‘रोमँटिक रिअ‍ॅलिस्ट’ रावबहादूर महादेव विश्वनाथ धुरंधर यांचे चित्रप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 03:10 AM2018-10-07T03:10:51+5:302018-10-07T03:11:08+5:30

महादेव धुरंधर यांचा जन्म मुंबईचा. शालेय शिक्षण मात्र कोल्हापुरात झाले. लहानपणापासून चित्रकलेची आवड. धुरंधरांचे चित्रकलेतील पहिले प्रेरणास्थान आबालाल रहिमान.

'Romantic realisticr' Rahebahadur Mahadev Vishwanath Dhurandhar's Illustration | ‘रोमँटिक रिअ‍ॅलिस्ट’ रावबहादूर महादेव विश्वनाथ धुरंधर यांचे चित्रप्रदर्शन

‘रोमँटिक रिअ‍ॅलिस्ट’ रावबहादूर महादेव विश्वनाथ धुरंधर यांचे चित्रप्रदर्शन

Next

- माधव इमारते

महादेव धुरंधर यांचा जन्म मुंबईचा. शालेय शिक्षण मात्र कोल्हापुरात झाले. लहानपणापासून चित्रकलेची आवड. धुरंधरांचे चित्रकलेतील पहिले प्रेरणास्थान आबालाल रहिमान. मॅट्रिकच्या परीक्षेसाठी मुंबईत आले असताना त्यांना जे.जे. स्कूल आॅफ आर्ट पाहण्याची संधी लाभली. तेथे भव्य पुतळे पाहून ते भारावून गेले व त्यांनी कलाशिक्षण घ्यायचा निर्धार केला.
सुप्रसिद्ध चित्रकार राजा रविवर्मानंतरचे लोकप्रिय व विपुल चित्रनिर्मिती करणारे म्हणून ओळखले जाणारे बॉम्बे स्कूल परंपरेतील अत्यंत महत्त्वाचे चित्रकार रावबहादूर महादेव विश्वनाथ धुरंधर यांच्या चित्रकृतींचे प्रदर्शन मुंबई येथील राष्ट्रीय आधुनिक कलादालनात (नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्ट, एनजीएमए) सुरू आहे. जवळजवळ अडीचशेच्या वर चित्रकृती प्रस्तुत प्रदर्शनात मांडल्या आहेत. म.वि. धुरंधर (१८६७-१९४४) यांच्या दीडशेव्या जयंतीचे निमित्त साधून एनजीएमए (मुंबई व दिल्ली) आणि दिल्ली आर्ट गॅलरी (डॅग) यांच्या संयुक्त सहकाराने हे प्रदर्शन साकार झाले आहे. प्रसिद्ध चित्रकार व महाराष्ट्रातील दृश्यकलेचे सखोल अभ्यासक सुहास बहुलकर यांच्या संकल्पनेतून व अविरत प्रयत्नातून तसेच एन.जी.एम.ए.च्या संचालकांच्या पूर्ण पाठिंब्यामुळे व एनजीएमएच्या कार्यकारी संघाच्या सहकार्याने हे प्रदर्शन उभे राहू शकले. या प्रदर्शनाची मांडणी दिल्ली आर्ट गॅलरीने केली आहे. दिल्ली आर्ट गॅलरीच्या संग्रहाखेरीज मुंबईतील जे. जे. स्कूल आॅफ आर्ट, सांगली, सातारा, कोल्हापूर, नागपूर, औंध संग्रहातील व काही खासगी संग्राहकाकडील कलाकृतींचादेखील प्रदर्शनात समावेश आहे. धुरंधरांची निर्मितीतील वैविध्यपूर्तता एकात्मतेने येथे पाहायला मिळते व त्यांच्या कलाकारकिर्दीचा एक विशाल पटच आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. चित्रांव्यतिरिक्त धुरंधरांच्या वापरातल्या काही वस्तू, त्यांची स्केच बुके, त्यांना मिळालेली सुवर्णपदके इत्यादी गोष्टीही येथे प्रदर्शनात ठेवल्या आहेत.
महादेव विश्वनाथ धुरंधर यांचा जन्म मुंबईचा. शालेय शिक्षण मात्र कोल्हापुरात झाले. लहानपणापासून चित्रकलेची आवड. धुरंधरांचे चित्रकलेतील पहिले प्रेरणास्थान आबालाल रहिमान. मॅट्रिकच्या परीक्षेसाठी मुंबईत आले असताना त्यांना जे.जे. स्कूल आॅफ आर्ट पाहण्याची संधी लाभली. जे.जे. स्कूल आॅफ आर्टच्या दालनात शिरल्यावर प्लॅस्टर आॅफ पॅरिसमधील व्हीनस डी मेडिसी, अपोलो साराक्टोनस, डिस्कोबोलस इत्यादी भव्य पुतळे पाहून ते भारावून गेले व त्यांनी कलाशिक्षण घ्यायचा निर्धार केला. त्यानंतर म्हणजे १८९0 पासून १९३१ पर्यंत ते जे.जे. स्कूलमध्ये कार्यरत होते. सुरुवातीला विद्यार्थी नंतर शिक्षक, हेडमास्तर व नंतर इन्स्पेक्टर आॅफ ड्रॉइंग होऊन ते निवृत्त झाले. कलासंचालक म्हणूनही त्यांची नियुक्ती एका वर्षाकरिता सॉलोमनच्या गैरहजेरीत करण्यात आली होती.
म.वि. धुरंधर हे बॉम्बे आर्ट सोसायटीचे पहिले भारतीय (हिंदी) सुवर्णपदक विजेते ठरले. धुरंधरांना एकूण पाच सुवर्णपदके मिळाली. १९२७ ला त्यांना ‘रावबहादूर’ हा किताब बहाल करण्यात आला. आपल्या एक्केचाळीस वर्षांतील स्वत:च्या अनुभवाचे अतिशय तपशीलवार वर्णन त्यांनी आपल्या ‘कलामंदिरातील ४१ वर्षे’ या पुस्तकात केले आहे. कलामंदिर या त्यांनी दिलेल्या पुस्तकाच्या नावावरूनच धुरंधरांच्या मनातील जे.जे.बद्दलचा नितांत आदरभाव व्यक्त होतो.
धुरंधरांनी विपुल चित्रनिर्मितीही केली. अ‍ॅकॅडमिक वास्तववादी शैलीवर विशेषत: मानवी आकृतीच्या अचूक रेखाटनावर त्यांनी प्रभुत्व मिळविले होते. सातत्याने ते रेखाटनाचा सराव करीत. त्यामुळे त्यांच्या रेखाचित्रांत सहजता व ओघवतेपण दिसते. व्यक्तिचित्रण व निसर्गचित्रणातही ते तरबेज होते. जलरंग, तैलरंग, वॉश, पावडर, शेडिंग अशा विविध माध्यमांतून त्यांनी अत्यंत सफाईने काम केलेले या
प्रदर्शनातून दिसून येते. प्रसिद्ध चित्रकार राजा रविवर्माचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव
असलेला जाणवतो. किंबहुना रविवर्माला आदर्श ठेवूनच त्यांनी काम केले आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
प्रस्तुत प्रदर्शनात त्यांनी केलेली व्यक्तिचित्रणे पाहायला मिळतात. विशेषत: त्यांचे सेल्फ पोट्रेट तसेच त्यांच्या पत्नी गंगुबाई यांचेही व्यक्तिचित्र पाहायला मिळते. जे.जे.मध्ये असताना त्यांनी केलेले एक व्यक्तिचित्र पाहायला मिळते. तसेच १८९४ साली विद्यार्थी असताना केलेली चारकोलमधील हेडस्टडी व जलरंगातील एका फकिराचे केलेले व्यक्तिचित्र तर अप्रतिम आहे. धुरंधरांची व्यक्तिचित्रणावरील पकड घट्ट दिसते. याबरोबरच त्यांचे अत्यंत गाजलेले चित्र वºहाडणी (लग्नसोहळा) या अप्रतिम चित्राचा उल्लेख करावा लागेल. जलरंगातील या चित्रात पाठारे प्रभूंच्या विवाहप्रसंगी नववधू व इतर स्त्रियांची लगबग छान दाखविली आहे. पूर्णत: स्त्रियांचा समुदाय असलेले हे चित्र आहे. स्त्रियांची खास वेशभूषा. विविध रंगांत परिधान केलेल्या साड्या, लग्नसोहळ्याकरिता असलेले खास नटणे, कोचावर बसलेल्या खास पिवळ्या रंगाच्या साडीत असलेल्या नववधूची मनातील अधीरता इत्यादी तपशील धुरंधरांनी छान रंगविले आहेत. या चित्राला १९१0 मध्ये जळगावच्या औद्योगिक प्रदर्शनात सुवर्णपदक लाभले होते. प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील घटनांवर आठ-नऊ चित्रांची मालिकाच दिसते.
या प्रदर्शनातील स्त्रियांची धुरंधरांनी केलेली रेखाटने फारच अप्रतिम आहेत. इतर अनेक विषयांपेक्षा स्त्रियांची रेखाटने त्यांनी फारच आपुलकीने व प्रेमाने केल्यासारखी वाटतात. केस बांधताना, डोक्यावर घागर घेऊन चालताना, चुलीपाशी स्वयंपाक करणारी, जेवण वाढणारी, दुपारची वामकुक्षी घेणारी अशा कितीतरी दैनंदिन जीवनातील स्त्रियांच्या कामाची रेखाटने येथे पाहायला मिळतात. याबरोबरच काही स्त्रियांची छोटी जलरंगातील व्यक्तिचित्रणेही पाहायला मिळतात. याशिवाय धुरंधरांनी विविध पेशांतील सुतार, चांभार, लोहार, पोस्टमन, कोळीण यांची चित्रे काढून ती पोस्टकार्डच्या आकारात मुद्रित केली. जवळजवळ अशा प्रकारची साठेक पोस्टकार्ड्स त्यांनी केली.
एनजीएमएचे सर्व मजले धुरंधरांच्या चित्रांनी भरले आहेत. अजूनही त्यांची भरपूर कामे विखुरलेली आहेत असे कळते. या प्रदर्शनानिमित्त दिल्ली आर्ट गॅलरीने ‘रोमँटिक रिअ‍ॅलिस्ट’ हा धुरंधरांकरिता सार्थ शीर्षक असलेला एक देखणा कॅटलॉग (पुस्तकच म्हटले तरी चालेल) काढला असून, त्यात सुहास बहुलकरांचा अभ्यासपूर्ण लेख व धुरंधरांची भरपूर चित्रे आहेत. अर्थात किंमत जरा जडच आहे.
अवश्य पाहावे असे प्रदर्शन कला अभ्यासकांनी, विद्यार्थ्यांनी, कलाकारांनी जरूर पाहावे. हे प्रदर्शन १३ आॅक्टोबरपर्यंत आहे. नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्ट ही सोमवारी बंद असते याची नोंद घ्यावी.

महादेव धुरंधर यांनी विपुल चित्रनिर्मितीही केली. अ‍ॅकॅडमिक वास्तववादी शैलीवर विशेषत: मानवी आकृतीच्या अचूक रेखाटनावर त्यांनी प्रभुत्व मिळविले होते. सातत्याने ते रेखाटनाचा सराव करीत. त्यामुळे त्यांच्या रेखाचित्रांत सहजता व ओघवतेपण दिसते.

Web Title: 'Romantic realisticr' Rahebahadur Mahadev Vishwanath Dhurandhar's Illustration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई