघाचे ऋणानुबंध वर्षानुवर्षाचे आहेत. मात्र आता गिरगावातील मराठी माणूस जसा लोप पावत गेला तसा गिरगावातील साहित्य-सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्राचे केंद्रस्थान असलेल्या मुंबई मराठी साहित्य संघाचेही वलय कमी झाले आहे. यापूर्वी, मराठी नाट्यसृष्टीतील अनेक नाटकांसाठी सुवर्णकाळ ठरलेल्या या संस्थेकडे आता मात्र व्यावसायिक नाट्यक्षेत्राने पाठ फिरवली आहे.
ही संस्था गेली ८८ वर्षे या ठिकाणी साहित्य, नाट्य अन् संस्कृतीची अभिरुची जपत आणि वाढवत आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीपूर्वी मुंबई मराठी साहित्य संघात महिन्याला ९० शोंचे सादरीकरण व्हायचे, आता मात्र हे प्रमाण ४०-४५ शोवर आले आहे. कोरोना महामारीपूर्वी संघाची स्थिती चांगली होती, मात्र आता ही स्थिती संपूर्णतः ढासळली असल्याचे येथील व्यवस्थापक रोहिदास पांगे सांगतात. कोरोनानंतर व्यावसायिक नाटकाचे केवळ दोन प्रयोग संघातील नाट्यगृहात पार पडले, परंतु त्यानंतर व्यावसायिक नाटकांचे अर्थकारण जुळून येत नसल्याने ओघ थांबला आहे.
याबाबत, नाटकाच्या आयोजकांना विचारणा केली असता दक्षिण मुंबईत आता मराठी माणूस शिल्लक राहिला नाही, त्यामुळे नाटक आयोजित केल्यास खर्चही निघत नसल्याची तक्रार त्यांनी व्यक्त केल्याचे पांगे यांनी सांगितले.
त्यांची इच्छा होती...
डॉ. अ.ना. भालेराव यांच्या स्मृतींना उजाळा देताना व्यवस्थापक रोहिदास पांगे यांनी सांगितले, भालेराव कायम सांगायचे संघाचा खर्च भागला तरी पुरे ; पण लोकांचा प्रवाह राहिला पाहिजे. मराठी-अमराठी प्रेक्षक, भाषिकांपर्यंत मराठी नाट्य, संस्कृती पोहोचली पाहिजे. पण आता याउलट स्थिती निर्माण झाली आहे, पूर्वीच्या काळी नाटक गाजविलेला हा संघ प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत आहे.
गिरगावातील मराठी लोकांची संख्या कमी झाल्याचा प्रेक्षक संख्येवर परिणाम झाला. सध्या गिरगावातल्या मेट्रोच्या कामामुळे गल्ल्या अरुंद झाल्या, पार्किंगचा प्रश्न होतो. नाटकाच्या आयोजनाला प्रतिसाद नाही. साहित्य आणि नाट्य अशा दोन्ही शाखांकडून स्वतंत्र उपक्रम राबविले जातात. नाट्य शाखेला शासनाकडून अनुदान नाही. केवळ साहित्य शाखेला अनुदान दिले जाते - उषा तांबे, कार्याध्यक्ष, मुंबई मराठी साहित्य संघ
अन्य नाट्यगृहांच्या तुलनेत संघाचे भाडे शुल्क अत्यंत कमी आहे. तरीही प्रेक्षकच नसल्याने व्यावसायिक नाट्यक्षेत्राने पाठ फिरवली आहे. सध्या केवळ व्याख्यान, सराव शिबिर, कार्यशाळा, नृत्य शिबिर, हौशी कलाकारांचे नाटक, नाट्य शाखेचे नाटक असे उपक्रम हाेतात.
कोरोनापूर्वीची संघाची स्थिती आणि आताची स्थिती पाहिली असता मुंबई मराठी साहित्य संघाच्या अर्थकारणात ३० ते ४० टक्क्यांनी फरक पडला आहे - रोहिदास पांगे, व्यवस्थापक, मुंबई मराठी साहित्य संघ