सचिन सावंत हत्याप्रकरण उलगडले, एसआरए वादातूनच हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 06:03 IST2018-05-09T06:03:32+5:302018-05-09T06:03:32+5:30
शिवसेना शाखाप्रमुख सचिन सावंत (५०) यांची हत्या एसआरएतील वादातूनच झाल्याचे उघड झाले आहे. कुरार पोलिसांनी या प्रकरणी शिताफीने तपास करत मुंबई आणि उत्तर प्रदेशातून सात जणांना अटक केली.

सचिन सावंत हत्याप्रकरण उलगडले, एसआरए वादातूनच हत्या
मुंबई : शिवसेना शाखाप्रमुख सचिन सावंत (५०) यांची हत्या एसआरएतील वादातूनच झाल्याचे उघड झाले आहे. कुरार पोलिसांनी या प्रकरणी शिताफीने तपास करत मुंबई आणि उत्तर प्रदेशातून सात जणांना अटक केली. मारेकऱ्यांना दहा लाखांची सुपारी दिली होती. काही आरोपी फरार असून पोलीस तपास सुरू आहे.
लोकेंद्र सिंह (२५), अभय उर्फ बारक्या किसन साळुंके पाटील (२६), सत्येंद्र उर्फ सोनू रामजी पाल (२४), नीलेश शर्मा (२७), ब्रिजेश उर्फ ब्रीजा नथुराम पटेल (३६), ब्रिजेश सिंह (२८) आणि अमित सिंह (२५) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तांत्रिक तपास करत अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश प्रधान, परिमंडळ १२चे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड, सहायक पोलीस आयुक्त सुभाष वेळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदय राजेशिर्के यांच्या नेतृत्वात, पोलीस निरीक्षक सोनावणे, सहायक पोलीस निरीक्षक घार्गे, महानवर आणि पथकाने मुंबई आणि उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून या सात जणांना ताब्यात घेतले. यातील अभय आणि लोकेश यांनी सावंत यांच्यावर गोळीबार केला होता. त्यांच्याकडून पोलिसांनी हल्ल्यात वापरलेली शस्त्रे आणि सात मोबाइल हस्तगत केले. तर सहानी नामक फरार संशयित आरोपीचा शोध सुरू आहे.
सावंत यांच्यावर दोघांनी गोळीबार करीत त्यांची हत्या केल्याची घटना २२ एप्रिल रोजी घडली होती. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांवर शिवसेनेच्या बड्या नेत्यांकडून प्रचंड दबाव आणला जात होता. कुरार पोलीस आणि क्राइम ब्रांच या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी प्रयत्न करत होते. या प्रयत्नांना अखेर यश आले.
नेमका वाद काय?
कांदिवलीच्या गोकुळनगरमध्ये असलेल्या प्रभात वेल्फेअर सोसायटीतील काही सभासद आणि ब्रिजेश पटेल हे एकत्र आले. त्यांनी सावंत यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या दुर्गानगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कारभाराला विरोध सुरू केला. तसेच पटेलने वर्षभरापूर्वी विकासकाला सांगून स्वत:चे एक वेगळे आॅफिस सुरू केले. तर सावंत यांच्यासोबत काम करणारा नीलेश शर्मा याला ते अपमानास्पद वागणूक देत होते. तसेच एसआरए मोजणीतून त्यांच्यात वाद झाला आणि तो सावंतपासून वेगळा झाला.
विरारमध्ये घराचे आमिष
पटेल आणि शर्मा यांनी सावंत यांचा काटा काढण्याचे ठरविले. त्याच्यासाठी मालाड पूर्वच्या आप्पापाडा परिसरात ते अन्य मारेकºयांना भेटले आणि तीन लाख रुपयांची रक्कम ब्रिजेश सिंगमार्फत त्यांना देण्यात आली. काम झाल्यावर या चौघांना विरारमध्ये घर, एसआरएमध्ये वाटा देण्याचे आश्वासनही दिल्याचे तपासात उघड झाले.